सगळे आहेत तरी कुठे?

आपण एक विचारखेळ खेळू. समजा तुम्ही नव्या ठिकाणी, नव्या घरी राहायला गेला आहात. ह्या नव्या घरी पहिल्या सकाळी उठल्यावर शेजार कसा आहे हे पाहावे ह्या उद्देशाने घराचे दार उघडून तुम्ही बाहेर उभे राहता. तुमच्या घरासमोर रस्ता आहे. रस्त्यापलीकडे आणि तुमच्या घराच्या दोन्ही बाजूंना घरे आहेत. परसात जाऊन पाहिले तर तिथूनही इतर घरे दिसत आहेत. मात्र, तुम्हाला कोणीच दिसत नाही. अगदी चिटपाखरूही नाही. तुम्हाला नवल वाटते. इथे घरे, रस्ता आहे त्या अर्थी ही राहण्यालायक जागा आहे, मग कोठेच काही हालचाल कशी दिसत नाही? बाहेर काही मिनिटे उभे राहून तुम्ही घरात येता आणि नुकत्याच घेतलेल्या अनुभवाचा नवलाने विचार करत राहता. तुम्हाला प्रश्न पडतो, सगळे आहेत तरी कुठे?

तुम्ही सर्व शक्यता विचारांत घेण्याचा प्रयत्न करता. कदाचित त्या घरांमध्ये राहणारी मंडळी घरांत असतील, बाहेर दिसली नाहीत म्हणून काय झाले? पण जर लोक घरांत असतील तर एवढी सामसूम कशी? आवाज नाही, हालचाल नाही! कदाचित मंडळी घरात असतील, पण लपली असतील. पण का लपतील? एवढा चांगला दिवस आहे, चांगले हवामान आहे, मग लोकांनी घरांत का लपावे? कदाचित लोक इथे राहत असतील, पण आता मी पाहायला गेले तेव्हा सगळे कुठेतरी गेले असतील. पण सगळे एकाच वेळी बाहेर का जातील? एखाद्या घरातही कोणी दिसू नये? माणूस नाही तरी एखादे मांजर, कुत्रा? अगदीच नाही तर एखादा पक्षी, एखादा किडा तरी? हे गौडबंगाल आहे तरी काय? सगळे आहेत तरी कुठे?

मग तुम्ही आणखी खोलात शिरता. कदाचित मी फारच कमी वेळ बाहेर उभी राहिले असेन. आणखी थोडा वेळ थांबले असते तर कदाचित दिसलेही असते कुणी. पण शेजारी कोणी नवीन राहायला आले आणि ती व्यक्ती बाहेर उभी दिसत असेल तर स्वत:हून येऊन ओळख करून घेण्यापुरतेही सौजन्य नाही कोणाकडे? कदाचित माणूसघाणी मंडळी राहत असावीत आसपास. पण सगळी मंडळी तशीच? नसतीलही सगळी माणूसघाणी, पण त्यांना त्यांचे व्याप असतील. दुसऱ्यांकडे बघण्याएवढा वेळ आहे कुणाकडे आजकाल? पण तरीही बाहेर कोणीतरी दिसायला, किमान काही आवाज तरी ऐकू यायला हवे होतेच हा विचार काही तुमच्या मनातून जात नाही. तुम्ही विचार करत राहता की सगळे आहेत तरी कुठे?

हे विचार करता करता एकीकडे तुम्ही बाहेर काही घडत आहे का ह्याचा कानोसा घेतच असता. विचार करण्यात काही मिनिटे जाऊनही तुम्हाला कुठलीच हालचाल जाणवत नाही. आता तुम्हाला काळजी वाटायला लागते. ही मंडळी आपापल्या घरात बसून नवीन आलेल्याला लपून न्याहाळत तर नसतील? कदाचित मी घरात येण्यापूर्वी कुणी इथे घुसून कुठे फटींत कॅमेरे तर बसवले नसतील? आणि ह्या कॅमेऱ्यांमधून त्यांनी माझ्यावर पाळत तर ठेवली नसेल? कदाचित ही मंडळी चांगली असतीलही, पण नवीन आलेल्या व्यक्तीच्या चांगुलपणाची खात्री पटल्याशिवाय ओळख देण्याची त्यांची पद्धत नसेल. पण अगदी सगळ्यांचीच ती पद्धत नसेल? कदाचित ह्या सोसायटीचा तसा नियमच असेल. हा विचार करण्यात आणखी वेळ जातो. बाहेर अजूनही सामसूम असते. सगळे आहेत तरी कुठे?

मग तुम्हाला वाटते की कदाचित मी इथे राहायला आल्याचे त्यांना माहीतच नसेल. मी नुसतीच बाहेर उभी राहिले. मी तरी कुठे फार हालचाल केली किंवा आवाज काढले? त्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही तसा मी तरी कुठे केला? असा विचार करत तुम्ही पुन्हा बाहेर जाता. घराच्या आजूबाजूला मुद्दाम थोडी लगबग करता. तरी शांतता. मग उगीच काही आवाज काढून पाहता. ’कुणी आहे का? ’ असे मोठ्याने ओरडून पाहता. पण उपयोग होत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडतो की ह्या गल्लीत, ह्या गावात तुम्ही एकटेच आहात की काय? सभोवतीची घरे पाहून तुम्ही एकटे असाल हे तुम्हाला काही केल्या पटत नाही. मग तुम्हाला वाटते की एखाद-दोन वेळा, तेही काही मिनिटांसाठी बाहेर उभे राहाणे पुरेसे नसेल. कदाचित संध्याकाळ-रात्रीपर्यंत, कदाचित काही दिवस (वा महिने वा वर्षे) वाट पाहिली तर दिसतीलही कुणी! पण आता ह्या क्षणाला सगळे आहेत तरी कुठे?

एन्रिको फर्मी (२९ सप्टेंबर १९०१ - २८ नोव्हेंबर १९५४)

अगदी हाच प्रश्न काही वर्षांपूर्वी विचारला तो भौतिकशास्त्राच्या नोबेल पारितोषिक विजेत्या एन्रिको फर्मीने. १९५० मध्ये लॉस ऍलमोस नॅशनल लॅबोरेटरीमध्ये हा शास्त्रज्ञ एमिल कोनोपिन्स्की, एडवर्ड टेलर आणि हेबेर यॉर्क ह्या त्याच्या सहकाऱ्यांसमवेत दुपारी जेवणासाठी निघाला होता. नेहमीप्रमाणे गप्पाटप्पा चालू होत्या. चर्चा उडत्या तबकड्यांवर आणि परग्रहवासीयांवर येऊन ठेपली. तेव्हा फर्मीने हा सुप्रसिद्ध प्रश्न विचारला - "सगळे आहेत तरी कुठे? " ह्या विश्वाचे वय पाहता आणि त्यातील ताऱ्यांची संख्या पाहता, विश्वात जीवांचा बुजबुजाट दिसायला हवा. मात्र असे प्रगत वा अप्रगत परग्रहवासी असल्याचा आपल्याकडे पुरावा मात्र नाही. हाच तो सुप्रसिद्ध 'फर्मीचा विरोधाभास' (paradox). आपल्या विचारखेळातही तुम्ही जिथे राहायला गेला होता तिथला परिसर, घरे पाहता तिथे मनुष्यवस्ती, किमान पशुपक्षी वा किडे तरी दिसायला हवे होते, मात्र तसे कोणी दिसत नव्हते. म्हणजे तुम्ही फर्मीचा विरोधाभास अनुभवत होता.