समज गैरसमज

 "अरे देवा, काय वेळ आणलीस रे! खरंच किती वाईट झालं रे!कुणावर काय प्रसंग ओढवेल काही सांगता येत नाही रे!"
 हे बघ आई, तुला एवढा पुळका यायची काही गरज नाहीये,कळलं का?"
 अरे मेल्या एवढा कसा रे पाषाणहृदयी तू? मला तर खूपच वाईट वाटलं रे!"
 कसला पाषाणहृदय़ी आई? अगं केलेल्या कर्माची फळं भोगावी लागली दुसरं काय?
 अरे नुकतीच तिच्या घरी ती परत आली होती रे! पण दैवाने तिच्यासमोर काय वाढून ठेवलंय हे तिला शेवटपर्यंत कळलं नाही रे! एकदा असं झाल्यावर तिने काहीतरी बोध घ्यायला पाहिजे होता रे!
 हे बघ आई,तू काय बोलतेस ते मला काहीही कळत नाहीये. कसला डोंबलाचा बोध? उलट बरं झालं देवाने न्याय केला.नातेवाईकही म्हणाले की बरं झालं आम्हाला न्याय मिळाला.
 अरे मुर्खा,काय बोलतोयस काही कळतंय का तुला? चारचौघात म्हणालास तर लोक चपलेने मारतील.मग कळेल चांगलं!
 अगं आई लोक कशाला चपलेने मारतील मला? तु उगाच या घटनेचं उदात्तीकरण करु नकोस! कळलं?
 अरे बावळ्या तिकडे पाकिस्तानात हिंसाचार,जाळपोळ,दगडफेक चाललीये.वातावरण तणावाचं आहे आणि परिस्थिती चिघळलीये याची तुला काही कल्पना आहे का?
 काय? काय सांगतेस तू आई? हे प्रकरण एवढ्या लांबवर जाईल असं मला वाटलं नव्हतं. आणि पाकिस्तानचा काय संबंध याच्यात? पण तिथपर्यंत हे लोण पसरलं म्हणजे त्या आंतरराष्ट्रीय  टोळीला सामील होत्या की काय? बापरे! मग बरं झालं शिक्षा झाली ते!
 अरे पाषाणहृदया,अरे जरा अर्थ लागेल असं बोल रे! अरे तिला दोन मुलं आहेत रे! आता त्या मुलांचं कसं होईल रे?
 हे बघ आई, मुलांची एवढी काळजी होती तर असले उद्योग करायचे कशाला? शिवाय एक मुलगी तर तिच्या बरोबरच आहे. आणि अजून काही झालेलं नाही. वेळ पडली तर मुलांना तिला भेटता  येईल.तेवढी परवानगी असते आई!
 अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अरे आता त्यांची आई गेली रे त्यांना कायमचं सोडून. आता फक्त फोटोतून दिसणार रे ती!
[float=font:vijay;color:61AF38;place:top;] तू एवढी काळजी का करतेस? आणि असली स्त्रीमुक्ती छाप बडबड तू कधी पासून करायला लागलीस? फाशीची शिक्षा तर अजून व्हायची आहे.[/float]
 देवा देवा देवा! अरे आज तू काय झोकून आला आहेस काय? तुला हजारवेळा सांगितलं असली घाणेरडी व्यसनं सोडून दे म्हणून. अरे मेलेल्याला आता किती वेळा मारणार आहेस अजून?
 अगं आई आणि त्यांनी खून केला त्याचं काय? त्यांच्या घरच्यांना काहीच का वाटलं नसेल का? आता बसा म्हणावं खडी फोडत आणि आपले उरलेले दिवस मोजत!
 अरे कसली खडी आणि कुणाचे दिवस मोजायचे? तू काय बरळतोयस? अरे तिला गोळ्या घालून मारून पण टाकलं रे!

 काय?.... अगं आई तू कशाबद्दल बोलतीयेस?
 आणि गाढवा, तू कशाबद्दल बोलतोयस?
 अगं मी तर देवस्थळी मायलेकींबद्दल बोलत होतो.
 अरे देवा! मी तर बेनझीर भुट्टोबद्दल बोलत होते रे!
 आई! आई मी तुला समजून घेण्यात कमी पडलो गं आई!
 हो, रे! मी पण तुला नाही नाही ते बोलले!
 आई हा तद्दन फिल्मी समज गैरसमज झाला ना गं?
 होय रे बाळा! आपण मालिका बघणं कमी केलं पाहिजे रे!
 आणि मी पण वर्तमानपत्रांची पारायणं करणं सोडून देईन!
 आई मला क्षमा कर!
 होय रे बाळा तू पण मला क्षमा कर!

 सौरभ-