संपादकीय

मनोगताचा सहावा दिवाळी अंक वाचकांच्या हाती देताना अंकसमितीस अतिशय आनंद होत आहे. दिवाळीच्या तिथींना पुढे ढकलून लेखन करण्यास जास्त कालावधी देणारा अधिक महिना मनोगत दिवाळी अंकाच्या पथ्यावरच पडला आणि ह्यावर्षी अंकाला भरघोस प्रतिसाद मिळाला. अंकासाठी लेखन पाठविणाऱ्या, तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे अंकसमितीतर्फे मन:पूर्वक आभार.

अंकसमितीचे प्रमुख काम म्हणजे साहित्याचे मुद्रितशोधन आणि संपादन. १९६२ साली सिद्ध झालेल्या (व त्यानंतर जाहीर झालेल्या शासननिर्णयांनुसार) शुद्धलेखन नियमांचा अवलंब करण्याचे अंकसमितीचे सध्याचे धोरण आहे. त्यानुसार अनुच्चारित अनुस्वार आणि ऱ्हस्व इ-कारान्त व उ-कारान्त शब्द न लिहिण्याकडे अंकसमितीचा कल असतो.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची विधिवत स्थापना झाली आणि मराठेशाही बुडाल्यानंतर लोप पावलेला राजाश्रय मराठीला परत मिळाला. तत्कालीन मंत्रिमंडळाने शासकीय व्यवहार मराठीतून व्हावा असे ठरवले. मेजर कॅंडीने मराठीच्या प्रचलित बोलींपैकी एकीला प्रमाण मराठीचा दर्जा देऊन प्रमाण मराठीचे शब्दकोश १८३२ आणि नंतर १८५७ साली प्रसिद्ध केले होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वीच मराठी भाषेचे प्रमाणीकरण पूर्ण झाले होते व पुस्तकांतून, वर्तमानपत्रांतून आणि नियतकालिकांतून हे प्रमाण मराठी छापले व लिहिले जात होते. ह्या प्रमाण मराठीत अनुच्चारित अनुस्वारांचे लेखन, तत्सम शब्दांचे लेखन संस्कृत नियमांनुसार करणे, वगैरे नियमांचा अंतर्भाव होता. मात्र, मराठीत प्रचलित असलेले अनुस्वार व ऱ्हस्वदीर्घादी नियमांमुळे लेखन/टंकनवेगावर मर्यादा येत असे. त्यामुळे सरकारी कामकाजाच्या सोयीसाठी शासनाने नेमलेल्या 'भाषा सल्लागार मंडळा'ने 'मराठी साहित्य महामंडळा'सोबत सल्लामसलतीने १४ 'सोप्या' नियमांचा अंतर्भाव असलेली शासनमान्य शुद्धलेखन नियमावली १९६२ मध्ये प्रसिद्ध केली. वाचकांच्या नव्हे, तर लेखनकर्त्यांच्या दृष्टिकोणातून विचार करून, सुलभीकरण व व्यवहारवाद हे निकष डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या ह्या नियमावलीतील नियमांस सुसूत्र व्याकरणाचे अधिष्ठान नव्हते (सत्त्वशीला सामंत, 'व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली', गोकुळ मासिक प्रकाशन, पुणे, आवृत्ती पहिली, १९९९), असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ह्या नियमावलीमध्ये अंत्य अक्षरांचे दीर्घीकरण करणे, अनुच्चारित व अर्धोच्चारित अनुस्वार गाळणे वगैरे नियमांचा अंतर्भाव होऊन मराठीचे संस्कृतशी पूर्वापार असलेले नाते तुटले. हे नियम अपुरे असल्याचे तज्ज्ञांनी लक्षात आणून दिल्यावर त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी १९७२ मध्ये ह्या नियमावलीत आणखी चार नियमांची भर घालण्यात आली व एका मूळ नियमात बदल केला गेला. अशाप्रकारे तयार झालेली १८ नियमांची आवली सध्या प्रचलित आहे.

"अनुच्चारित अनुस्वार हा वदतोव्याघात आहे. मराठीत आपण वापरतो ते वास्तविक बिंदुचिन्ह आहे." (दिवाकर मोहनी, 'उच्चारदर्शनासाठी नागरी लिपीची अपर्याप्तता', भाषा आणि जीवन, दिवाळी २००९) १९६२ पूर्वी बिंदुचिन्ह वा अनुच्चारित अनुस्वार लिहिण्याची पद्धत प्रमाणित असताना, मनास येईल त्या कोणत्याही शब्दांवर अनुस्वार देण्याची पद्धत नव्हती. बिंदुचिन्हयुक्त (अनुस्वारयुक्त) आणि बिंदुचिन्हाशिवाय (अनुस्वाराशिवाय) एकच शब्द लिहिण्यामुळे त्या दोन शब्दांच्या अर्थांतील फरक स्पष्ट केला जाई व संदर्भाशिवाय त्या शब्दांचा अर्थ समजण्यास मदत होत असे. उदाहरणादाखल श्रीमती सत्त्वशीला सामंतांनी लिहिलेल्या ’अनुच्चारित अनुस्वारांची कैफियत’ ह्या लेखामधील एक उदाहरण पाहू. त्या लिहितात, "'तुझें आहे तुजपाशी' यातील 'पाशी' हे शब्दयोगी अव्यय 'पार्श्व' या संस्कृत शब्दापासून उत्पन्न झाले असल्याने त्यावर अनुस्वार देण्याची गरज नाही. पण 'गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशीं' यातील 'पाशीं' हा शब्द 'पाशात' (पाशचे सप्तमी एकवचन) या अर्थाने योजलेला असल्यामुळे येथे अनुस्वार दिल्यावाचून अर्थसौंदर्यच प्रतीत होणार नाही."

कांही, याकरतां, आतां, केंस ह्यासारख्या शब्दांचे सानुनासिक उच्चारण आता फारसे कोणी करत नाही. मात्र, अनेकवचन वा अर्थांतील फरक दर्शविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या (अर्ध)सानुनासिक शब्दांचा उच्चारही आता इतिहासजमा झाला असावा की काय, अशी शंका वाटते. वचनातील फरक दर्शविणारी बिंदुचिन्हे वा अनुस्वार हे अनुच्चारित अनुस्वारांत मोडत नसून त्यांचा अंतर्भाव लेखनात करावा असे शुद्धलेखनाचे नियम सांगतात. उदाहरणार्थ, 'डोळ्यात' आणि 'डोळ्यांत' ह्या दोन शब्दांत वचनाचा फरक आहे. सहसा 'डोळ्यांना दिसले', 'डोळ्यांतले अश्रू पूस', 'कानांनी ऐकले', 'त्यांच्या मराठी नाटकांतील भूमिका' वगैरे वाक्यांमध्ये दोन्ही डोळ्यांना दिसणे व दोन्ही कानांनी ऐकणे अभिप्रेत असले; अनेक नाटकांमध्ये केलेल्या भूमिका अपेक्षित असल्या तरी अंकसमितीकडे आलेल्या लेखांत सर्रास 'डोळ्याना दिसले', 'कानानी ऐकले', 'नाटकातील भूमिका' अशा प्रकारे वाक्यरचना केलेली आढळते. अनेकवचने लिहिताना ही मंडळी एक फरक मात्र करताना दिसतात. जेव्हा 'मध्ये'ची शब्दयोजना असते, उदाहरणार्थ डोळ्यांमध्ये, नाटकांमध्ये, तिथे अनुस्वार विसरण्याचे प्रमाण कमी असते. मात्र, जेव्हा सप्तमीचा 'त' प्रत्यय लावून केलेले अनेकवचन असते, उदाहरणार्थ डोळ्यांत, कानांत, नाटकांत, तिथे अनुस्वाराचा उच्चार पूर्ण होत नसल्यामुळे (वा हल्ली आपण तसा तो करत नसल्यामुळे) तो लिहिण्याचे हमखास विसरतात. उच्चारानुसार लेखन करण्याच्या लोकानुनयी पद्धतीच्या अतिवापरामुळे आवश्यक ठिकाणी सानुनासिक उच्चार आणि अनुस्वारयुक्त लेखन करण्याचे आपण विसरू लागलो आहोत का? अनुच्चारित अनुस्वार काढता काढता आपण आवश्यक अनुस्वार आणि त्यांचे सानुनासिक उच्चारही गमावत आहोत का? संदर्भाशिवाय योग्य अर्थाचा बोध करून देणाऱ्या अनुच्चारित अनुस्वारांचा मराठी शुद्धलेखनपद्धतीत पुन्हा समावेश करावा का?

सध्या बोलण्याप्रमाणे लेखन करणाऱ्यांची चलती आहे. क्रियापदे, नामे व अव्ययांची बोलीभाषेतील रूपे दर्शविण्यासाठी त्यांवर बिंदुचिन्ह देण्याची प्रथा आहे. उदाहरणार्थ, 'त्याच्यामुळंच असं झालं'. संवादलेखन वगळता सार्वजनिक छापील लेखन हे बोली भाषेत न लिहिता प्रमाणभाषेत लिहायला हवे. मात्र हल्ली दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांतील बातम्यांपासून वैचारिक लेखांपर्यंत, बोली रूपांचा वापर सर्वत्र होताना आढळतो. बोली रूपे लिहिताना त्यांवर दिली जाणारी बिंदुचिन्हे वा अनुस्वार हे अर्थातच अनुच्चारित असतात. अशाप्रकारे शासनाने नियम करून काढलेले अनुच्चारित अनुस्वार बोली भाषेतील शब्दांच्या लेखनातून पुन्हा अवतरले आहेत आणि लेखनामध्ये जोमाने फोफावत आहेत.

भाषेचे लेखन करणे हे योग्य उच्चार करण्यासाठी कमी व वाचणाऱ्यांच्या मनांत योग्य अर्थाचे संक्रमण करण्यासाठी जास्त महत्त्वाचे असते आणि म्हणूनच ते उच्चारानुसारी असणे अनिवार्य नसावे. बोलीभाषेमधील परिवर्तनाचा वेग लेखनातील परिवर्तनापेक्षा कधीही जास्तच असणार आणि त्यामुळेच बोलतो त्यानुसार लिहिता आले पाहिजे ही मागणी अवास्तव आहे. (डॉ. कल्याण काळे, 'मराठीचे लेखनसंकेत', भाषा आणि जीवन, दिवाळी २००८. ) 'ऋ' ह्या स्वराचा आणि 'ष' ह्या व्यंजनाचा उच्चार मराठीत नाही असे आता वाटत असले तरी 'ऋ' व 'ष' मराठीलेखनातून हद्दपार करून 'ऋषी' हा शब्द 'रुशी' असा लिहिणे योग्य ठरणार नाही. त्यापेक्षा 'ऋ' आणि 'ष' चे योग्य उच्चार शिकवावेत असे म्हणणारे कोणी का आढळत नसावेत? हीच कथा ब्राह्मण (ब्राम्हण), चिह्न (चिन्ह), आह्लाद/प्रह्लाद (आल्हाद/प्रल्हाद) ह्या आणि अशा इतर शब्दांचीही आहे. मराठी उच्चारानुसार हे शब्द लिहिल्यामुळे संस्कृत व इतर भारतीय भाषांशी असलेली मराठीची नाळ तुटते. तेव्हा उच्चार कसाही केला तरी लेखन प्रमाणभाषेत करणेच योग्य ठरावे. मराठी ही उच्चारानुसारी लेखन असणारी भाषा नाही. आपण बोलतो तसे लिहू लागलो तर 'बोल्तो तसच् ल्ह्याव' लागेल. बहुतेक अकारान्त शब्दांतील शेवटच्या व्यंजनाचा आपण संपूर्ण उच्चार करत नाही. तेव्हा ते शब्द पायमोडके लिहावे लागतील. उदाहरणार्थ, आपण्, करत्, माहीत्. नेमक्या ह्याच कारणासाठी बोलीभाषेतील शब्द लिहिताना आपल्याला अंत्याक्षरावर बिंदुचिन्ह द्यावे लागते, (उदाहरणार्थ, झालं, होतं, असं, वगैरे), कारण त्यातील अंत्याक्षराचा पूर्ण उच्चार अपेक्षित असतो. हे शब्द झाल, होत, अस असे लिहिल्यास त्याचा उच्चार झाल्, होत्, अस्, असा केला जाईल. म्हणजे, लिहिताना अंत्याक्षर पूर्ण लिहूनही त्याचा उच्चार पायमोडक्या अक्षरांप्रमाणे करायचा आणि वर बोलतो तसे लिहिता यायला हवे असे म्हणत त्याच अंत्याक्षरावर टिंब देऊन त्याला 'उच्चारानुसारी लेखन' म्हणायचे, हा विरोधाभास नाही का? अर्थात, क्वचित यांसारखे शब्द मराठीत पूर्वी अर्थात्, क्वचित् असे उच्चारानुसारी (व संस्कृताप्रमाणे) लिहिले जात. मात्र, प्रचलित नियमांनुसार त्यांचा पाय मोडणे चूक आहे. हाही विरोधाभासच झाला. तेव्हा असे शब्द पूर्वीप्रमाणे व्यंजनान्त का लिहू नये? लेखनपद्धतीमध्ये बदल करण्यापेक्षा आता आपले उच्चारच सुधारण्याची वेळ आली आहे काय, असा प्रश्न पडतो.

ह्या वर्षी प्रथमच श्राव्यसाहित्याचा स्वतंत्र विभाग अंकामध्ये समाविष्ट करत आहोत. लेखविषयांतील वैविध्य हे ह्या वर्षीच्या अंकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. मनोगताचे वैशिष्ट्य असणारी शब्दकोडी ह्या वर्षी अंकातही अवतरली आहेत. गद्य विभागात विज्ञानकथांचाही समावेश झाला आहे. रुचकर पाककृती, विविध पद्यप्रकार, कथा, अनुभव, अनुवाद, मुलाखत, पुस्तक-परीक्षण ह्यांनी अंक सजला आहे. हा साहित्यिक फराळ वाचकांच्या पसंतीस उतरेल अशी आम्हाला खात्री वाटते. अंकातील लिखाण वाचून त्यावरील आपल्या प्रतिक्रिया आपण त्या त्या लिखाणाखाली प्रतिसाद रूपात द्यालच. मात्र एक अंक ह्या दृष्टीने ह्या अंकावरील आपले अभिप्राय कृपया या ठिकाणी नोंदवावेत. आपले अभिप्राय वाचण्यास आम्ही उत्सुक आहोत. पाठीवरील शाबासकीची थाप आम्हाला हुरूप दे‌ईल तर त्रुटी दाखवणारे अभिप्राय भविष्यात अधिक चांगल्या अंकाची निर्मिती करण्यात मोलाचे साहाय्य करतील. तेव्हा आपल्या अभिप्रायांचे मनापासून स्वागतच आहे. अंकसमितीतर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


- वरदा व. वैद्य