नाट्यछटा आणि कृत्रिमपणा - 'हरलातच ना शेवटी...'

दिवाकरांच्या नाट्यछटांच्या निमित्ताने इथे झालेल्या चर्चेत नाट्यछटा हा स्वसंवादासारखा प्रकार आता कालबाह्य  झाला आहे की काय असे मत व्यक्त करण्यात आले होते. मला वाटते की हा प्रकार दिवाकरांनंतर इतर कुणाला म्हणावा इतका समजलाच नाही. दिवाकरांच्यी काळातील लेखनभाषा ही एकंदरीतच अलंकारिक, बटबटीत, अनैसर्गिक आणि भडक असे. त्यामुळे या नाट्यछटा आज कृत्रिम वाटणे अगदी स्वाभाविक आहे. पण ज्याप्रमाणे मराठी कविता कालानुरुप बदलली, तशी जर नाट्यछटा बदलत गेली असती तर कदाचित नाट्यछटेचे एक वेगळे, कालसंगत रुप आपल्या समोर आले असते.
आजच्या काळात नाट्यछटांचे पुनरुज्जीवन करायचे म्हटले तर तिचे स्वरुप कसे असेल, तिचे विषय, वापरलेली भाषा कशी असेल यावर विचार करताना मला सुचलेल्या काही ओळी खाली देत आहे. ही आदर्श नाट्यछटा आहे असा माझा दावा नाही. एखाद्या लेखनप्रकाराची उत्क्रांती होत होत गेली तर तो कालबाह्य होत नाही, हे सांगण्याचा माझा हा प्रयत्न आहे. 

'हरलातच ना शेवटी...'

"थुत्त तुमच्या जिंदगानीवर लेको! शंभर कोटींचा देश, आणि एक चांगले अकरा मर्द गडी सापडत नाहीत तुम्हाला! अगदी गोष्टी करत होता त्र्याऐंशीची पुनरावृत्ती करणार वगैरे... कोण म्हणजे काय? सगळ्यांचीच भाषा होती की! अरे, कसलं बॅड लक आणि कसलं काय? श्रीलंकेचं सोड रे, ते काय आपल्याला नेहमीच मारतात! कलकत्त्याला..विनोद कांबळी रडला होता ती...पण साल्यानो, बांगला देशकडून.. नाही, ते खेळतायत चांगलंच म्हणा!  नाही मग मी काय म्हणतो,  तुमच्या बर्म्युडाच्या अगेन्स्ट केलेल्या रेकॉर्डला काय अर्थ आहे? तुला सांगतो, हे सगळे म्हातारे ना, घरी बसवले पाहिजेत! माजलेत रे सगळे! हां..मॉडेलिंग करा म्हणावं... सोना चांदी च्यवनप्राश... अरे, थोडंसं स्वतः खात जा की थेरड्या! अरे कसला वॉल? आता आपण बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करा! कुणाला? हां, मी तेच म्हणतो, कैफला ... आणि लक्ष्मण? धोनी काय, युवराज काय... आणि श्रीशांतला काय विंडीजमधल्या पोरी बघायला पाठवला काय? हा: हा: हा:... कॉफी? अर्धी अर्धी घेऊ! अब्दुल, माचिस दे रे... नाही, मी तर ठरवलंयच की आता वर्षभर तरी मॅच बघायची नाही आणि या विषयावर बोलायचंही.... काय अर्थ आहे रे? च्यायला रात्री तीनतीन वाजेपर्यंत च्यूत्यासारखं जागून... मी नाही का तुला दोन वाजता एसेमेस केला तेंव्हा.. तर वर्ष- सहा महिने अगदी चर्चासुद्धा बंद! काय? बांगला देशच्या दौऱ्यावर सेहवाग नाही? दे टाळी! पण सचिनला बाकी घ्यायला पाहिजे होतं! वन डाऊनला नाहीतर काय... आणि बोलर कोणकोण आहे बघ! अरे, आगरकर पाहिजेच! बांगला देशमध्ये रिव्हर्स स्विंग कसला जबरी करतो तो... आणि स्पिनर्समध्ये...."