अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास-२

शि. टी. १ - डोके असल्याची जाणीवही झाली.  
शि. टी. २ - ही अत्र्यांची कोटी.

विनोदी लिखाण

जाड-जूड कादंबऱ्या वाचून हात (आणि डोके) जड झाले. (शि. टी. १.) त्यावर उपाय म्हणून आम्ही विनोदी लिखाणाकडे वळलो.

विनोदी लिखाणास 'साहित्य' म्हणावं की नाही याबद्दलच अनेक मतं आहेत. शिवाय विनोदी लिखाणाला इतिहास नाही.  रामदासांनी 'टवाळा आवडे विनोद' असं म्हटल्यामुळे मराठ्यांचं राज्य असेपर्यंत कुणी विनोदाच्या वाटेला गेलं नाही. (तशी अनेक बखरींमधली स्तुतीपर कवनं विनोदी म्हणून खपायला हरकत नाही. )

'विनोदी लिखाणात राम नाही' - एक समीक्षक.

'विनोदी लिखाणात कृष्ण आहे';  'विनोदी लिखाणात लक्ष्मण आहे' - आम्ही. (पाहा - श्रीपाद 'कृष्ण' कोल्हटकर, पुरुषोत्तम 'लक्ष्मण' देशपांडे, नुसतेच 'लक्ष्मण' देशपांडे. ) कोल्हटकरांनी नाटकं लिहिली. विरंगुळा म्हणून विनोदी लिखाण केलं. तसं राम गणेश गडकरींनीही केलं. त्यामुळे 'विनोदी लिखाणात रामही आहे' असं आम्हांला सांगावंसं वाटतं. 'पुरुषोत्तम' हा शब्दही रामाच्या बाबतीतच वापरला जातो हेही विनोदाच्या वाटेला जाता-जाता सांगायला हरकत नाही.

पु. ल. देशपांडे हे मराठी विनोदाचे 'डॉन' म्हणता येतील. (हा शब्द आचार्य अत्र्यांना जास्त शोभून दिसला असता. पण दिलीपकुमार  की अमिताभ या वादाप्रमाणे हा वाद घालायचा की नाही हे आम्ही वाचकांवर सोपवतो. शाहरुख खानही आम्हांला आठवला होता; पण त्याचा 'डॉन' फ्लॉप गेला असं ऐकतो. ) पु. ल. हे पॉप्युलर लेखक. त्यांच्याबद्दल लिहिण्यापूर्वी त्यांची ज्ञानेश्वरांबद्दलची काही वाक्यं संदर्भासाठी घेणं आवश्यक आहे -

'एकदा पुस्तक खपू लागले की लेखक खपला असे मानावे. ' (म. वा. गाळीव इतिहास पृ. २१)
'यशामुळे अपयशी'... 'अशी लोकप्रियता लाभल्यावर वाङ्मयाचा दर्जा खाली येणारच. ' (म. वा. गाळीव इतिहास पृ. २३)

आम्ही हीच वाक्यं पु. लं. च्या बाबतीत लिहू इच्छितो.  मात्र त्यांच्यात ज्ञानियाचा अंश होता की तुकोबाचा हे शोधणं आवश्यक आहे. कारण तुकोबाप्रमाणे त्यांनीही अनेक धंदे केले. मराठीची प्राध्यापकी केली. 'काय शिकवायचं असतं हो त्यात? ' असं रावसाहेबांनी विचारल्यावर प्राध्यापकी सोडून चित्रपट काढले. नाटकं लिहिली. पहिलं नाटक 'तुका म्हणे आता' पडदा उघडताच वैकुंठवासी झालं. (हा तुकारामाशी अजून एक संबंध. ) मग ज्याप्रमाणे तुकोबांनी धंद्याचं वाटोळं झाल्यावर 'उरलो उपकारापुरता' म्हटलं, तसं पु. लं. नि 'आमचा हसवण्याचा धंदा' असं म्हणून टाकलं. ह्या धंद्यात एक बरं होतं. खोट्याला खऱ्यापेक्षा जास्त भाव. त्यामुळे 'धोंडो (बेंबट्या) कडमडे जोशी'पासून 'मंगेश साखरदांडे' ('उरलं सुरलं') पर्यंत अनेक खोट्या नावांनी लिखाण केलं. मात्र जिथे प्रसिद्धी हवी होती तिथे खरं नाव सांगितलं. (आठवा - 'वाऱ्यावरची वरात'मधले 'नुसतेच देशपांडे'. )

पु. लं. ना आम्ही विनोदी लेखक मानत नाही. त्यांच्या विनोदी लिखाणात बिल्कुल 'कन्सिस्टंन्सी' नव्हती. 'व्यक्ती आणि वल्ली' मध्ये नंदा प्रधान हाच प्रधान ठरला. (सर्वांत जास्त पानं त्याच्यावर खर्च झाली. ) 'हरितात्या', 'चितळे मास्तर', अगदी 'बबडू'सुद्धा हसवता हसवता रडवून गेले आणि शेवटी स्वत: पु. ल. ही असेच रडवून गेले...!

वास्तविक पु. ल. हे टीकाकार. विनोदी लेखन हे त्यांचं अस्त्र होतं असं आमचं मत आहे.  त्याकाळच्या समस्त आचार्य मंडळींना त्यांनी अगदी पळता भुई थोडी केली होती (अगदी 'तुझे आहे तुजपाशी' पासून ते आचार्य बाबा बर्वे - मु. पो. 'बटाट्याची चाळ' पर्यंत).  'आचार्य' अत्र्यांना मात्र त्यांनी अगदी चतुराईनं वगळलं.  

पु. लं. च्या यशाचं कारण पु. लं. च्या पुस्तकांत, ध्वनिफितींत शोधायचा आम्ही प्रयत्न केला. पण कारणं सापडेनात. हा प्रश्न 'आहे मनोहर तरी' वाचून सुटला. या माणसात विलक्षण हिंमत होती. जो माणूस गाडी बायकोला चालवण्यासाठी देऊन शेजारी (वसंतराव देशपांडे इ. मित्रांशी) हसत-खिदळत बसू शकतो, तो जगात काय वाटेल ते करू शकेल.

आचार्य अत्रे हे तर हिंमतीच्या बाबतीत अव्वलच. अजस्र देह, त्याला शोभणारा 'आवाज' आणि 'आवाज कुणाचा' असं विचारण्याची कुणालाही हिम्मत होणार नाही अशी भाषा! त्यांनीही सिनेमा, पत्रकारिता या क्षेत्रांत भटकता भटकता विनोदी लिखाण केलं.  भाषांतरित विनोदी नाटकांचा पायंडा पाडला. मोपांसा ('म्होप हसा' - शि. टी. २) हे नाव त्यामुळे लोकांना कळलं. 'कवडीचुंबक' नाटकातले योगायोग बघून तर मनमोहन देसाईंनीसुद्धा दिलेरखानाप्रमाणे 'तोबा तोबा' म्हटले असते! त्यांनी (म्हणजे अत्र्यांनी, देसाईंनी नव्हेत) जीवघेणी विडंबनं केली. अखेर प्रायश्वित्त म्हणून बहिणाबाईंच्या ओव्या संपादित केल्या.

चि. वि. जोशी या दोघांच्या मानानं साधे-सुधे. आपल्या लिखाणाला 'चऱ्हाट' असं त्यांनी स्वतःच म्हणून टाकलं.  चिमणराव जोग आणि गुंड्याभाऊ यांनी कधी जुनं मॉडेल असलेली मोटार चालवून, कधी घरी स्वयंपाकीण काकू आणून तर कधी मुंबईत गुंड्याभाऊला आजारी पाडून लोकांचं माफक मनोरंजन केलं. त्यांच्या मौज-मजेची मजल मात्र मुळा, मुठा आणि फार तर मुंबई यांच्यापुढे गेली नाही. (चिमणरावाची काशी यात्राही मुंबई-पुण्यातच संपली. )

विनोदी लेखकांत वसंत सबनीस, दिलीप प्रभावळकर, शिरीष कणेकर इत्यादींचाही समावेश होतो. लता मंगेशकर -आशा भोसलेंच्या समकालीन गायिका सांगा म्हटल्यावर जशी सुमन, सुधा अशी दोन-चारच 'स'कारात्मक उत्तरं मिळतात त्यातला हा प्रकार.  उर्वरित विनोदी लेखक नुसतेच ठणठणपाळ...

काही पुस्तकांची नावंच विनोदी आहेत. 'सह्याद्रीची चोरी' (रमेश मंत्री), 'बाबांचं कलिंगड आणि मुलीचा स्वेटर' (गंगाधर गाडगीळ), इत्यादी. रमेश मंत्रींनी शंभरावर अधिक पुस्तकं लिहिली; पण सर्वांत जास्त प्रसिद्धी त्यांना साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीमुळे मिळाली. तिच्यात त्यांनी इंदिरा संतांचा पराभव केला.  'रमेश मंत्री' आणि 'इंदिरा संत' या नावांच्या मात्रांची बेरीज जरी सारखीच होत असली, तरी मतांच्या बेरजेत मंत्र्यांनी बाजी मारली.

आम्ही शुद्ध शाकाहारी असल्यामुळे अनेक वेळा विनोदी लिखाण आमच्या पचनी पडत नाही. अर्थात अंडं शाकाहारी की मांसाहारी या वादाप्रमाणे काही लिखाणाच्या बाबतीतही हा वाद घातला जाऊ शकतो.

विनोदी लिखाणाच्या बाबतीत अखेर एवढंच म्हणावंसं वाटतं -

'मराठीत काही मोजक्या लेखकांनी विनोदी लिखाण केलं.  इतर बऱ्यांच लेखकांनी हास्यास्पद लिखाण केलं. '

(क्रमशः)

- ख. रे. खोटे