सार्थ तस्मात् गीता ..... (३)

तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।
कर्मभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥६. ४६॥

- तपस्वी लोकांपेक्षाच नव्हे तर ज्ञानी पुरुषांपेक्षा तसेच कर्मठांपेक्षाही
(असा कर्म-)योगी श्रेष्ठ समजतात, म्हणून हे अर्जुना, तू योगी हो.
             (तपस्वी म्हणजे इंद्रियनिग्रह करून शरीरताप सोसणारा (भक्त),
ज्ञानी म्हणजे (गुरूपदेशद्वारा) विवेकाने पदार्थबोध करून घेणारा (ज्ञानाभ्यासू)
तर कर्मठ हा यज्ञ, पूजा, दानादी शुभकर्मांद्वारे सकाम कर्मे आचरणारा होय.
गीतेचा सहावा अध्याय हा ध्यानयोग सांगणारा आहे. सकाम कर्मे ही ऐहिक
लाभासाठी असल्याने कनिष्ठ प्रतीची असतातच. तापस व कर्मठ (कर्मयोगी)
आणि ज्ञानाभ्यासू (ज्ञानयोगी) या तिघांनाही ध्यानयोग साहाय्यकारी ठरणारा
असतो. ज्ञानयोगात अभेदबुद्धीने व कर्मयोगात भेदबुद्धीने निष्काम कर्मे
आचरणे हे ध्यानयोगाचे साधन असते. ‘जो माझ्या ठिकाणी अंतःकरण ठेऊन
श्रद्धेने मला भजतो त्यालाच मी सर्वात उत्तम युक्त, म्हणजे ज्ञान-कर्म-भक्ती
यांनी परिपूर्ण झालेला, असे मी समजतो’ असे भगवंतांचे सांगणे आहे. )

तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥८. ७॥

-म्हणून सदासर्वकाल माझे स्मरण करीत राहा आणि युद्ध कर. माझ्या
ठायी मन व बुद्धी अर्पण केलीस् म्हणजे युद्ध करूनही मलाच येऊन 
मिळशील, यात संशय नाही.
                 (‘मलाच येऊन मिळशील’ म्हणजे ‘मोक्षप्राप्त होईल’.
मोक्ष हा परमेश्वराच्या ज्ञानयुक्त भक्तीने मिळतो व मरणसमयी देखील
तीच भावना कायम राहण्यास जन्मभर तोच अभ्यास केला पाहिजे, हे
निर्विवाद आहे. स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेली सर्व कर्मे भगवद्भक्तीने व
निष्काम भावनेने केली पाहिजेत, असा हा गीतेतील सिद्धान्त आहे.
अंतकाली देखील दिव्य परम पुरुषाचे जे चिंतन करावयाचे ते
परमेश्वरार्पण बुद्धीने जन्मभर करीत असतात. )

परस्तस्मास्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः ।
यः स सर्वेषु भूतेषु नश्यस्तु न विनश्यति ॥८. २०॥

- पण वर सांगितलेल्या अव्यक्तापलीकडचा दुसरा सनातन अव्यक्त पदार्थ,
जो सर्व भूते नाहीशी झाली तरीही नाहीसा होत नाही...
               (‘वर सांगितलेले अव्यक्त’ याचा अर्थ ‘जी कालगतीशी
बांधली गेलेली आहे ती प्रकृती’. ब्रह्मलोकप्राप्तीसुद्धा अनित्य असून त्या
ब्रह्मलोकासह सर्व सृष्टीची उत्पत्ती व लय पुन्हा पुन्हा होत असतो. हे जे
ब्रह्मरूपी अव्यक्त ते या नाशवंत अव्यक्त (प्रकृती) पेक्षा भिन्न आहे. दुसरे
सनातन अव्यक्त त्यास अक्षरब्रह्म म्हणतात. सर्व भूते नाहीशी झाली तरीही
जो नाहीसा होत नाही, तो परमेश्वर किंवा अक्षरब्रह्म आणि त्याची प्राप्ती झाली
असता अनावृत्ती म्हणजे परत (जन्ममृत्यूच्या चक्रात) फिरावे लागत नाही.

नैते सृती पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन ।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ॥८. २७॥
-हे पार्था, या दोन सृती म्हणजे मार्ग (तत्त्वतः) जाणणारा कोणताही
योगी मोह पावत नाही, म्हणून हे अर्जुना, तू सर्वकाल योगयुक्त राहा.
                   (दोन मार्गांचा  येथील उल्लेख हा मृत्युनंतर जीवास
लाभणारी गती जी दोन मार्गांनी लाभते, ते मार्ग होत. त्यातील एक
देवयान व दुसरा पितृयाण मार्ग होय. या दोन मार्गातील तत्त्व जाणले
म्हणजे देवयान मार्गाने मोक्ष मिळून पुनर्जन्म प्राप्त होत नाही आणि पितृयाण
मार्ग स्वर्गप्रद असला तरी मोक्षप्रद नाही असे ज्याने जाणले, तो अर्थातच यांपैकी
आपल्या खऱ्या कल्याणाचा मार्ग स्वीकारील, मोहाने खालच्या पायरीच्या मार्गात
पडणार नाही हे उघड आहे. देवयान आणि पितृयाण या दोन वाटांपैकी कोणती
वाट कोठे जाते, हे कर्मयोग्याला कळत असते, व त्यामुळे यांपैकी जी वाट उत्तम
तीच तो स्वभावतः स्वीकारतो आणि स्वर्गाच्या येरझाऱ्या टाळून त्यापलीकडील
मोक्षपदाची प्राप्ती करून घेत असतो. )

तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥११. ३३॥

-म्हणून तूं ऊठ, यश मिळव आणि शत्रूंना जिंकून समृद्ध राष्ट्राचा उपभोग घे.
मी यांना पूर्वीच मारलेले आहे. (म्हणून आता) हे सव्यसाची (अर्जुना), तूं निमित्ताला
मात्र (पुढे) हो!
                       (भगवंतांनी अर्जुनाला शाब्दिक ज्ञान दिले. त्याच्या मनातील संशय
संपूर्णतः नष्ट व्हावा या उद्देशाने भगवंतांनी त्याला विश्वरूप-दर्शन दिले. ते अक्राळविक्राळ
रूप पाहून अर्जुन हडबडला. त्याने भगवंतांना त्यांचे विश्वरूप आवरते घ्यावयाची विनंती
केली. ते रूप पाहून भगवंतांच्या सामर्थ्याची अर्जुनास खात्री पटली. भगवंतांनी मग
अर्जुनाला सांगितले की ‘मीच लोकांचा क्षय करणारा व वृद्धिंगत झालेला काळ आहे.
मीच येथे लोकांचा संहार करण्यास निघालो आहे. तूं नसलास् तरी म्हणजे तूं कांही केले
नाहीस् तरीही सैन्यासैन्यातून उभे असलेले हे सर्व योद्धे नाहीसे होणार आहेतच
(मरणार आहेतच).’ शिवाय श्रीकृष्णशिष्टाई प्रसंगी भीष्म श्रीकृष्णाला म्हणाले होते की,
‘हे सर्व क्षत्रिय कालपक्व झालेले आहेत.’ दुष्ट माणसे आपल्या कर्मांनीच मरत असून
त्यांना मारणारा फक्त निमित्तमात्र असल्यामुळे मारणाऱ्याकडे त्याचा दोष जात नसतो,
हा कर्मविपाकक्रियेचा सिद्धांत यात अंतर्भूत आहे. असे असल्यामुळे अर्जुन हा फक्त
निमित्तमात्र ठरणार हे स्पष्ट होते. म्हणून त्याला युद्ध जिंकून समृद्ध राष्ट्राचा उपभोग
घेण्याची जणू आज्ञा भगवंत करतात. )

तस्मात्प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम् ।
पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसी देव सोढुम् ॥११. ४४॥

-यासाठी, स्तुत्य व समर्थ अशा तुमची ‘प्रसन्न व्हा’ म्हणून शरीर वाकवून नमस्कार
करून मी प्रार्थना करीत आहे. पिता ज्याप्रमाणे आपल्या पुत्राचे, किंवा सखा ज्याप्रमाणे
आपल्या सख्याचे (अपराध क्षमा करतो) त्याप्रमाणे हे देवा, प्रियाने म्हणजे तुम्ही, प्रियाय
म्हणजे तुमचा प्रिय जो मी, त्या तुमच्या आवडत्याचे (माझे सर्व) अपराध क्षमा करावेत.
 (भगवंताचे विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुनाला त्यांच्या विलक्षण सामर्थ्याचा
प्रत्यय आला. स्वतःचे क्षुद्रत्व त्याला जाणवू लागले. आतापर्यंत समवयस्क सखा या
नात्याने त्याच्याकडून भगवंताला जी वागणूक त्याने दिली त्याची त्याला प्रकर्षाने आठवण
झाली. हास्य-मौजमजा किंवा आहार-विहार करताना, जागेपणी, झोपताना तो जेव्हा
भगवंतांबरोबर असे, तेव्हा त्यांच्याबरोबर त्याने केलेल्या वर्तनाचा आता त्यांचे सामर्थ्य
पाहिल्यानंतर स्वाभाविक्तः त्याला पश्चात्ताप होऊ लागला. असत्कृत म्हणजे जे करावयास नको ते आणि
अवहास म्हणजे मानापमानाचा विचार न करणे. प्रमाद (पुत्र पित्याशी वागताना ज्या चुका
करतो तद्वत् ), विनोद (एक मित्र मित्राशी वागताना ज्या चुका करतो तद्वत् ) किंवा प्रीती
(प्रिया आपल्या प्रियाशी व्यवहार करताना सहजगत्या ज्या चुका करते तद्वत् ) या तीन
कारणांनी माणूस व्यवहारात मानापमानाचा विचार करीत नसतो. अर्जुन त्यामुळे संपूर्ण
शरण जाऊन भगवंतांना ‘मी तुमचा आवडता’ असल्याचे सांगून त्याच्याकडून आतापर्यंत
जाणता-अजाणता झालेल्या साऱ्या अपराधांसाठी भगवंतांकडून क्षमायाचना करतो आहे. )

(क्रमशः)