अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास-१

शि. टी. १ : (शिर-टीप : 'तळ-टीप'च्या विरुद्धार्थी) : आमचे गुरू पु. ल. देशपांडे यांनी (प्राचीन) मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास लिहिला. तसाच ते अर्वाचीन मराठी वाड. मयाचा (गाळीव) इतिहासही लिहिणार होते; पण ते राहून गेलं. ते आमच्या परीनं ('परी' हा शब्द 'कुवत' या अर्थी, गोष्टीतली परी नव्हे) करायचा आमचा प्रयत्न...

शि. टी. २ : * ही पु. लं. ची कोटी

'अर्वाचीन' म्हणजे काय?

प्रथम आम्ही 'अर्वाचीन'ची व्याख्या शोधून काढली. आमच्या एका मित्रवर्यांनी 'अर्वाचीन' आणि 'अर्वाच्य' या शब्दांत गफलत केली. त्यांना साहित्यातलं काही कळत नाही. (नुसतेच वाचक आहेत. *)... अर्थात बरीच अर्वाचीन पुस्तकं वाचल्यावर आमचीही या शब्दांत गफलत व्हायला लागली.

आमचे दुसरे एक मित्र म्हणाले, 'याचा चीनशी काही संबंध आहे का हो? ' त्यांनी '१९६२ नंतरचं ते अर्वाचीन' असं सुचवलं.

शेवटी आम्ही 'जे प्राचीन नाही ते अर्वाचीन आणि जे अर्वाचीन नाही ते प्राचीन' अशी एक सोपी, सुटसुटीत आणि सर्वांना समजेल अशी व्याख्या तयार केली.

कादंबरी

कुठल्याही कसलेल्या टीकाकाराप्रमाणं (याला 'समीक्षक' असंही म्हणतात; पण आम्ही नम्रपणे टीकाकार हा शब्द वापरू इच्छितो) आम्ही प्रथम 'कादंबरी' हा प्रकार हाती घेतला. जाड-जाड कादंबऱ्या वाचनालयातून आणल्या. विकत घेण्यात पैसे खर्च केले नाहीत, याचा वाचल्यावर (म्हणजे जिवंत राहिल्यावर) मनस्वी आनंद झाला.

प्रथम आद्य कादंबरीकार ह. ना. आपटे यांच्या कादंबऱ्या वाचल्या. अतिशय प्रभावित झालो. त्यांनी अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. उषःकाल, सूर्योदय, सिंहगड, वज्राघात, कालकूट इ.; पण लोकांच्या लक्षात एकच कादंबरी आहे - पण लक्षात कोण घेतो? (शि. टी. ३  - बहुतेकांच्या फक्त हे नावच लक्षात आहे. ) शेवटी साहित्य संस्कृती मंडळानं तिचं इंग्रजी भाषांतर करून तिला इतिहासजमा करून टाकलं.

यानंतर आमचं लक्ष इतर कादंबरीकारांकडे वळलं.... 'आनंदी-गोपाळ' ही कादंबरीही आवडली. (ती सत्यकथा आहे असं मागाहून कळलं). वि. स. खांडेकर, ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्यांपर्यंत पोहोचलो आणि वज्राघात (की 'उल्का'पात खांडेकर गुरुजी?) झाला! एकेका कादंबरीतली भाषा बघून थक्क झालो. फडक्यांच्या बाबतीत या भाषेला 'शृंगारिक' म्हणतात असं कळलं.... खांडेकरांच्या बाबतीत 'आलंकारिक'. (पुढे भाऊ पाध्ये, ह. मो. मराठे आदींनीही आपापल्या शैलीत कादंबऱ्यांमध्ये भर घातली... आम्हांला 'अर्वाचीन'ची आमच्या मित्रवर्यांनी सुचवलेली व्याख्या पटायला लागली. )

मग पुन्हा आमचा मोर्चा ऐतिहासिक कादंबऱ्यांकडे वळला. रणजित देसाईंच्या 'श्रीमान योगी' आणि 'स्वामी' कादंबऱ्यांमधून इतिहास गोष्टीरूपानं वाचायला मिळाला. (नाथ माधव, ना. सं. इनामदार यांचीही नावं गोष्टीरूप ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या इतिहासात घेणं आवश्यक आहे.) 'शिवाजी महाराजांवर लिहिणारे बहुतेक सर्व लेखक अनुत्तीर्ण आहेत. त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त गुण देसाईंना द्यावे लागतील', असं काहीसं नरहर कुरूंदकरांनी म्हटलेलं आठवलं.  आम्ही 'राजा शिवछत्रपती' हा पुरंदऱ्यांनी लिहिलेला इतिहास आधीच वाचलेला होता, त्यामुळे 'श्रीमान योगी' वाचून काय मिळालं याचा विचार अजूनपर्यंत करत आहोत.

यानंतर आमची नजर छत्रपतींकडून 'छाव्या'कडे गेली. शिवाजी सावंतांनी 'संस्कृतमिश्रित मराठी' हा एक नवीन भाषाप्रकार वाचकांसमोर आणला. फक्त त्यांतल्या काही शब्दांची रूपं मात्र बदललेली आहेत. उदाहरणार्थ, 'जगदंबा' हा शब्द 'जगदंब' असा होतो - आठवीच्या 'संस्कृत' पुस्तकातल्या (१०० गुण) 'माला' शब्दाप्रमाणे न चालता 'देव' शब्दाप्रमाणे चालवायला हवा असं वाटतं. 'छावा' कादंबरीत अनेक ऐतिहासिक तपशील त्यांनी अगदी अचून दिले आहेत. औरंगजेबानं पकडल्यावर संभाजीराजांचं (आणि कवी कुलेशाचं) तोंड उघडायला किती माणसं लागली, इत्यादी.  'मृत्युंजय' वाचल्यावर मात्र 'ययाती'पेक्षा कर्ण कितीतरी चांगला होता असं मनापासून वाटून जातं. असं असलं तरी काही ठिकाणी ऐतिहासिक तपशील अचूक, तर काही ठिकाणी ढोबळ अशी या पुस्तकांची गत झाली आहे. (द्रौपदी स्वयंवरात कर्णार्जुन युद्ध बाण संपल्यामुळे संपतं, सोयराबाईचा मृत्यू विष पिऊन होतो, इत्यादी.)

इतिहास कुणी पाहिला आहे? त्यामुळे कादंबरीतून इतिहास वजा करून आम्ही कोकणात गेलो. तिथे एक बरं - सारे प्रवासी घडीचे! ऐतिहासिक असं कुणीच नाही. 'बापू', 'राधा', 'खोत' अशी साधी माणसं. पर्ल बकनं चीनमधल्या साध्या माणसांवर पुस्तक लिहून नोबेल पारितोषिक मिळवलं होतं असं कळलं... आमचा देशी/मराठी बाणा जागा झाला आणि आम्ही मुंबईत परतलो.

गो. गं. पारखींच्या 'कथा कुणाची व्यथा कुणा? ' या नाटकात एक वाक्य आहे, 'लग्नापेक्षा भानगड गोड असते, सत्यकथेपेक्षा कादंबरी चटकदार असते'. म्हणूनच की काय, पण अनेक प्रथितयश कथाकार, नाटककार, कवी, विनोदी लेखक इत्यादींनी कादंबऱ्या लिहिल्या. एखादा फलंदाज, हाती चेंडू दिला तर कधी तरी दांडी गुल करून जातो, तशा त्यातल्या काही कादंबऱ्या आहेत.  (आठवा रॉबीन उथ.. उत.. उथ्थप्पा! ... बऱ्यांच दिवसात उडपी हॉटेलात न गेल्याने हा शब्द लिहायला जरा त्रास झाला.). चिं. त्र्यं. खानोलकरांनी 'रात्र काळी घागर काळी' लिहिली. आचार्य अत्र्यांनी 'चांगुणा' नावाची चांगली कादंबरी लिहिली.  पु. लं. नीही 'एका कोळियाने' लिहिली. (भाषांतर असलं म्हणून काय झालं... तशी त्यांची अनेक नाटकंही रूपांतरितच आहेत.) गंगाधर गाडगीळही मागे राहिले नाहीत. त्यांनी टिळकांवर 'दुर्दम्य' नावाची कादंबरी लिहिली. त्यात टिळकांना काय नावं ठेवावीत असा त्यांना प्रश्न पडला. 'बाळ' म्हणणं फारच बाळबोध, 'बाळासाहेब' त्या काळात म्हटलं जात नसे आणि टिळकांचं पाळण्यातलं नाव 'केशव' होतं हे अगदीच थोड्या लोकांना ठाऊक! (आम्ही शाळेत तिसरीच्या परीक्षेत हे नाव लिहिल्याबद्दल आमचे गुण कापले होते हे अजून लक्षात आहे. ) शेवटी गाडगिळांनी त्यांना, म्हणजे लोकमान्यांना, 'बळवंतराव' हे नाव दिलं.

असो. 'रारंगढांग' ही आम्ही अलीकडेच वाचून पूर्ण केलेली एक कादंबरी. (ढांग या शब्दाचा अर्थ इथे टांग असा नसून पर्वत-कडा असा आहे.) ती वाचल्यावर हा कादंबऱ्यांचा इतिहास एका वाक्यात लिहावासा वाटला.

'शंभराहून अधिक वर्षं मराठीत कादंबऱ्या लिहिल्या जात असून त्यातल्या काही कादंबऱ्या वाचण्यासारख्या आहेत. '

(क्रमशः)

- ख. रे. खोटे