पिवळ्या चेहऱ्याचे रहस्य - ३

"तिचा दुसरा नवरा जेव्हा त्या घरात गेला तेव्हा मिसेस मन्रोची जी अवस्था झाली होती त्याचं आणखी काय स्पष्टीकरण देता येईल? माझा असा तर्क आहे की तिच्या पहिल्या नवऱ्याला काही तरी वाईट सवयी लागल्या असतील किंवा काहीतरी गलिच्छ आजार झाला असेल. ही बाई मग त्याच्या तावडीतून सुटून इंग्लंडला आली, नाव बदललं आणि नव्याने आयुष्याला सुरुवात केली. दुसऱ्या पतीला कुणाचा तरी मृत्यूचा दाखला आपल्या पतीचा म्हणून दाखवला. पण काही वर्षांनी  मिसेस मन्रोच्या पहिल्या नवऱ्याला तिचा पत्ता लागला आणि त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. शंभर पौंड देऊन त्यांची पीडा टाळण्याचा मिसेस मन्रोचा विचार असणार. पण त्यावर भागलं नाही. केवळ पैसे मागून तो थांबला नाही तर मन्रो परिवाराच्या जवळ येऊन राहिला. ह्या माणसाला आणखी कुणाची मदत मिळत असण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

"त्या रात्री नवरा गाढ झोपलेला आहे असे पाहून मिसेस मन्रो ह्या माणसालाच भेटायला गेली असणार आणि माझी पाठ सोड असे विनवले असणार. पण त्यात यश न मिळाल्याने ती पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे गेली पण त्याचाही काही उपयोग झाला नसावा. उलट ती घराबाहेर पडत असताना तिचा दुसरा नवरा तिथे आल्याने ती अधिकच अडचणीत आली. नवऱ्याला दिलेलं वचन तिनं दोन दिवस पाळलं पण त्यानंतर संधी मिळताच तिने ह्या शेजाऱ्यांपासून सुटका करून घेण्याचा आणखी एक प्रयत्न केला. आपला फोटोही ती त्यावेळी घेऊन गेली कारण पहिल्या नवऱ्याने त्याची मागणी केली असणार. ह्यातही तिला अडचण आली कारण मन्रो अपेक्षेपेक्षा लवकर घरी परत आला. पण आपल्या नोकराणीच्या मदतीने ती ह्या लोकांना कुठे तरी आजूबाजूच्या झाडाझुडांत लपवून ठेवण्यात यशस्वी झाली आणि मि.मन्रोला त्या घरात काहीच सापडलं नाही...
"काय कशी काय आहे माझी थिअरी?"
"मला तर हे सर्व केवळ तर्क वाटतात."
"हो. पण ते पटण्यासारखे आहेत. आपल्याला नवीन काही माहिती मिळाली आणि त्यानुसार हे तर्क बरोबर ठरले नाहीत तर मात्र मला पुनर्विचार करावा लागेल. असो. जोपर्यंत नॉर्बरीहून काही तार येत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही."

पण आम्हाला फार वेळ वाट पहायला लागली नाही. आम्ही चहा पीत असतानाच नॉर्बरीहून तार आली.

 ते घर रिकामं नाही. आज पुन्हा मला तो चेहरा दिसला. ७.०० च्या गाडीने या. पुढील हालचाली तुम्ही आल्यावर.

आम्ही त्याप्रमाणे नॉर्बरीला गेलो. मन्रो स्टेशनवर आम्हाला घ्यायला आला होता. त्याचा चेहरा अगदी संत्रस्त दिसत होता. होम्सचा हात धरून तो म्हणाला, "ते लोक अजून तिथे आहेत. मी आता तिथे उजेड पाहिला. मि.होम्स आताच्या आता आपण याचा निकाल लावून टाकू."
आम्ही त्या घराच्या दिशेने जायला लागलो तेव्हा होम्स म्हणाला, "तुमच्या मनात काय आहे? काय करावं असं तुम्हाला वाटतं?"
"मी सरळ त्या घरात जाणार आणि तिथे काय चाललेलं आहे ते बघणार. तुम्ही दोघे त्याचे साक्षीदार असाल."
"तुमच्या पत्नीने तुम्हाला बजावून सांगितलंय की तुम्ही घरात जबरदस्तीने शिरून ह्या रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करू नका. तरीही तुम्ही ते करणार?"
"हो. आता ते करण्यापासून मला कोणीही किंवा काहीही अडवू शकणार नाही."
"ठीक आहे. तुमचं म्हणणंही बरोबर आहे. सारखी डोक्यावर अनिश्चिततेची टांगती तलवार असण्यापेक्षा एकदा सत्य काय ते कळलं तर बरं. मग ते कितीही कटू का असेना. चला, आपण त्या घरात जाऊया. हे करताना आपण थोडं बेकायदेशीर वागत आहोत पण ह्या परिस्थितीमध्ये असं करायला काही हरकत नाही."

अंधार खूप होता आणि थोडा थोडा पाऊसही पडायला लागला होता. मन्रो भराभर पुढे चालला होता आणि आम्ही त्याच्यापाठोपाठ त्याच्या गतीने चालण्याचा प्रयत्न करत होतो. एका दिशेला जिथे दिवे दिसत होते तिकडे बोट दाखवून मन्रो म्हणाला, "तो बघा माझा बंगला आणि हे घर आलंच आता!"

आम्ही त्या घरासमोर उभे होतो. दरवाजातून प्रकाशाची एक तिरीप बाहेर येत होती. त्यावरून दरवाजा जरासा उघडा आहे हे आम्हाला कळलं. तेवढ्यात आम्हाला खिडकीच्या पडद्याआड काहीतरी हालचाल झालेली दिसली. मन्रो ओरडला, "तो प्राणी तिथेच आहे! चला, चला. लवकर माझ्या पाठोपाठ  या. मग तुम्हाला सगळं प्रत्यक्षच पहायला मिळेल." 
आम्ही दरवाज्याजवळ पोहोचलो आणि एकदम कुठूनशी एक स्त्री आली आणि ती दोन्ही हात पसरून, अगदी विनवणी केल्याच्या सुरात म्हणाली,
"जॅक, प्लीज! आत येऊ नकोस. माझं ऐक. माझ्यावर विश्वास ठेव. त्यातच तुझं भलं आहे."
"एफी, मी आतापर्यंत तुझ्यावर जरा जास्तच विश्वास ठेवला. आता मला जाऊ दे. मी आणि माझे हे मित्र मिळून आज या प्रकरणाचा निकालच लावून टाकणार आहोत." असं म्हणून तो तिला जवळजवळ ढकलूनच आत गेला. आम्हीही त्याच्यापाठोपाठ गेलो. एका नोकराणीने आमची वाट अडवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही तिला दाद दिली नाही आणि काही सेकंदातच आम्ही जिना चढून वरच्या त्या खोलीत गेलो.

मन्रोने सांगितल्याप्रमाणे खोली सुसज्जित होती. मेणबत्त्या लावलेल्या होत्या. कोपऱ्यातल्या एका टेबलाला धरून एक छोटी मुलगी पाठमोरी उभी होती. तिने लाल फ्रॉक घातला होता आणि लांब पांढरे हातमोजे  घातले होते. आमची चाहूल लागताच तिने मागे वळून पाहिले आणि माझ्या तोंडून एकदम आश्चर्य आणि भीती ह्या भावनांच्या मिश्रणातून निर्माण झालेला उद्गार बाहेर पडला. जो चेहरा आमच्याकडे पहात होता तो अत्यंत भावशून्य होता.

पण लगेचच त्याचा उलगडा झाला. होम्सने हसतहसत त्यामुलीच्या कानामागे आपला हात नेला आणि तिचा मुखवटा हलकेच सोडवला. मुखवटा काढल्यावर जो चेहरा दिसला तो कोळशासारखा काळा होता! मुखवटा काढल्यावर आमच्या ज्या प्रतिक्रिया झाल्या त्याची तिला मजा वाटून ती हसायला लागली. काळ्याकुट्ट चेहऱ्याच्या पार्श्वभूमीवर तिचे पांढरेशुभ्र दात कसेतरीच दिसत होते!  

मन्रोचा चेहरा एकदम कठोर झाला आणि तो किंचाळलाच, "माय गॉड!!ह्याचा अर्थ काय?"
"मी सांगते याचा अर्थ काय ते." असे म्हणत आमचा रस्ता अडवणारी ती स्त्री पुढे आली. काही वेळापूर्वी तिच्या चेहऱ्यावर जी विनवणी, जे आर्जव दिसत होतं त्याचा आता लवलेशही नव्हता. ताठ मानेने आणि निश्चयी स्वरात ती बोलत होती. "जॅक, माझ्या इच्छेविरुद्ध तू मला हे सगळं बोलायला भाग पाडतोयस. आता ते ऐकण्यासाठी मन घट्ट कर. माझ्या नवऱ्याचा अटलांटामध्ये पिवळ्या तापात मृत्यू झाला, माझी मुलगी मात्र त्यातून वाचली."
"तुझी मुलगी?"
तिने आपल्या गळ्यातलं लॉकेट काढलं आणि म्हणाली,"तू हे कधी उघडलेलं पाहिलं नाहीस."
"ते उघडू शकतं हेच मला माहीत नाही."
तिने त्याची कळ दाबून ते उघडलं. आत एका काळ्या माणसाचा फोटो होता. फोटोतील चेहरा आकर्षक होता आणि बुद्धीचं तेज त्यावर दिसून येत होतं पण त्याचे नाक,डोळे इत्यादी अफ्रिकन होते हे सत्य काही लपत नव्हतं.
"हा माझा पती, अटलांटाचा जॉन हेब्रन. ह्याच्याइतका उमदा आणि सज्जन माणूस मी जगात दुसरा पाहिला नाही. ह्याच्याशी लग्न करण्यासाठी मी माझ्या घरच्यांचा रोष पत्करला, इतकंच नव्हे तर सर्वांशी नातीही तोडून टाकली. पण मला त्याचा कधीही पश्चात्ताप झाला नाही. हे आमचं दुर्दैव की आमच्या मुलीच्या वाट्याला तिच्या मातेचं रंगरूप न येता तिच्या पित्याचं रंगरूप आलं! ही माझी लूसी तिच्या पित्यापेक्षाही जास्त काळी आहे. पण काळी वा गोरी, ती माझी लाडकी सोनुली आहे!" हे शब्द ऐकताच ती मुलगी धावत जाऊन आपल्या आईला बिलगली. मुलीला कुरवाळत ती पुढे म्हणाली, "मी तिला अमेरिकेत सोडून इकडे एकटीच आले याचं कारण तिची प्रकृती अजून तितकी सुधारली नव्हती. हवामानातला बदल तिला सोसला नसता. एका नर्सच्या हातात तिला सोपवून मी इंग्लंडला आले. ही नर्स पूर्वी आमच्याकडे काम करत होती आणि ती अतिशय विश्वासू होती. त्यामुळे मला मुलीची काळजी नव्हती. माझ्या मुलीला अंतर देण्याचा विचार स्वप्नातही माझ्या मनात आला नाही. पण जॅक, आपली भेट झाली, मी तुझ्या प्रेमात पडले आणि काय झालं कुणास ठाऊक? माझ्या मुलीबद्दल तुला सांगण्याचा धीर मला होईना. सारखी भीती वाटत होती की हे तुला सांगितलं तर मी तुला गमावून बसेन. माझ्या मनात माझी मुलगी आणि तू असं द्वंद्व सुरू झालं आणि कुठल्या तरी क्षणाला तुझा विजय झाला! आपण विवाहबद्ध झालो.

"तीन वर्ष मी हे गुपित तुझ्यापासून लपवून ठेवलं. त्या नर्सकडून मला लूसीची खुशाली कळत होती. तिला भेटायची खूप इच्छा होत होती पण माझा नाईलाज होता. एक दिवस ती इच्छा, ती ओढ अनावर झाली. मी ठरवलं की तिला काही दिवस तरी आपल्या जवळ बोलवायचं. त्यातील धोका मला माहीत होता पण मी तो पत्करायचं ठरवलं. मी तुला तेव्हा शंभर पौंड मागितले होते ते त्यासाठीच. मी त्या नर्सला ते पैसे पाठवले आणि ह्या घराबद्दल पण सांगितलं. ते घर जवळच असल्याने मला माझ्या मुलीला सहजपणे ’शेजारी’ ह्या नात्याने भेटता येईल असा माझा अंदाज होता. मी नर्सला हेही सांगितलं की लूसीचा चेहरा, हातपाय नेहमी झाकून ठेवायचे. एक निग्रो मुलगी आपल्या वस्तीत रहातेय अशी चर्चा इथे व्हायला नको. कदाचित मी हे असं करायला नको होतं पण तुला हे कळू द्यायचं नाही आणि मुलीचा सहवास तर मिळवायचा, हे दोन्ही साधायच्या नादात मी हे असं केलं.        

"जॅक, तूच मला सांगितलंस की त्या घरात कोणी तरी रहायला आलेत. मी सकाळपर्यंत वाट बघायला हवी होती. पण मला राहावलं नाही. त्यामुळेच तर  सगळा घोळ झाला. दुसऱ्या दिवशी माझं गुपित फुटलं असतं पण तुझ्या मोठेपणामुळे तसं झालं नाही. तीन दिवसांनी तू घरात शिरलास तेव्हा नर्स आणि लूसी मागच्या दाराने बाहेर पडल्या आणि काही वेळ लपून राहिल्या. जॅक, आता तुला सत्य कळलंय, तर मला सांग, आम्हा मायलेकींचं तू आता काय करणार आहेस? "

खोलीत गंभीर शांतता पसरली. अशीच जवळजवळ दहा मिनिटं गेली आणि त्यानंतर मन्रोनं तिच्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं त्याची आठवण सुद्धा मला अतिशय आनंददायी वाटते! त्याने लूसीला उचलून तिचा पापा घेतला आणि तिला कडेवर घेतले. दुसरा हात पुढे करून आपल्या बायकोचा हात हातात घेतला आणि जिन्याकडे जाता जाता म्हणाला, "आपण घरी जाऊन ते सर्व बोलू या. एफी, तुला एक सांगतो. मी फार उमदा, मोठ्या दिलाचा माणूस आहे असा दावा करणार नाही पण तू माझी जी परीक्षा केली आहेस त्यापेक्षा मी थोडा अधिक चांगला आहे असं मला वाटतं." 

त्यांच्या मागून आम्हीही जिना उतरून खाली गेलो. रस्त्यावर आल्यावर होम्स मला म्हणाला,
"मला वाटतं आता आपलं इथे काही काम नाही! आपण आपले लंडनला परतूया."

नंतर प्रवासात आणि घरी पोहोचल्यावर सुद्धा होम्स माझ्याशी एक अक्षरही बोलला नाही. रात्री झोपायाला जाताना मात्र माझ्याजवळ येऊन म्हणाला,
"वॉटसन, तुला असं कधी आढळलं की मी माझ्या कामात जरा जादाच आत्मविश्वास दाखवतोय, किंवा केसकडे पुरेसे लक्ष देत नाही तर तू माझ्या कानात हळूच "नॉर्बरी!" असं म्हण. तू एवढं केलंस तर तुझे माझ्यावर अनंत उपकार होतील!"         

समाप्त