सार्थ तस्मात् गीता ..... (४)

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् ॥१६. २१॥

-काम, क्रोध व लोभ अशा तीन प्रकारचे नरकाचे द्वार असून ते आपला नाश करणारे आहे.
म्हणून या तिहींचाही त्याग करावा.
                       (आस्तिक व नास्तिक अशा दोन प्रकारच्या वृत्तीची माणसे दिसतात.
आस्तिक वृत्ती ज्या गुणांमुळे रुजते, त्या सात्त्विक गुणांचा उल्लेख भगवंतांनी प्रथम केला आहे.
त्यात अभय, शुद्ध सात्त्विकता, ज्ञानयोगव्यवस्थिती (ज्ञान व योग यांची तारतम्याने व्यवस्था),
दातृत्व, दम, यज्ञ, स्वाध्याय (स्वधर्माप्रमाणे आचरण), तप, सरळपणा, अहिंसा, सत्य,
अक्रोध, त्याग (कर्मफलत्याग), शांती, अपैशुन्य (क्षुद्र दृष्टी सुटून उदार बुद्धी असणे),
सर्व भूतांचे ठिकाणी दया, हावरेपणा नसणे, मृदुपणा, वाईट कृत्याची लाज, अचापल्य
(रिकामे व्यापार सुटणे किंवा चापलुसी नसणे), तेजस्विता, क्षमा, धृती, शुचिर्भूतपणा, द्रोह न करणे,
अतिमान नसणे या सव्वीस गुणांचा समावेश केला गेला आहे. या गुणांना दैवी संपत्ती म्हटले
आहे. या उलट असुर  संपत्तींविषयी सांगताना दंभ, दर्प, अतिमान, क्रोध, पारुष्य (निष्ठुरपणा)
व अज्ञान या अवगुणांचा समावेश केला आहे. दैवी संपत्ती परिणामी मोक्षदायक आणि
असुर संपत्ती बंधदायक असल्याचे सांगितले आहे. आसुरी वृत्तीचे जी माणसे ती अहंकाराने,
दर्पाने, कामाने, क्रोधाने फुगून जाऊन आपल्या स्वतःच्या व इतरांच्या देहात असणारा जो
भगवंत त्याचाच द्वेष करतात. अशा द्वेष्ट्या व क्रूर नराधमांना संसारातील आसुरी म्हणजे
पापयोनीतच पुन्हा पुन्हा जन्मावे लागते व शेवटी अधोगतीला जातात. यातून सुटण्याचा
मार्ग भगवंत सांगतात व तीन प्रमुख अवगुणांचा - काम, क्रोध व लोभ यांचा - उल्लेख
‘नरकाचे द्वार’ म्हणून करतात. )

तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥१६. २४॥

-म्हणून कर्तव्य कोणते व अकर्तव्य कोणते याचा निर्णय करण्यास तुला शास्त्र प्रमाण
मानले पाहिजे व शास्त्रात काय सांगितले आहे ते समजून घेऊन त्याप्रमाणे या लोकी
कर्म करणे तुला योग्य होईल.
                            (जो शास्त्रोक्त विधी सोडून मनास वाटेल ते आचरू लागला, त्याला
सिद्धी मिळत नसते, सुख नसते व उत्तम गतीही नसते. म्हणून येथे भगवंत अर्जुनाला
उपदेश करीत आहेत की, कर्तव्य कोणते व अकर्तव्य कोणते याचा निर्णय करण्यास शास्त्र
प्रमाण मानले पाहिजे व शास्त्रात काय सांगितले आहे ते समजून घेऊन त्याप्रमाणे या
लोकी कर्म करणे योग्य होणारे आहे ).

तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपःक्रियाः ।
प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ॥१७. २४॥

-तस्मात् म्हणजे जगाला या संकल्पाने आरंभ झाला आहे म्हणून, ब्रह्मवादी लोकांची यज्ञ,
दान, तप आणि इतर शास्त्रोक्त कर्मे नेहमी ॐ असा उच्चार करून प्रवृत्त होत असतात.
                         (कार्याकार्याचा विचार शास्त्राला प्रमाण मानून कां करायचा, याचे कारण
असे दिसते की, परमेश्वराच्या स्वरूपाबद्दल मनुष्याला झालेले ज्ञान ते सर्व ॐतत् सत्
या तीन शब्दांच्या निर्देशात ग्रथित झालेले आहे. यातील ॐ हे अक्षरब्रह्म आहे. तत् या
पदाने सामान्य कर्माहून निराळे म्हणजे फलाशा सोडून निष्काम बुद्धीने केलेले सात्त्विक
कर्म निर्देशित केले जाते तर सत् या पदाने अशा सत्कर्माचा निर्देश होतो जे फलाशा
असली तरी शास्त्राप्रमाणे शुद्धता असलेले कर्म असते. असा प्रकारे सात्त्विक तसेच शुद्ध
कर्मांचा परब्रह्माच्या सामान्य व सर्वमान्य संकल्पात समावेश होतो. या निर्देशाने पूर्वी
ब्राह्मण, वेद व यज्ञ निर्माण केलेले आहेत किंवा हा ॐतत्सत् हा सृष्टीनिर्मितीचा मूळ
संकल्प होय. या संकल्पातील ॐ हे जे अक्षरब्रह्म आहे, त्याचा प्रथम उच्चार करावयाचा
तो कर्माला परब्रह्माचे अधिष्ठान देण्यासाठी. )

न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः ।
भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ॥१८. ६९॥

- आणि त्याच्यापेक्षा माझे जास्त प्रिय करणारा सर्व मनुष्यात दुसरा कोणीही मिळणार
नाही आणि या भूमीत त्याच्यापेक्षा मला जास्त आवडता कोणी होणार नाही.
                        (त्यांचा अत्यंत आवडता असा जो अर्जुन त्यास भगवंतांनी (उपसंहारात्मक)
अखेरचा उपदेश  करताना सांगितले आहे की ‘माझ्या ठायी मन ठेव, माझा भक्त हो, माझे
यजन कर, मला वंदन कर म्हणजे तूं मलाच येऊन मिळशील. सर्व धर्म सोडून तूं मज
एकट्यालाच शरण ये. तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, भिऊ नकोस’. सारांश, माझी दृढ
भक्ती करून मत्परायण्बुद्धीने स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेली कर्मे करीत जा, म्हणजे इहलोकी व
परलोकी उभयत्र तुमचे कल्याण होईल, भिऊ नका, असे अर्जुनाचे निमित्त करून भगवंत अखेर
साऱ्यांनाच आश्वासन देत आहेत. गीतेतील भगवंतांचा ‘हा संदेश भगवद्भक्तांना जो समजावेल,
त्याची माझ्या ठायी परमभक्ती होऊन तो मलाच येऊन पोहोचेल यांत संशय नाही’, असेही भगवंत
शेवटी सांगतात. असा परमभक्त विरळाच होणारा असतो व त्याच्याशिवाय अन्य कुणी भगवंताला
अधिक प्रिय असणारा असा कुणी असत नाही. )

॥हरिःॐतत्सत्॥

(॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥)