फेब्रुवारी २८ २००८

ऊर्जेचे अंतरंग-१२

ह्यासोबत

ऊर्जेचे अंतरंग-१२

माहितीचे तक्ते केवळ वस्तुस्थितीचे निदर्शक असतात. त्यातील माहिती पासून ज्ञान मिळवणे हे त्या माहितीच्या निष्कर्षणावर अवलंबून असते. गेल्या प्रकरणात आपण आपल्या दैनंदिन व्यक्तिगत शारीरिक ऊर्जा गरजांचा ताळेबंद, तक्ता स्वरूपात मांडला. आता त्याचे निष्कर्षण करू या. म्हणजे त्यावरून निष्कर्ष काढू या.

प्रथमदर्शनी कळणारी माहिती ही की कुठलेही काम करायला लागणारी ऊर्जा ही त्या व्यक्तीच्या वजनासापेक्ष असते. जास्त वजनदार व्यक्तीस जास्त ऊर्जा लागते. सर्वसामान्य सडपातळ व्यक्तीच्या मानाने, अतिस्थूल व्यक्तीस दुप्पट ऊर्जा लागू शकते. बुद्धीजीवी कामे, प्रतीक्षा, दूरदर्शनवर कार्यक्रम पाहणे इत्यादी कामांचे फलित दोन्ही व्यक्तींसाठी सारखेच असले तरीही स्थूल व्यक्तीस अकारणच जास्त ऊर्जा लागते. अतिरिक्त शारीरिक क्षमतेची गरज असणार्‍या कामांत (जसे की वजन उचलणे, लाकडे फोडणे, माती खोदणे यांसारख्या) निदान स्थूल व्यक्तीला मिळणारे फल तरी निवेशी ऊर्जेच्या प्रमाणात जास्त असू शकते. मात्र एरव्ही, खायला काळ आणि भुईला भार अशीच अवस्था होते. जसजसा मनुष्य प्रगत होत गेला, तसतशी शारीरिकदृष्ट्या भरभक्कम असण्याची निकड क्षीण होत गेली. आजच्या घडीला स्थौल्य सक्षमखर्ची राहिलेले नाही. म्हणून स्थौल्य नसावे. मग अगदी किडकिडीत शरीर ऊर्जावापराचे दृष्टीने चांगले म्हणावे लागेल. हो. खरे आहे. मात्र वजन घटत जाते तसतसे क्षीण होणारे शरीर, उपजीविका चालवण्यास असमर्थ ठरू लागते, स्वस्थही राहू शकत नाही. तेव्हा समर्थ आणि स्वस्थ राहून जेवढे किमान वजन ठेवता येईल तेवढेच ठेवण्याचे नियोजन सर्वांनी करावे. तसे राष्ट्रीय धोरण ठरवण्याचीही गरज आहे.

स्थूलातून सूक्ष्माकडे होणारा प्रवास अपार फलदायी ठरत असल्याचे एक सुरस उदाहरण इथे देण्याचा मोह आवरत नाही. १९८१ मध्ये पहिला सूक्ष्मप्रक्रियक (micro-processor)  इंटेल कंपनीने बाजारात आणला. तो जेमतेम एखादे खेळणे चालवण्याची क्षमता बाळगत असे. आज तेवढ्याच आकारात बसणारा सूक्ष्मप्रक्रियक अक्खा पीसी सहज चालवू शकतो. छोट्या जागेत जास्तीत जास्त कळा (switches) बसवण्याच्या प्रगत तंत्रामुळे एक आणखीही चमत्कार साधला. तो म्हणजे १९८१ पासून आजवर सूक्ष्मप्रक्रियकांचे कर्तब/किंमत (performance/price) गुणोत्तर दरसाल दुपटीने वाढत राहिले. आज विकसित होत असणारे अब्जांश तंत्रज्ञान (nano-technology) उद्या निस्संशय जास्त सक्षम ठरणार आहे.

तेव्हा जेवढे हलके तेवढे चांगले. जेवढे सूक्ष्म तेवढे चांगले. तेवढे सक्षमखर्ची. हाच काळाचा संकेत दिसतो.

समर्थ आणि स्वस्थ राहण्यासाठीही हल्ली किमान एक तास चालणे, जागेवर धावणे इत्यादी व्यायामांची शिफारस केली जाते. कारण बदलेल्या जीवनशैलीमधे तेवढाही व्यायाम उपजीविकेच्या अर्जनात निष्पन्न होत नाही. तो जर उपजीविकेच्या अर्जनात निष्पन्न झाला तर एकाच ऊर्जावापरात व्यायाम आणि उपजीविका दोन्हीही साधतात. उदाहरणार्थ जंगलात मध गोळा करणारा एक आदिवासी दिवसभर जो मध गोळा करतो त्यावर त्याच्या कुटुंबाची उपजीविका चालते. दरम्यान तो जी धावपळ करतो, चढ-उतार करतो त्यामुळे त्याला वेगळ्याने व्यायाम करण्याची गरज राहत नाही. आणि म्हणूनच व्यायामासाठी अतिरिक्त ऊर्जा खर्च करण्याचीही गरज राहत नाही. तेच एक कारकून उपजीविकेसाठी डोंबिवली ते नरीमन पॉईंट ये-जा करतो, दिवसभर कष्ट करतो, ते कष्ट त्याला समर्थ आणि स्वस्थ ठेवू शकत नाहीत. त्याला बैठ्या जीवनशैलीमुळे अतिरिक्त व्यायाम करण्याची निकड भासते. काम आणि व्यायाम दोन्हींसाठी ऊर्जा लागते. व म्हणून तो वापरत असलेली ऊर्जा सक्षमखर्ची ठरत नाही. उपजीविकेच्या अर्जनात समर्थ आणि स्वस्थ राखू शकणारे व्यायाम गुंफलेले असणे नेहमीच सक्षमखर्ची ठरते. ते साधावे कसे हा एक निराळाच विषय होऊ शकेल. मात्र ते साधायलाच हवे हे निश्चित.

ह्याचा दुसरा भाग असा की व्यायामासाठी वापरली जाणारी साधने जर वीज बनवण्यासाठी वापरली तरीही हे साध्य होऊ शकेल. उदाहरणार्थ जागीच धावणाऱ्या दुचाकीला विद्युतनिर्मितीची साधने बसवली तर व्यायामही होईल आणि दरम्यान वापरलेल्या ऊर्जेचा बराचसा हिस्सा पुन्हा प्राप्त करून घेता येईल.

एक आश्चर्यकारक निरीक्षण म्हणजे प्रतीक्षा करण्यासही ऊर्जा लागते. पांढरपेशी लोकांच्या ऊर्जेचा अनाठायी अपव्यय केवळ ह्याच कारणाने सर्वाधिक होत असावा असा माझा समज आहे. लोकल ट्रेनमधे (कार्यालयात पोहोचेपर्यंचा वेळ प्रतीक्षेचा धरलयास) प्रतीक्षेच्या वेळेचा सदुपयोग मनोरंजन, ज्ञानवर्धन, सामाजिक संबंधांचे बळकटीकरण ह्यांकरता करण्याच्या प्रवृत्तीचे मूळ हा अपव्यय टाळण्याच्या गरजेतच सामावलेले आहे. अनाठायी प्रतीक्षा शक्यतोवर टाळावी. अशक्य ठरल्यास तिचा अन्यथा सदुपयोग करावा.

दुसरा तक्ता ऊर्जेच्या स्त्रोतांचा आहे. ऊर्जा कर्बोदके, प्रथिने व मेद ह्या तीन प्रकारच्या अन्नांपासून मिळते. प्रथिने व मेदे तेवढ्याच वजनाच्या कर्बोदकांपेक्षा नऊपट जास्त ऊर्जा देऊ शकतात. ती गरीबांना, श्रमजीवींना उत्तम. सधन, बुद्धीजीवी व्यक्तींचा कल अतिरिक्त प्रथिने व मेद सेवनाचा असतो. मात्र त्यांपासून ऊर्जा मिळवण्यासाठी त्यांच्या शारीरिक हालचाली अपुर्‍या पडतात. ऊर्जा अन्नपदार्थांत असते म्हणजे ते सेवन करताच ती आपोआप मिळते असे नसून त्यांपासून ऊर्जा मिळवण्याच्या शारीरिक क्षमतेवर ऊर्जा निष्कर्षण अवलंबून असते. क्षमतेबाहेर केलेले अन्नसेवन केवळ अनारोग्यास आमंत्रण ठरते.

तक्त्यात मांसाहाराचा उल्लेख असला तरीही हे नमूद करायला हवे की मानवी शरीर मांसभक्षणासाठी घडवलेले नाही. ते अनारोग्यकारक ठरते. त्यापासून ऊर्जा निष्कर्षण होत असतांना निर्माण होणारे अवशिष्ट पदार्थ कर्ककारक असतात. मांसाहाराचे अवशोषण होत असता ते निर्माण होऊन ३३ फूट आतड्यांतील संपूर्ण प्रवासात निवासी होऊन राहतात. त्यांना हाताळतांना आतड्यास कर्करोग होऊ शकतो. म्हणून मांसाहार निषिद्धच मानावा.

अन्न हा ऊर्जेचा स्त्रोत अवश्य आहे, मात्र त्यासोबतच ते मनुष्यास समर्थ व स्वस्थ राखण्याचे अमोघ साधनही आहे. केवळ ऊर्जा मिळवण्यासाठी नुसती साखरही चालली असती. मात्र केवळ साखरेने शरीर समर्थ व स्वस्थ राखण्याचे साधेल काय? हा कळीचा प्रश्न आहे. केवळ साखर सेवन केल्यास, शरीर तीपासून ऊर्जा मिळवणे कायम सक्षमखर्ची राखू शकणार नाही. म्हणूनच म्हटले आहे की (केवळ ऊर्जेसाठी) उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म. यज्ञाहुतींची व्यवस्थित निवड करणे हेच इष्ट.

Post to Feedअभ्यासपुर्ण माहिती
आधीचेही दहा भाग वाचावेत ही विनंती!
मान्य
हेही वाचून पाहावे आणि अभिप्रायही अवश्य द्यावा!

Typing help hide