मार्च २२ २००७

ऊर्जेचे अंतरंग-०१

ह्यासोबत

ऊर्जेचे अंतरंग-०१: प्रस्तावना

आदिशक्तीची अनेक रूपे आपल्या संस्कृतीत सदैव पूजिल्या गेलेली आहेत. नव्या जगाच्या संदर्भात आदिशक्तीचे सर्वव्यापी रूप 'ऊर्जा' हे आहे. ऊर्जा म्हणजे ऊरात जन्म घेतलेली शक्ती. प्राथमिकत: जैव शक्ती. मात्र ऊर्जेचा वावर वस्तूमान, भौतिक ऊर्जा आणि जैव ऊर्जा ह्या मुख्य रूपांमधून होत असल्याने ही तीन रूपे प्रमुख मानावित.

वस्तुमानात ऊर्जा सामावलेली असते ह्याचे एक सर्वश्रुत उदाहरण म्हणजे जळण वा इंधन म्हणून वापरात येणारे सर्वच पदार्थ. त्या वस्तुमानातील ऊर्जा मोकळी केल्यावर वायूरूप प्रदूषणे आणि राखच काय ती उरते. दुसरे नेहमीच्या पाहण्यातले उदाहरण म्हणजे चंद्र. पृथ्वीवरील सागरांमध्ये भरतीओहटींची आवर्तने चंद्राच्या वस्तुमानाच्या आकर्षणापोटीच घडत असल्याचे आपण जाणतोच. वस्तुमानात अपार ऊर्जा सामावलेली असते. अवकाशीय घडामोडींमध्ये वस्तुमानाची ऊर्जा आणि ऊर्जेपासून वस्तूमान ह्या प्रक्रिया घडतच असतात. मात्र ह्या लेखमालेत वस्तुमानरूपातील ऊर्जेचा विचार करावयाचा नाही.

इथे विचार करायचा आहे तो भौतिक ऊर्जेचा. वीज, इंधन, जल-उत्प्रेरकगती, वायूवीजनस्फूरण, परिवहनगती इत्यादी चिरपरिचित ऊर्जास्वरूपांचा. ह्याच ऊर्जेवरील सत्ता, व्यक्ती, समाज वा देशाला गरीब किंवा श्रीमंत बनविते. अभावानेच जिचा प्रभाव उमजू लागतो तीच ही जगन्मोहिनी ऊर्जा. हिचा उगम अवश्य ऊरात होतो. मात्र भौतिकस्वरूपातील हिचे स्वामित्व जीवास सामर्थ्य देते. 'समर्थाचिया सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे' हे आपल्याला माहीतच आहे. आणि सामर्थ्याची साधना म्हणजेच ऊर्जेची आराधना. आजच्या युगात माहिती हेच अमोघ साधन आहे. ऊर्जेच्या अंतरंगाची माहिती करून घेतल्यानेच आपण सामर्थ्याची साधना करू शकू. ह्या उपक्रमाचे उद्दिष्टच ते आहे.

               anushot

संपन्नतेच्या शोधात माणसाने वस्तुमानातील अमोघ ऊर्जेचे विमोचन आणि उपयोग साध्य करून घेतले. वस्तूमानातील सूक्ष्मांश ऊर्जा जरी मुक्त करून वापरता आली तरीही आपल्या सामान्य ओळखीतील बव्हंशी ऊर्जा स्त्रोतांहून जास्त ऊर्जा उपलब्ध होते. उदाहरणार्थ वरील चित्रात एका सामान्य अणूस्फोटात मुक्त झालेली ऊर्जा पाहा. अशा स्वरूपातील सर्व ऊर्जाप्रकारांचे स्त्रोतनिदान, दोहन, वापर आणि हाताळणी ह्यांविषयीच इथे आपल्याला माहिती करून घ्यायची आहे.

                               yarbrog

ऊर्जेचे मूळ स्वरूप ऊरात स्फुरण पावलेली प्रेरणा, शक्ती. म्हणजे जैव ऊर्जा. जैव ऊर्जेचे स्वरूप, स्त्रोत, आवाका, क्षमता आणि उद्दिपन हा एक अत्यंत सुरस विषय आहे. ही एक २००१ सालची बातमी पाहा. अवाढव्य शरीराचा यारब्रोग तुलनेने किरकोळ अशा पोरिज़ो ला हारला. हे साध्य करणारी जी ऊर्जा असते ती खऱ्या अर्थाने 'जैव' ऊर्जा असते. तिची कहाणी नि:संशय चित्तवेधक आहे. मात्र तिचा विचार ह्या लेखमालेत करण्याचे प्रयोजन नाही.

Post to Feedस्वागत
छान माहिती

Typing help hide