अफलातून जाहिरातमाला संग्रह ( माळ पहिली )

(सहज विरंगुळा म्हणून हे लिहिले आहे. ज्या जाहिरातींवर हे आधारित आहे त्या मुळ जाहिराती आठवल्यास हे वाचतांना मजा येईल)

मणी क्रमांक एक :

'रोहते' या गावी एक 'वीर' खेळाडू , 'उसने' अवसान चेहेऱ्यावर आणून ऊस खाणाऱ्या एका 'पायल' वाजवत असलेल्या अभिनेत्रीला म्हणतो : "काय गं, तुझ्या मजबूत दातांचे रहस्य मला सांगतेस का?"

ती म्हणते : " असा ऊस खायला मजबूत दात हवेत. हे दातच नाही तर माझे शरिरसौष्ठव पण बघ. " ( असे म्हणून ती कमर हलविते)

वीर : " सांग ना गं, रहस्य! "

ती : " जांभूळ छाप जांभळे दंतमंजन. याने रोज दात घासल्याने असे माझ्यासारखे मजबूत दात आणि मजबूत शरिरयष्टी बनते."  ( मग ती पटापट सात आठ ऊस खाते )

( तर मग वाट कसली बघता? वापरा, जांभूळ दंतमंजन! मजबूत दात, मजबूत शरिरयष्टी! )

मणी क्रमांक दोन :

एक सुंदर मुलगी जमेल तेवढे अंगप्रदर्शन करत सकाळी सकाळी घरातील सदस्यांसमोर आंघोळीची योजना जाहीर करते :

" मी आंघोळ करायला चालली आहे, पुतळ्याची! "

सगळे घरातील सदस्य तीला बँड बाज्यासह पुतळ्याजवळ घेवून जातात. ती पुतळ्याची आंघोळ घालते.

( 'अक्स' पुतळा साबण! या सोबत एक यंत्र मोफत. ते पुतळ्याजवळ ठेवून त्यात साबण टाकून ठेवा, म्हणजे पुतळा थोड्या थोड्या वेळेने आपोआप धुतला जातो )

मणी क्रमांक तीन :

एक बायको रागारागात तणतणते : " मी चालले माहेरी कायमची "

नवरा पण फणफणतो : "चल, स्टेशनवर सोडायला येतो तुला "

( रागाने नवरा एके ठिकाणी बसतो. तोपर्यंत बायको कपडे भरते. एकजण नवऱ्याला एक 'सुपर' गरम तेल देतो. नवरा ते डोक्याला लावतो. तेल लावल्यामुळे तो भणभणत उठतो. घटस्फोटाचं सर्टिफिकेट तीला देतो.)

म्हणतो : " हे नाही का घेवून जाणार सोबत ?"

( बघितलंत आमच्या तेलाचा प्रभाव? झटपट असरदार !)