भाग-३

"अहाहा! वा! सुरेख! अहा,काय फटका मारलाय! काय ते चापल्य,काय ते पदलालित्य! वा,वा! नेत्रदीपक म्हणतात ते हेच असावे बहुधा!"
"बाळा, काय बघतोस रे टी.व्ही.वर?"
"आं? काय? कुठे काय आई? काय बरं आपलं ते? अगं हां, ते आपले भारत-ऑस्ट्रेलिया सामने चालू नाहीत का? तेच बघत होतो!"
"होका? कारट्या मी काय तुला आज ओळखते का रे? मेल्या, ते बायकांचं टेनिस बघत असशील. मेला टीव्हीला नुसता चिकटून बसलाय ,स्पर्धा सुरु झाल्यापासून!"
"आई,मानलं तुला बाई! तुझ्यापासून काहीही लपवणं अशक्य आहे. मी सुद्धा मला स्वत:ला एवढा ओळखत नसेन!"
"होका? कारट्या,स्पर्धा सुरु झाल्यापासून मी बघतेय, खाताना पिताना उठताना झोपताना बोलताना सारखं आपलं ते टेनिस घेऊन बसलाय. जरा त्या टीव्हीसमोरून बूड हालव आता. स्वयंपाक झालाय,गिळायला चल!"
"आलो गं माझे बाई! आलोच!"

"कसा झालाय रे स्वयंपाक? आवडला का तुला? खरं खरं सांग बरंका!"
"टाळता येण्यासारक्या ब-याच चुका झाल्या आहेत!"
"अरे देवा,तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय की काय? चार शब्द नीट बोलशील का नाही?""
"हे बघ आई तू मला खरं खरं सांगायला  भाग पाडलंस. ते नेट जवळ यायला भाग पाडतात नि चुका करायला भाग पाडतात ना अगदी तस्सं!"
"होका शहाण्या! बरं आपली सानिया आहे ना अजून?"
"आहे नाही होती! कधीच बाहेर पडली."
"चालायचंच रे, सूर गवसला नसेल! मला वाटतं सूरपारंब्या खेळताना पण तिला सूर गवसायचा नाही. पण मी म्हणते या पोरींना जरा अंगभर कपडे घालून खेळायला काय होतं रे?"
"अगं आई चालायचंच ते! स्पर्धेचं नावच आहे 'ऑस्ट्रेलियन ओपन'
"बाई बाई बाई! नालायका, तू बोलण्यात कधी हार जाणार आहेस का?"
"कसा जाईल आई? मी मानांकित आणि तू बिगरमानांकित असल्यावर अजून वेगळं काय होणार?"
"अरे देवा, ही धरणी आताच्या आता दुभंगून मला पोटात घेईल तर बरे होईल!"
"ते शक्य नाही आई!"
"का मुडद्या? का शक्य नाही? अरे तुझ्यासारखं रत्न पोटी आल्यावर काहीही शक्य आहे."
"हे हार्ड कोर्ट आहे. क्ले कोर्ट नाही, धरणीमातेला जरा अडचण होईल."
"अरे देवा, हद्द झाली आता! थांब! तू तसा सुधरायचा नाहीस."
"अगं आई, अगं थांब, अगं तू हे लाटणं कशाला घेतलंयस? अगं आई!"
"बघ, बघच तू आता!
"ओय! आं, अरे देवा, अगं आई! आं आउच! उई ओय आईगं! थांब अगं आई, अगं आई, थांबव ना ही बिनतोड सर्व्हिस!"
"अजूनही सुधरत नाहीस?"
"आउच ओय आं आईगं उई ओय ओई आउच आईगं! सॉरी! सॉरी! चुकून चुकलो आई, खरंच आई माफ कर आता!"
"मग तुझा सरळ सेटमध्ये पराभव झालाय हे मान्य कर आता!"
"करतो करतो!"
"शेरास सवाशेर शारापोवा मिळाली हे पण मान्य कर!"
"करतो माझे आई, तू म्हणेल ते मान्य करतो आता! चांगली खोड मोडली माझी!"

-सौरभ