तेलही गेलं... (भाग ३)

अशा रितीनं "तेल पराकोटी" ही संकल्पना आता आपल्या लक्षात आली असेल.   आधी म्हटल्याप्रमाणे "तेल पराकोटी" म्हणजे तेलाचं संपणं नाही तर तेलाचं पराकोटीचं उत्पादन.   आधी दिलेल्या आलेखांमध्ये हे आपण बघितलं की तेल एकदम एका दिवशी नाहीसं होणार नाहीये तर पुढच्या पन्नास साठ वर्षात हळू हळू कमी होत जाईल आणि जसं जसं त्याचं उत्पादन कमी कमी होत जाईल तसतसं त्याची किंमत पण वाढत जाईल.  त्यामुळे खरा प्रश्न 'तेल संपण्या'चा नसून, तेल जसजस कमी होत जाईल तसतसा आपल्यासारख्या तेलाच्या आयातीवरच संपूर्ण अर्थकारण अवलंबून असणाऱ्या देशांचं काय होईल हा आहे.   आणि आपल्या सारख्या अर्थसत्तेला कोलमडून पडायला अगदी तेल संपेपर्यंत वाट बघावी लागणार नाही.   आपल्या गरजेच्या जेमतेम १०% तेल जरी आपल्याला कमी मिळालं तरी सुद्धा बास आहे.   आपला सारा आर्थिक विकासाचा वेग, सारं औद्योगिकरण उन्मळून पडायला ते पुरेसं आहे.

हे सारं नक्की कधी होईल हे सांगणं खूप कठीण आहे.   याचा अंदाज बांधण्यासाठी तेल साठे किती शिल्लक आहेत हे साधारणपणे बघूया.   निसर्गानं मुळात मानवाला साधारण २ ट्रिलियन पिंप भरून तेल दिलं होतं असं समजायला हरकत नाही.   हा आकडा थोडासा, पण अगदी थोडासाच, वाढत जातोय.   याला बरीच कारणं आहेत.   यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञानातली आधुनिकता आणि नवनवीन तेल विहीरींचा शोध.   दुसरं म्हणजे जसं तेल कमी होत जाईल तसतशी त्याची किंमत वाढत जाईल आणि अवघड ठिकाणचं किंवा कमी EROEI असलेलं तेल काढणंही परवडू शकेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पूर्वी सांगितल्या प्रमाणे तेल साठ्यांचे आकडे तेल कंपन्या आणि देश बऱ्याच वेळेस खोटेच सांगतात आणि त्यामुळे अगदी नेमका अंदाज सांगणं अवघड असतं.  

वर म्हटल्याप्रमाणे साधारणपणे २ ट्रिलियन (२०००, ००, ००, ००, ०००)पिंपं तेल मुळात या पृथ्वीवर होतं आणि त्यातलं आतापर्यंत निम्म्यापेक्षा थोडं अधिक संपलंय. म्हणजेच अजून साधारण ट्रिलियन (१०००, ००, ००, ००, ०००) पिंपं शिल्लक आहेत.   वर्षाला अंदाजे दोन हजार पाचशे कोटी पिंपं तेल आपण संपवतो असं गृहीत धरलं तर पुढचे अजून चाळीस वर्षं आपल्याला तेल पुरेल असा युक्तीवाद मांडता येईल.   पण हा युक्तीवाद काही फारसा पटण्यासारखा नाही.  खालचा आलेख बघितला की आपली तेलाची भूक प्रत्येक वर्षाला कशी वाढतीये ते लक्षात येईल.  आणि मागच्या दहा वर्षात ही भूक आणखी जोरात वाढतीये कारण चीन आणि आपण दोघंही आता महासत्ता बनण्याच्या धावपळीत आहोत आणि आपली भूक इतर सगळ्यांच्या तुलनेत वेगानं वाढते आहे. 

जगाच्या संपूर्ण तेल साठ्यांच्या तुलनेत कुठल्या देशाकडे किती साठे शिल्लक आहेत ते आता बघू.  खाली दिलेले आकडे साधारण आणि गोळाबेरीज (approximate and rounded) आहेत.  

देश एकूण शिल्लक तेलाच्या %
सौदी अरेबिया २४.००%
इराक १0.००%
इराण १०.००%
कुवेत ९.००%
यु. ए. इ. ९.००%
रशिया ९.००%
व्हेनेझुएला ८.००%
मेक्सिको ५.००%
अमेरिका ५.००%
नायजेरिया २.००%
लिबिया २.००%
चीन २.००%
कझाकस्तान २.००%
अल्जेरिया १.५०%
कॅनडा ०.५०%
नॉरवे ०.५०%
इंडोनेशिया ०.५०%

मी वर म्हटल्याप्रमाणे खरा प्रश्न तेल संपण्याचा किंवा उर्जा उपलब्धतेचा नसून त्या आर्थिक गणितावर हे आपलं आधुनिक जग उभं आहे ते गणितच चुकीचं ठरण्याचा आहे.  जशी या उर्जा स्त्रोतांना घसरगुंडी लागेल त्या प्रमाणातच किंवा अधिक संपत्तीच्या निर्मितीलाही घसरगुंडी लागण्याची शक्यता आहे.  आणि ही घसरण अशा पातळीपर्यंत मानवतेला खाली आणेल की तेलाधारित औद्योगिकता त्यावर आधारित ऐश्वर्य या गोष्टी इतिहास जमा होऊ शकतील.  याच्या बरोबरीनंच शेती आणि अन्न उत्पादनाचं औद्योगिकरण आणि जागतिकीकरण संपुष्टात येईल आणि काही तज्ञांचं असंही मत आहे की या साऱ्याबरोबरच आणि यामुळे कल्पनेपेक्षाही फार मोठ्या प्रमाणात जनसंहार होईल.  हे खूपच निराशावादी चित्र वाटेल पण यावर विश्वास ठेवण्याइतपत याला तार्किक बैठक नक्कीच आहे.

हे सारं खूप अतिरंजित वाटलं तरी जगातले तेल आणि वायू साठे आता मर्यादितच आहेत आणि त्यामुळे त्यावर आधारित जीवन पद्धतीलाही खीळ बसणार आहे यात कुठलीही शंका नाही. मोटारी, ट्रक, बस, विमानं, जहाजं चालणं दुरापास्त तर होईलच पण या साऱ्या वाहनांची निर्मिती, प्लास्टिकच्या वस्तूंची निर्मिती, कापड, रसायनं, औषधं, संगणक, मोबाईल फोन्स, केबल्स, आगगाड्या, संरक्षण सामग्री या साऱ्या गोष्टींचीही निर्मिती ठप्प होईल. 

पण म्हणजे या समस्येला काहीच उत्तर नाही? भरभराटीला आणि संपत्तीच्या निर्मितीचं उदात्तीकरण करणाऱ्या अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे की जसजशी तेलाची टंचाई वाढत जाईल आणि तसतशी पर्यायी उर्जेची निर्मिती परवडू शकेल. तसंच जशी तेलाची किंमत वाढत जाईल तसतशी पर्यायी उर्जा निर्मितीतली गुंतवणूकही वाढत जाईल आणि मानवाच्या बुढदीची प्रगल्भता नवनवीन उर्जा प्रकार शोधून काढेल.  ही कारण मीमांसा फार पटत नाही कारण एक अणू उर्जा सोडली तर इतर कुठचीच उर्जा तेल किंवा नैसर्गिक वायू एवढी कार्यक्षमही नाही आणि स्वस्तही.  या संदर्भात आपल्याकडे इतर काय पर्याय उपलब्ध आहेत हे ही बघणं आवश्यक ठरतं.

नैसर्गिक वायू हा तेलाला एक चांगला पर्याय आहे आणि बऱ्याच देशांमध्ये (आपल्याकडेही) आता वाहनांच्या इंधनासाठी काँप्रेस्ड नॅचरल गॅस मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.  परंतु नैसर्गिक वायूची पराकोटी तेलाच्या पाठोपाठच दहा एक वर्षांनी येते त्यामुळे केवळ तात्पुरती व्यवस्था म्हणूनच याकडे बघता येईल. 

आणखी एक खूप मोठ्या प्रमाणात उपलब्धता असलेला पर्याय म्हणजे टार सँड किंवा शेल ऑईल. याला नक्की मराठी शब्द आहे का नाही मला माहिती नाही.  टार सँड म्हणजे तेल असलेली डांबरासारखी दिसणारी वाळू. या वाळूत तेलाचं प्रमाण खूप प्रचंड आहे (विशेषतः कॅनडात).  पण या पर्यायालाही बऱ्याच मर्यादा आहेत.  मागचे जवळ जवळ ५०-६० वर्षं तेल कंपन्यांचे शास्त्रज्ञ या वाळूतून परिणामकारकरित्या तेल काढायचा प्रयत्न करतायत आणि त्यात त्यांना फारसं यश मिळालेलं नाहीये. म्हणजे या तेलाचा EROEI १ पिंपास १.५ पिंप यापेक्षा सुधारूच शकत नाहीये.  त्याशिवाय या तेलाच्या शुद्धीकरणातून प्रचंड मोठ्या प्रमाणात अपायकारक वायू आणि पदार्थांची निर्मिती यावरही तोडगा सापडू शकलेला नाहीये आणि एकूणात चित्र फारसं आशावादी नाहीये. 

कोळसा हा आणखी एक प्रचंड उपलब्धता असलेला पर्याय आहे.  असं म्हणतात की कोळश्याचे एवढे प्रचंड साठे आहेत की निदान शंभर वर्षं तरी (! ) आपल्याला चिंता करायचं कारण नाही (खरं खोटं देवालाच माहिती! ).  पण कोळश्याला 'घाणेरडी उर्जा' म्हटलं जातं. कारण या उर्जेचा वापर म्हणजे पारंपारिक वातवरण प्रदूषणाची खात्रीच. कोळसा जर त्याला इंधनात रुपांतरीत करायचा प्रयत्न केला तर त्याच्या बरोबरीनं आर्सेनिक, पारा, गंधक अशा गोष्टी वातावरणात सोडतो.  म्हणजे आपण उर्जेच्या अभावानं मरणार नाही तर प्रदूषणानं! 

पवन उर्जा, सूर्य शक्ती (सोलर एनर्जी), बायोमास एनर्जी हे आणखी काही पर्याय आहेत.  पण तेलाच्या चढत्या उतरत्या किंमतींमुळे यांच्या संशोधनावर बरेच परिणाम घडतात. दुसरी गोष्ट म्हणजे या साऱ्या उर्जा एवढ्या प्रचंड महाग आहेत की यांची उपलब्धता हाच एक मोठा प्रश्न ठरू शकेल.  या साऱ्या उर्जा मिळूनही जगाच्या उर्जा निकडीच्या फक्त काही प्रमाणातच उर्जा उपलब्ध होईल. 

या सगळ्यावर उत्तर ठरू शकेल असा कदाचित एकच पर्याय आहे.  हा पर्याय म्हणजे अक्षरशः आशेचा बारिक कवडसा आहे.  आणि हा पर्याय म्हणजे आण्विक उर्जा.  थर्मोन्यूक्लीअर फ्यूजन मधून तयार झालेली उर्जा.  पण दुर्दैवानी आपण पूर्ण यशस्वीपणे ही उर्जा मिळवायला अजून निदान पन्नास वर्षं तरी आपलं संशोधन लांब आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. 

- क्रमश: