अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास-३

शि. टी. १: त्यांना 'एकता कपूर थिसीस' तेव्हाच अवगत झाला होता. (ते डोळस कवी आहेत. )
शि. टी. २: म्हणजे हनीमूनचे का रे भाऊ?

कविता

कवींना 'जे न देखे रवी' ते दिसतं म्हणे. बरोबरच आहे. रवी बिचारा (न) बोलून (न) चालून निर्जीव! त्याला दिसणार कसं? पण ही ओळ एका कवीचीच असल्यामुळे कवी किती डोळस असतात हे आपल्या चांगलं लक्षात येईल!

असं असूनही कवींबद्दल सुरुवातीला आम्हांला विशेष प्रेम वाटू लागलं. कारण त्यांच्यातले बरेच जण आमच्याप्रमाणेच टोपणनावं घेऊन लिहिणारे! टोपणनावं घेतलेलेच कवी पारितोषिकं पटकावतात ही वस्तुस्थिती आहे. केशवसुतांनी जर 'दामले मास्तर' हे नाव लावलं असतं तर बिगरी ते मॅट्रिकपर्यंतच्या सगळ्या पोरा-पोरींना 'स्फूर्ती' आली असती आणि त्यांनी केशवसुतांची 'तुतारी' मोडून त्यांना 'काय म्हणावे या स्थितीला - जा पोरी जा! ' असं म्हणत बसायला लावलं असतं! कुसुमाग्रजांचंही तेच. 'शिरवाडकर' या नावात नाट्य असेल कदाचित; पण काव्य नक्कीच नाही! करंदीकर तर त्यांहून हुशार! त्यांनी दुहेरी खेळी खेळली. आडनाव 'क'वरूनच ठेवलं (शि. टी. १) आणि नावातल्या 'गो'ची गच्छंती केली! परिणाम - 'आधुनिक मराठीचे आद्य कवी' ही उपाधी आणि दोन ज्ञानपीठं! (हे मराठीचे 'बिग थ्री'. )

गोविंदाग्रज, बालकवी, ज्युलियन, आरती प्रभू, ग्रेस, बी हे सगळे टोपणनावांमुळेच यशस्वी होत गेले. तरी बरं - ग्रेसच्या 'चंद्रमाधवीच्या प्रदेशां'चा (शि. टी. २) शोध लावताना वास्तविक अनेक तरुण म्हातारे झाले (निदान आम्ही तरी)!  

हे सगळे कवी काव्यरसात न्हात असताना खऱ्या नावानं लिहिणाऱ्या कवींची परिस्थिती मात्र बिकट झाली होती - मर्ढेकरांच्या पिंपात उंदीर पडले.   आधी त्यांनी 'दवात आलिस, भल्या पहाटे' ही कविता लिहिली होती; पण उंदीर बघून त्यांचा चेहेरा आंबट झाला आणि त्यांनी 'भंगू दे काठिन्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे' लिहायला सुरुवात केली. ('मनीचे' म्हणजे 'मनातले', 'मांजराचे' या अर्थी नव्हे; मांजरानं आवडीने उंदीर खाल्ले असते. ) भा. रा. तांब्यांनी भाराभर कविता लिहिल्या; पण त्यांनीही शेवटी 'जन पळभर म्हणतिल हाय हाय' या गालिबनं म्हटलेल्या सत्याचा स्वीकार केला. रेव्हरंड टिळकांनी 'निंदा-स्तुतीचा जगी तमाशा फंदी तू त्या पडू नको' किंवा 'मी ओळखीले मला पूर्ण आता' अशी स्वतःची समजून घालून घेतली. इंदिरा संतांनी बावरून 'रंगबावरी' हा कवितासंग्रह लिहिला; तर बोरकरांनी 'तेथे कर माझे जुळती' अशी स्पष्ट कबुली देऊन टाकली!

पुढे पुढे हा 'ट्रेंड' बदलू लागला. बापट-पाडगावकर-करंदीकर यांनी मग त्रिकुटांची कल्पना पुढे आणली. बापट समाजवादी असल्यामुळे त्यांनी 'देह मंदिर, चित्त मंदिर' ही दोन प्रार्थनास्थळांत चालेल अशी एक प्रार्थना लिहिली; पण तिच्यात 'ना'चं यमक आल्यामुळे भक्त आणि देव दोघांनीही ती नाकारली (यशवंत देव सोडून)! मग त्यांनी गणपतीची गाणी लिहिली. 'येशिल येशिल येशिल राणी पहाटे पहाटे येशिल' हे गाणं लिहिलं. (त्यांच्या बिचाऱ्यांच्या आयुष्यात शतकानंतर एक रम्य पहाट यायची - आपण समजून घेतलं पाहिजे. ) पाडगावकर तर मराठी काव्यातले 'सखाराम गटणे'! सगळे काव्यप्रकार त्यांनी फाडून खाल्ले - कविता, गीतं, गझला, न-गझला, दोहे, बालगाणी, बोलगाणी इ. इ. इ... राजा बढे, ग. दि. माडगूळकर, शांता शेळके, सुधीर मोघे यांनीही 'गीतं' लिहिण्याचे कारखाने काढले. 'गीत हवे का गीत? एका मोले विकतो घ्या रे विरह आणखी प्रीत' असं म्हणत गदिमांनी गीतरामायण लिहिलं. (अगदीच खेबूडकर, नांदगावकर, दवण्यांपर्यंत जायला नको. )

सुरेश भटांनी मात्र गझलेची वाट सोडली नाही. (ही ओळ' विक्रमादित्याने आपला हट्ट... 'च्या चालीवर म्हणावी. ) त्यांनी 'नाही म्हणावयाला आता असे करूया' असं म्हणत माणसांपासून गांडुळापंर्यंत सर्वांना शेरांच्या तोंडी दिलं! (शेरांचा गांडुळाशी आलेला हा एकमेव संबंध. ) त्यांनी लिहिलेली गझलेची बाराखडी वाचून पुढे अनेकांना 'ग'ची बाधा झाली. हे सगळे गझलकार मग भटांच्याच ओसरीवर पथारी पसरून 'मराठी गझल भोंदूंच्या विळख्यात', 'गजले'तला 'ज' झगड्यातला की जबड्यातला? ' असे वाद घालू लागले. ('गज्जल' असाही एक शब्द पूर्वी प्रचलित होता. आम्हांला तो बरोबर वाटतो. कारण 'मराठीत तीन अक्षरी शब्दांत मधले अक्षर 'ज' आले असता जोडाक्षर होते. ' पाहा- हुज्जत, इज्जत, इ. )

असं होऊनही कविता छंदी लोकांपासून मुक्त होऊ लागली. ना. धों. महानोरांना राजकारणाचा छंद जडला. नारायण सुर्व्यांनी 'कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते' असं म्हणायला सुरुवात केली... हे आम्हांला अगदी पटलं. कारण रद्दी विकून आयुष्यभर बसून खाता येईल एवढे कवितासंग्रह निर्माण होत होते (अजूनही होत आहेत). त्यांतल्या काही कवितांपेक्षा 'आकाशवाणी पुणे - सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे' किंवा 'आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि हवामान अंदाज' हे जास्त गेय वाटतात हा भाग वेगळा!... अशा कविता(? ) वाचताना आम्हांला कुसुमाग्रजांच्या 'नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे' या ओळींची पदोपदी आठवण होत होती. वास्तविक पदोपदी म्हणणं चूक आहे, कारण त्यांत पदं होती कुठे?

गद्यच 'पद्य' म्हणून वाचण्यापेक्षा पुन्हा गद्य का वाचू नये, असा आम्ही विचार करू लागलो.   तात्पर्य काय -

मराठीत, कवींची संख्या भरपूर, कवितांची संख्या अगणित, मात्र 'आठवणीतल्या कविता' एकूण कवींच्या संख्येहून कमी आणि वाचकांची संख्या या सर्वांपेक्षा कमी, अशी स्थिती आहे. *

(क्रमश:)

- ख. रे. खोटे

(* या ओळीचं आलेखात रूपांतर करायचं होतं; पण हे मनोगतावर कसं करतात हे अजून समजत नाहीये. )