शोध आईकमनचा: पृष्ठ (३ पैकी) ३
आईकमनला आरोप वाचून दाखवण्यात आले. पण त्याने हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. आपण केवळ आज्ञांचे पालनकर्ते आहोत, व्यवस्थाचक्रातील केवळ एक आरी आहोत हे पालुपद चालू ठेवले.
मात्र १४०० कागदपत्रे, १०० साक्षीदारांच्या साक्षी (ज्यातील ९० छळछावण्यांमधून वाचलेले होते) आणि १६ देशांच्या राजदूतांकडून आलेले बचावात्मक अर्ज ह्या सर्वांवर सखोल उहापोह होऊन, त्याच्यावरील गुन्हे सिद्ध होऊन त्याला ३१ मे १९६२ मध्ये फाशी देण्यात आले. तिन्ही न्यायाधीशांनी एकमताने निर्णय दिला की आईकमनला कोणत्याही प्रकारे वरून आज्ञा मिळाल्या नव्हत्या. तो स्वतःच त्याचा वरिष्ठ होता आणि ज्यूंशी संबंधित सर्व आदेश त्याने स्वतःच दिलेले होते.
आरोपी आईकमन
राजकीय परिणाम - १) अर्जेंटिना - संयुक्त राष्ट्र-संघात कडक निषेध नोंदणी. इझ्रायलशी राजकीय संबंध काही काळाकरता गोठवले. ४ महिन्यांसाठी इझ्रायलचे राजदूत श्री. एरी लेवेंट ह्यांना बडतर्फ करण्यात आले. २) जर्मनी - वस्तुतः आईकमन पकडला जाऊ नये ह्याची सर्वांत जास्त काळजी जर्मनीने घेतली कारण युद्धोत्तर अनेक नाझी अधिकारी जर्मन सरकारमध्ये उच्चपदावर काम करत होते. मुख्यतः हान्स ग्लोबके जो आता जर्मन राष्ट्राध्यक्षांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होता तो एकेकाळचा 'नाझी (SS)' च्या ज्यूसंबंधित विभागात आईकमनचा साहाय्यक होता आणि त्याने ज्यूंवर कठोर प्रतिबंध लादणाऱ्या न्यूरेंबर्ग कायद्याचा मसुदा लिहिला होता. आईकमन पकडला गेला असता आणि जर त्याने ग्लोबकेचे नाव आपल्या जवाबात घेतले असते तर जर्मनीची जगभरात आणखी एकदा छी-थू झाली असती. म्हणूनच आईकमनला इझ्रायलने न्यायालयात उभे केल्याचे समजल्यावर अस्वस्थ जर्मनीने लगोलग आपला हस्तक रोल्फ फॉगेल ह्याला जर्मन वृत्तपत्र डॉईच झायटुंगचा पत्रकार म्हणून पाठवले. आईकमनविरुद्धच्या खटल्यात त्याने पत्रकाराच्या वेषात इझ्रायली दंडाधिकाऱ्यांसोबत काम केले. एकदा तर त्याने पंतप्रधान बेन गुरीयन ह्यांची भेट घेऊन जर्मनीच्या वतीने इझ्रायलविषयी आपुलकी व्यक्त केली. पण जर्मनीच्या सुदैवाने ह्या खटल्यात जुनी मढी उकरली गेली नाहीत कारण इझ्रायलला खरेतर आता केवळ मेंगलसारख्या कसायांना पकडायचे होते.
सामाजिक परिणाम - १) आईकमनच्या फाशीनंतर २१ दिवसांनी अर्जेंटिनातील नाझी सहानुभूतीदारांनी एका १९ वर्षीय ज्यू युवतीचा क्रूर छळ केला. तिच्या अंगावर सर्वत्र नाझी स्वस्तिकाच्या डागण्या देण्यात आल्या. २) अनेक क्रूर नाझी गुन्हेगार जे अनेक देशांत अत्यंत मजेत जगत होते ते जिवाच्या भीतीने भूमिगत झाले. ३) जगभरांतील ज्यू लोकांना समाधान वाटले. ४) इझ्रायली नागरिकांचा आपल्या राष्ट्राविषयीचा आदर दुणावला. ५) जगभरांतील अनेक संवेदनशील नागरिकांना ज्यू धर्मीयांना न्याय मिळाल्याने आनंद झाला.
SSच्या गणवेशात आईकमन
१ जून १९६२ रोजी, म्हणजे आईकमनच्या फाशीनंतर दुसऱ्याच दिवशी, आईकमनच्या अस्थिरक्षा मेडिटरेनियन समुद्रात विखरून टाकण्यात आल्या, जेणेकरून भविष्यात कोणालाही त्याचे स्मारक बांधता येऊ नये. आईकमनचा मुलगा रिकार्डो ह्याने स्पष्ट केले की इझ्रायलवर त्याचा कोणत्याही प्रकारे राग नाही. कारण आईकमनच्या पश्चात्तापहीन वृत्तीमुळे त्याच्या कुटुंबीयांना कठीण भावनांचा सामना करावा लागला आणि क्रौर्याचे समर्थन करण्यासाठी आईकमनने दिलेली "आदेशाचे पालन" ही सबब तर तो कधीही स्वीकारू शकला नाही.
- मृदुला तांबे
Pages
- « first
- ‹ previous
- 1
- 2
- 3