सार्थ 'तस्मात् गीता' ... २

कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् ।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥३. १५॥
- कर्माची उत्पत्ती ब्रह्मापासून म्हणजे प्रकृतीपासून (आहे असे) जाण आणि हे ब्रह्म
अक्षरापासून म्हणजे परमेश्वरापासून निघाले आहे. म्हणून सर्वगत ब्रह्मच नेहमी
यज्ञात अधिष्ठित असते.
  (या पूर्वीच्या श्लोकात 'सारे प्राणी अन्नापासून होतात, अन्न पर्जन्यापासून
उद्भवत्ते, पर्जन्य यज्ञापासून होतो व यज्ञाचा उद्भव कर्मापासून होतो’ अशी साखळी
सांगितलेली आहे. या श्लोकात त्यापुढील साखळी सांगितलेली असल्यामुळे या श्लोकातील
'ब्रह्म’ या पदाचा रामानुजांनी लावलेला अर्थ 'प्रकृती’ तोच  लो. टिळकांनी प्रमाण मानलेला
आहे. आदर. जयदयाल गोयंदकाजींनी (गीता प्रेस) ब्रह्म या पदाचा अर्थ 'वेद’ असा प्रमाण
मानला आहे. प्रकृती ही परमेश्वरापासून साकारली, तिच्यापासून त्रिगुणांची - सत्व, रज व
तम यांची उत्पत्ती झाली तर त्रिगुणांपासून कर्मांची उत्पत्ती होत असते. वेद हेही परमेश्वरापासून
निर्माण झाले व त्यांनी कर्मांचे दिग्दर्शन केले. वेद व शास्त्रे यांतून जे विधी सांगितलेले
आहेत, त्या विधिवत् कर्मांद्वारे यज्ञ संपन्न होत असतो. वेद आणि प्रकृती या दोहोत
वेदांची श्रेष्ठता अधिक दिसते कारण प्रकृती सान्त आहे पण वेद हे अक्षरब्रह्म होय.
 -लो. टिळक गीतार्थात स्पष्ट करतात की, 'मम योनिर्महद्ब्रह्म’, गी. १४. ३,
या श्लोकात ब्रह्म या पदाचा प्रकृती असा जो अर्थ आहे, त्याला अनुसरून ब्रह्म या शब्दाने
येथेही जगाची मूलभूत जी प्रकृती तीच विवक्षित आहे, हा रामानुजभाष्यातील अर्थ आम्हास
बरा वाटतो. शिवाय महाभारताच्या शांतीपर्वात हेच यज्ञाचे प्रकरण चालू असता 'अनुयज्ञं
जगत्सर्वं यज्ञश्चानुजगत्सदा’-शां. प. २६७. ३४- यज्ञामागून जग व जगामागोमाग यज्ञ- असे
जे वर्णन आहे, त्याचीही ब्रह्म म्हणजे प्रकृती असा अर्थ केल्याने प्रस्तुत श्लोकाशी एकवाक्यता
होते. कारण जग म्हणजेच प्रकृती होय. परमेश्वरापासून प्रकृती व त्रिगुणात्मक प्रकृतीपासून
जगातील सर्व कर्म निष्पन्न होत असते. तसेच देवांनी प्रथम यज्ञ करूनच सृष्टी निर्माण
केली असे पुरुषसूक्तातही वर्णन आहे. )

तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरंकर्म परमाप्नोति पूरुषः ॥३. १९॥

- तस्मात् म्हणजे ज्ञानी पुरुष याप्रमाणे कसलीच अपेक्षा ठेवीत नसल्यामुळे तूही
(फलाचे ठायी) आसक्ती न ठेवता (आपले) कर्तव्यकर्म करीत जा. कारण आसक्ती
सोडून कर्म करीत असणाऱ्या पुरुषाला परमगती मिळते.
 (या जगात कर्म कोणालाच सुटले नाही, मग तो ज्ञानी असो वा
अज्ञानी असो. कर्म ज्याअर्थी चुकत नाही, त्याअर्थी ते केलेच पाहिजे. पण स्वार्थबुद्धी
उरली नाही म्हणूनच आता ते निष्काम बुद्धीने केले म्हणजे झाले हाच उपदेश गीता
या ठिकाणी 'तस्मात्’ हे पद योजून करीत आहे. त्याच्या दृढीकरणार्थ, सर्वात श्रेष्ठ
ज्ञानी जे भगवान त्यांना कांही कर्तव्य राहिले नसताही ते कर्मच करतात, असा दृष्टांत
पुढे बाविसाव्या श्लोकात दिलेला आहे. जीवनमुक्त ज्ञानी पुरुषानेही कर्मे करावी हा अर्थ
योगवासिष्ठात वर्णिला असून 'मुक्ताने तसे का करावे याचे कारण मला सांगा’ या
रामाच्या प्रश्नाला वसिष्ठांनी -'ज्ञ म्हणजे ज्ञानी पुरुषाला कर्म सोडण्यापासून किंवा
करण्यापासूनही कांही फायदा मिळवायचा नसतो, म्हणून तो जे जसे प्राप्त होईल
तसे करीत (कर्म) असतो’ असे उत्तर (यो. ६. उ. १९९. ४) दिले असून पुनः त्या ग्रंथाच्या
उपसंहारात 'मला कोणतीही गोष्ट केली काय आणि न केली काय सारखीच’ असे सांगून
लगेच पुढे 'कर्म न करण्याचा तरी आग्रह कशाला? जे जे शास्त्रतः प्राप्त होईल ते ते मी
करीत आहे’ असे म्हटले आहे. गणेशगीतेतही (ग. गी. २. १८) असेच सांगितले आहे. )

तस्मात्त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रजही ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥३. ४१॥
- म्हणून इंद्रियांचे प्रथम संयमन करून हे भरतश्रेष्ठा, ज्ञान आणि विज्ञान (विशिष्ट ज्ञान)
यांचा नाश करणाऱ्या या पाप्याला तू ठार मारून टाक.
(स्वतःची इच्छा नसताही बलात्कार केल्याप्रमाणे मनुष्य पाप कां करतो? असा प्रश्न
अर्जुनाने विचारला होता. त्यावर भगवंत म्हणतात की, या बाबतीत रजोगुणापासून
उत्पन्न झालेला मोठा आधाशी व मोठा पापी असा हा काम व हा क्रोध हाच मोठा
शत्रू तू समज. धुराने अग्नी किंवा धुळीने आरसा ज्याप्रमाणे आच्छादिला जातो, अगर
वारेने गर्भ जसा वेष्ठिलेला असतो, त्याप्रमाणे काम-क्रोधाने हे सर्व गुरफटून टाकले आहे.
कधीही तृप्ती न पावणारा तो अग्नीच असून ज्ञात्याचा हा जो नित्यवैरी त्याने ज्ञान
 झाकून टाकलेले आहे. भगवंतांनी पुढे असेही स्पष्ट केलेले आहे की, इंद्रिये, मन आणि
बुद्धी ही याचे अधिष्ठान म्हणजे घर किंवा किल्ला असून त्याच्या आश्रयाने तो ज्ञानाला
गुंडाळून ठेवून मनुष्याला भुरळ पाडीत असतो. आत्मा हा इंद्रिये-मन-बुद्धी यांपलीकडे
असतो. त्याला ओळखावयास भगवंत सांगतात. कामरूपी आसक्ती सोडून लोकसंग्रहार्थ
सर्व कर्मे स्वधर्माप्रमाणे करण्यासाठी इंद्रिये ताब्यात पाहिजेत व तेव्हढाच इंद्रियनिग्रह
येथे विवक्षित आहे. जबरीने इंद्रियांनाच अजिबात मारून टाकून सर्व-कर्म-त्याग येथे
सांगितलेला नाही. )

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः ।
कुरू कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥४. १५॥

- हे जाणून पूर्वीच्या देखील मुमुक्षू लोकांनी कर्म केले म्हणून पूर्वीच्यांनी
पूर्वपूर्व केलेले कर्मच तू कर.
(या श्लोकात कर्माच्या तत्त्वाचे स्पष्टीकरण केले आहे. ‘जाणितो’ या शब्दाने
‘जाणून त्याप्रमाणे वागू लागतो’ एव्हढा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे.
भगवंतांना त्यांच्या कर्माची बाधा होत नाही याचे कारण ते फलाशा ठेवून
कर्म करीत नाहीत, हे होय आणि ते जाणून जो त्याप्रमाणे जो वागतो त्यास
कर्माची बाधा होत नाही, असा एकंदर भावार्थ आहे. येथे मोक्ष आणि कर्म
यांचा याप्रमाणे विरोध नाही म्हणून तू कर्म कर, असा अर्जुनाला निश्चित
उपदेश केला आहे. )

तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥४. ४२॥

- म्हणून आपल्या हृदयात अज्ञानाने उत्पन्न झालेला हा संशय ज्ञानरूप
तलवारीने छाटून टाकून (कर्म-)योगाचा आश्रय कर (आणि) हे भारता,
(युद्धाला) उभा राहा.
 (ज्याला ज्ञान नाही आणि श्रद्धाही नाही, असा मनुष्य
संशयग्रस्त होतो आणि संशयखोर मनुष्य नाश पावतो. संशयखोराला हा
लोक नाही, परलोक नाही आणि सुखही मिळत नाही. निष्काम बुद्धियोगाने
कर्मे केली म्हणजे कर्माची बंधने तुटून जाऊन ती मोक्षाला प्रतिबंधक होत
नाहीत आणि ज्ञानाने मनातले संशय फिटून मोक्ष मिळतो. ज्ञानामुळे ज्याचे
संशय छिन्न झाले अशा आत्मज्ञानी पुरुषाला कर्मे बांधू शकत नाहीत,
म्हणून ज्ञानाचा उपयोग संशयाचा समूळ उच्छेद करण्यासाठी करावयाचा,
असा यातून बोध आहे. )

इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद ब्रह्मणी ते स्थिताः ॥५. १९॥

- याप्रमाणे ज्यांचे मन साम्यावस्थेत स्थिर झाले ते इथल्या इथेच
(म्हणजे मरणापूर्वी) मृत्युलोक जिंकतात कारण ब्रह्म हे निर्दोष व सम
आहे, म्हणून (सम्यक् बुद्धीचे) हे पुरुष (नेहमीच) ब्रह्माचे ठायी स्थित
म्हणजे जीवित अवस्थेतच ब्रह्मीभूत झालेले असतात.
 (आत्मस्वरूपी परमेश्वर अकर्ता व सर्व खेळ प्रकृतीचा
हे ज्याने ओळखले, तो ब्रह्मसंस्थ झाला व ‘ब्रह्मसंस्थोऽमृतत्वमेती’
(छांदोग्य उप. २. २३. १)- जो ब्रह्मसंस्थ झाला त्याला अमृतत्व (मोक्ष) मिळतो.
ब्रह्मज्ञान झाल्यावर ही अवस्था जिवंतपणीच प्राप्त होत असल्यामुळे यालाच
जीवनमुक्तावस्था असे म्हणतात. हीच अध्यात्मविद्येची पराकाष्ठा होय व
चित्तवृत्तिनिरोधरूपी योगसाधनांनी ही अवस्था प्राप्त होऊ शकते. )

(क्रमशः)