पहिले पाढे पंचावन्न!

 आई,झाला! माझा निर्णय झाला आई! हीच वेळ योग्य आहे, आता अजून किती दिवस वाट बघायची? तुझ्याशी मी याबाबतीत सकाळी बोललो होतो!
 होय रे बाबा! झाला ना आता तुझा निर्णय? ठीक आहे, अरे असे निर्णय पाहिजे तर लांब ढकलता येतात पण कधीना कधी तरी घ्यावेच लागतात! आख्खं आयुष्य काढायचं असतं रे आपल्याला.
 ऑं? काय म्हणालीस? हे बघ आई, माझ्याकडे तेवढे पैसे पण जमले आहेत.पैशाची तशी काही चिंता नाहीये आता.
 पैसे जमले म्हणतोस? ठीक आहे. अरे अशा गोष्टींना पैसा लागायचाच. पैशाशिवाय का होतात अशा गोष्टी?
 आई,एवढे दिवस तू म्हणत होतीस पण आता तुझं स्वप्न खरं होईल आई! आई, तुझी दगदग संपली आता!
 होय रे बाबा हो! मला तरी आता कुठशा जमतंय हे सगळं? माझ्याने पण होत नाही रे आता!
 अगं आई,खूप सुंदर आहे! तू बघितलीस ना तर बघतच राहशील!
 काय? तू एवढं ठरवून पण टाकलंस? आणि बघून पण आलास? इश्श! भारीच उतावळा दिसतोस! एवढा उतावळेपणा चांगला नव्हे बरं का!
 अगं आई उतावळेपणा कसला? तसा अजून जूनपर्यंत वेळ आहे. पण आपण आपल्या तयारीने असलेलं बरं, काय?
 होय रे बाबा,बघता बघता दिवस जातील.तयारीला का थोडा वेळ लागतो?
 अगं आई मला तर कधी एकदा हुच्च मध्यमवर्गीय होतोय असं झालंय.
 झालं! म्हणजे एकंदरीत प्रकरण मोठंच दिसतंय. तू तर स्वप्न पण बघायला लागलास वाटतं?
 तसं नाही गं आई आणि तुला माहितेय का? ऍव्हरेज पण चालून जाईल.
 काय? जरा मोठ्याने बोल रे! एकदा म्हणतोस सुंदर आहे एकदा म्हणतोस ऍव्हरेज आहे. मला तर तुम्हा आजकालच्या पोरांची भाषाच कळत नाही बाबा!
 अगं आई असं काय करतेस? आणि तुला कित्तीदा सांगितलं ते आणलेलं च्यवनप्राश जरा नियमाने घेत जा. मी तुझं सगळं ऐकतो का नाही?
 ऐकतोस रे! तसा माझा अगदी गुण्णी बाळ आहेस तू. बरं मला एक सांग, रंग कसा आहे रे?
 आई, रंग काळा नाहीये हे अगदी खात्रीने समज.
 होका? छान छान! नाहीतर त्या शेजारच्यांसारखं नको व्हायला.
 हो आई, त्यांची निवड नाहीतरी जरा चुकलीच! अगं आयुष्यात अशा गोष्टी एकदाच जमतात.तेव्हा निवड काळजीपूर्वकच करावी.
 तेच म्हणते मी!
 बरं आई,सर्वप्रथम कुठे जाऊयात?
 इश्श्य! आता ते मी काय ठरवायचं? तू म्हणजे अगदी हा आहेस बघ. आज माझी पसंती विचारतोयस पण उद्या मला विसरु नकोस म्हणजे झालं!
 ऑं! अगं आई तुला कसा विसरेन मी? आज रतन टाटांमुळे आपल्यासारख्या मध्यमवर्गियाला हे शक्य होतंय!
 रतन टाटा? अरे देवा, रतन टाटांचा काय संबंध याच्यात? बापरे! हे म्हणजे परत मागच्या वेळेसारखं झालं वाटतं.

 अरे गाढवा, कशाबद्दल बोलतोयस तू?
 काय? आणि आई तू कशाबद्दल बोलत होतीस?
 अरे मी तर तुझ्या होणा-या बायकोबद्दल आणि माझ्या सुनेबद्दल बोलत होते रे!
 बोंबला! अगं आई मी तर टाटांच्या एक लाखाच्या गाडीबद्दल बोलत होतो!
 देवा,देवा,देवा!
 आई हा परत तद्दन फिल्मी समज गैरसमज झाला ना गं?
 होय रे बाळा! पण मी तर मालिका बघायचं बंद केलं होतं रे!
 आणि मी पण वर्तमानपत्रांची पारायणं करणं बंद केलं, तरी असं का झालं आई?
 काय करायचं बाबा? नेमकी संक्रांत आली बघ.
 हो,खरंच की! जाउदे आता आई, हा घे तिळगूळ!
 हो तू पण घे, आपण दोघांनी गोडाऐवजी जरा स्पष्ट बोलायची गरज आहे रे!
 खरंय तुझं आई. तिळगूळ घ्या स्पष्ट बोला!

 -सौरभ