डॉ.निरुपमा भावे : एक संवाद

 

डॉ. निरुपमा भावे ह्यांचा माझा परिचय महाविद्यालयीन जीवनापासून आहे. त्यावेळी एक बुद्धिमान विद्यार्थिनी म्हणून त्या मला माहीत होत्या. त्यांनी पुणे विद्यापीठातून गणित विषयात बी. एस्सी. व एम. एस्सी. ह्या पदव्या विशेष प्राविण्यासह (डिस्टिंशन) मिळवल्या. १९७० साली एम. एस्सी. झाल्यानंतर लगेच पुण्यात नेस वाडिया महाविद्यालयात त्यांनी गणिताच्या अध्यापनाचे काम सुरू केले. हे करत असतानाच त्यांनी संख्याशास्त्र ह्या विषयात एम. एस्सी. ही पदवी मिळवली, ती देखील विशेष प्राविण्यासह आणि विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून! संख्याशास्त्रातील एम. एस्सी. मुळे त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात संख्याशास्त्र हा विषय शिकवायला सुरुवात केली. पण गणित हेच त्यांचे पहिले प्रेम असल्याने संख्याशास्त्राचे अध्यापन करत असतानाच त्यांनी प्रा. रघुनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली गणित विषयात डॉक्टरेट मिळवली व त्या पुणे विद्यापीठात व्याख्याती म्हणून काम करू लागल्या. त्यानंतर त्या यथावकाश अधिव्याख्याती व प्राध्यापिका झाल्या. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे २००२ ते २००५ ह्या कालावधीत त्यांनी गणित विभागाच्या प्रमुखपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. पुणे विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर त्या पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ऍडजंक्ट प्रोफेसर म्हणून काम करू लागल्या व आता त्या तिथे प्रोफेसर एमेरिटस (Professor Emeritus) म्हणून काम करीत आहेत. आतापर्यंत त्यांचे बरेच शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत आणि त्यापैकी काहींचे वाचन त्यांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया ह्या देशांमध्ये भरलेल्या परिषदांमध्ये केले आहे. ग्राफ थिअरी हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्याशी संबंधित दोन पुस्तकांच्या त्या सहलेखिका आहेत.

मित्रमंडळींची स्नेहसंमेलने आयोजित करण्यात निरुपमा भावे यांचा नेहमीच पुढाकार असतो, एवढेच नव्हे तर त्यावेळी ’मी पुरणपोळ्या नाहीतर उकडीचे मोदक करून आणीन’ हे ’मी कांदेपोहे करून आणीन’ इतक्या सहजपणे म्हणणाऱ्या निरुपमा भावे पाकनिपुण आहेत हे वेगळे सांगायला नकोच. शास्त्रीय संगीताचे कोणतेही औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेले नसूनही त्यांना संगीताचे चांगले अंग आहे. नाट्यगीते हा त्यांचा खास प्रांत आहे. शाळेत गर्ल गाईडसमध्ये असताना दिलेली ’रोज एक तरी सत्कृत्य केले पाहिजे. ’ ही शिकवण त्यांच्या मनात रुजली आहे. त्यामुळेच त्या आपल्या अनेक व्यापांमधून वेळ काढून सामाजिक कार्यातही भाग घेत असतात.

पण...

हे सर्व ज्यापुढे फिक्के पडावे असे काही पैलू डॉ. निरुपमा भावे यांच्या व्यक्तिमत्त्वाला आहेत. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी खास दिवाळी मनोगतासाठी ई-मेल व दूरध्वनीद्वारे घेतलेली ही त्यांची मुलाखत.

नुकतेच तुमच्याबद्दल ऐकले की वयाच्या साठीच्या आसपास तुम्ही ’गिरिप्रेमी’च्या एव्हरेस्ट मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी आयोजित केलेल्या ’सुळका चढणे आणि उतरणे’ (rock climbing and rappelling) ह्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. खेरीज एंड्यूरो-३(सहनशक्ती स्पर्धा) मध्येही तुम्ही अलीकडेच भाग घेतला होता. साठीच्याच मागेपुढे तुम्ही आठ सायकल रॅल्या देखील केल्या आहेत हे तर मला माहीत आहेच. ज्या वयात लोक उच्च रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी आणि त्यावरचे उपाय ह्याबद्दल चर्चा करताना दिसतात त्या वयात तुम्ही ह्या सर्व साहससहली केल्या. तेव्हा तुम्ही हे सर्व कसे केले, कसे करता हे जाणून घेण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी हा मुलाखतीचा प्रपंच.

मला आठवतंय की पुणे विद्यापीठात एम. एस्सी. करत असताना मोपेडवरून विद्यापीठात येणाऱ्या तुम्ही एकमेव विद्यार्थिनी होता. म्हणजे दुचाकीचे आणि तुमचे प्रेम अगदी पूर्वीपासून आहे. पण सायकल रॅलीची सुरुवात कशी झाली? कॉलेजपासूनच तुम्हाला सायकल चालवण्याचा सराव होता का? सायकल रॅल्यांबद्दल माहिती कुठून मिळाली?

कॉलेजमध्ये असताना सायकल चालवता येत होती पण सराव नव्हता कारण घर कॉलेजपासून चालत जाण्याच्या अंतरातले होते. मी १८ वर्षांची झाल्यापासून मात्र मोपेड/स्कूटर चालवायला सुरुवात केली. सायकल रॅलीबद्दल कळले ते योगायोगाने. श्री. भाव्यांचे एक स्नेही साठाव्या वर्षी सुद्धा ७-८ किमी सायकल चालवून रोज कॉलेजला जात असत. त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून मला स्फूर्ती मिळाली. मग काय! घरात पुतणीची सायकल धूळ खात पडली होती ती दुरुस्त केली आणि चालवायला सुरुवात केली. त्याच वेळी ’सकाळ’ मध्ये ’पुणे सायकल प्रतिष्ठान’ बद्दल व ते दर महिन्यात काढत असलेल्या छोट्या सायकल फेऱ्यांबद्दल समजले आणि मी त्यातील एका फेरीत भाग घेतला. तिथेच सायकलप्रेमींशी गाठ पडली आणि पुढील प्रवास सुरू झाला. ह्यावेळी माझे वय होते ५१ वर्षे!

पन्नाशी उलटल्यावर हे सुरू करताना आपल्याला हे जमेल की नाही अशी शंका आली नाही का? ज्या वयात आगगाडीने केलेला दूरचा प्रवाससुद्धा नको वाटतो त्या वयात तुम्ही ह्या सहली सुरू केल्या? हे कसे काय केले?

मला एखादी गोष्ट आपल्याला जमेल की नाही असा प्रश्न कधीच पडत नाही. ह्या सर्व सहली एकातून एक अशा होत गेल्या. सर्वप्रथम मला पुणे प्रतिष्ठानच्या ’वाघा बॉर्डर-आग्रा’ रॅली बद्दल समजले. त्यात लोक दर दिवशी ८० ते १०० किमी सायकल चालवतात असे ऐकले. मग मी आपलीच परीक्षा घेण्यासाठी घरापासून विमानतळापर्यंत गेले आणि परत आले. हे अंतर जाऊन येऊन साधारण २८ किमी होते. त्यानंतर पुणे-भोर-पुणे व पुणे-रांजणगाव-पुणे असे १०० किमीचे प्रवास केले व मला आत्मविश्वास आला, सायकल चालवण्यातील आनंद कळला आणि सर्व सुरू झाले.

म्हणजे आधी तुम्ही स्वत:चाच अंदाज घेतला आणि मग त्यात पडला. तुमच्या रॅल्यांमध्ये बरोबरचे लोकही तुमच्याच वयाचे असतात की मोठे/लहान कसे असतात?

बहुतेक लोक माझ्याहून दहा/बारा वर्षांनी लहान असलेलेच असतात. पण काही मोठेही असतात. एक मराठे नावाचे ८० वर्षांचे गृहस्थ आमच्याबरोबर असतात!

कमाल आहे! बरं, ह्या सायकल रॅलीसाठी काय काय तयारी करावी लागते? म्हणजे बरोबर नेण्याच्या वस्तू, तसेच फिटनेस ठेवणे, स्टॅमिना वाढवणे ह्यासाठी देखील काही करावे लागत असेल नाही का?

सायकल रॅलीसाठी खूप सराव करावा लागतो. डिसेंबरमध्ये रॅली असेल तर मे/जूनपासूनच सुरुवात करावी लागते. पुण्याजवळच्या घाटात दर रविवारी १००किमी सायकल चालवण्याचा सराव आम्ही करतो. तसेच पौष्टिक आहार, सरावातही आणि रॅलीतही, अगदी कटाक्षाने घ्यावा लागतो.

इतर तयारी म्हणजे रॅलीचा मार्ग आखणे, त्यावर रोजच्या मुक्कामाची ठिकाणे ठरवून राहण्याचे आरक्षण करणे, तसेच जिथून रॅली सुरू होणार तिथे पुण्याहून सायकली पाठवण्याची व्यवस्था करणे, आमचे रेल्वेचे आरक्षण करणे, हिशेब ठेवणे, पैसे सांभाळणे अशी अनेक कामे असतात.

साधारण किती जणाचा ग्रुप एका वेळेला जातो?

साधारण २०/२५ जणांचा ग्रुप असतो. सर्व कामे आम्ही आपापसात वाटून घेतो.

एवढ्या दिवसांत आणि एवढ्या प्रवासात सायकल नादुरुस्त होणे किंवा कोणी आजारी पडणे असेही होत असेल. त्यावेळी तुम्ही काय करता?

रॅलीच्या सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचल्यावर आम्ही तिथलाच एखादा मेकॅनिक ठरवतो आणि त्याला बरोबर घेतो. आमच्या बरोबर एक छोटा ट्रकही असतो. नादुरुस्त सायकल त्यात ठेवतो. तसेच कोणी आजारी पडले तर त्या माणसालाही त्या ट्रकमध्ये ठेवतो. एखाददुसरा डॉक्टर बरोबर असतोच. त्यामुळे आजारी माणसांचीही काळजी घेतली जाते.

आता मला ज्याचे विशेष आकर्षण आहे त्या मनाली-खार्दुंग ला रॅलीबद्दल बोलू. हा जगातला सर्वात उंच (१८, ३८० फूट) असा गाडीने जाण्याचा रस्ता समजला जातो. ह्या ठिकाणी गाड्या/जीप यातून जाणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना तीही एक साहससहल असते. मग सायकलवरून तिथे जाणे तर महासाहस! तर त्यासाठी इतर रॅल्यांच्या पेक्षा जास्त/वेगळी तयारी करावी लागली का? एवढ्या उंचीवर गेल्यावर हवेतील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्याने श्वास घेताना अडचण होणे अशा गोष्टी होतात. त्यासाठी काय तयारी केली होती?

बरोबर आहे. मनाली-खार्दुंग ला रॅलीसाठी विशेष तयारी करावी लागली. त्यासाठी कात्रज, खंबाटकी, ताम्हिणी, पाबेघाट असा पुण्याजवळच्या सर्व घाटात सराव केला. दर रविवारी सिंहगड सायकलने ८० ते ९० मिनिटात चढण्याचाही सराव केला. उंचीवर होणारे त्रास टाळण्यासाठी/ कमी करण्यासाठी योगासने, प्राणायाम हे सातत्याने केले. तशी योगासने मी एरवीही नियमित करते.