घेई छंद अबब

छंद आपल्याला व्यसनांपासून दूर ठेवतात. छंद आपलें जीवन विकसित करतात, समृद्ध करतात. छंद जीवनाला एक दिशा, एक ध्येय, जीवननिष्ठा देतात. छंद आपल्या आयुष्याला एक नवें परिमाण देतात.

एका छोट्या गांवातील एक मुलगा. शाळेंत असतांना त्याला टपालाची तिकिटें, विविध देशांतलीं नाणीं, आगपेट्यांचीं वेष्टनें, स्वतः पाहिलेल्या चित्रपटांचीं तिकिटें, चित्रपट क्षेत्रांतील विविध नामवंतांचीं छायाचित्रें, किर्लोस्कर, स्त्री मासिकांचीं दलाल, मुळगांवकर, एस एम पंडित इ. मान्यवरांचीं चीं चित्रें असलेलीं मुखपृष्ठें, सुंदर शुभेच्छापत्रें, निसर्गचित्रें, व्हिझिटिंग कार्ड्स, नामवंत व्यक्तींच्या स्वाक्षर्‍या आणि अन्य विविध वस्तु जमवण्याचा छंद लागला.

हा मुलगा आतां मोठा झाला आहे. त्यानें समाजांत नांव आणि प्रतिष्ठा कमावली आहे. नव्हे, नव्हे, नांवप्रतिष्ठा आणि मानसन्मान त्याच्या चारित्र्याकडे आणि जपलेल्या उच्च, शाश्वत जीवनमूल्यांकडे आपणहून चालत आले आहेत.

आतां या अवलियाकडे असलेल्या वस्तूंची यादी द्यायची झाली तर ती एक लांबलचक जंत्रीच होईल. आज त्यांच्याकडे भारतासह विविध देशांचीं ७२,००० टपाल तिकिटें आहेत. प्रत्येक देशांत मान्यवर व्यक्तीचा सन्मान म्हणून त्या देशाचें टपाल खातें फर्स्ट डे कव्हर काढतें. १९४७ पासून भारताच्या तपाल खात्यानें काढलेलीं सर्वच्या सर्व फर्स्ट डे कव्हर्स त्यांच्याकडे आहेत. जवळजवळ तेराशें भरतात हीं. चित्रपट क्षेत्रांतील विविध नामवंतांचीं छायाचित्रें आहेत वीस हजार. एखाद्या चित्रपटगीताचें शीर्षक उच्चारलें कीं कीं हे गायकगायिका, संगीत दिग्दर्शकाबरोबर चित्रपटांतील नायकनायिकांचीं नांवें इत्यादि तपशील धडाधड देतात. त्यांच्या संग्रहांत सातशें नामवंतांच्या स्वाक्षर्‍या आहेत. आचार्य अत्रे, बाबा आमटे, ऐश्वर्या राय, लाला अमरनाथ, ऍलेक बेडसर, सुनील गावसकर, आल्विन कालीचरण अशा विविध व्यक्तींच्या.  शंभरावर नामवंतांचीं हस्ताक्षरें आहेत. यांत लाबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, कर्मवीर भाऊराव पाटील, कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, डॉ. श्रीराम लागू, सुधीर फडके, बाळासाहेब ठाकरे, इ. चा समावेश आहे.

वाचनाच्या छंदामुळें मराठी, हिंदी आणि इंग्रजीतील जवळजवळ हजारभर पुस्तकें आहेत. यांत १८२९ सालीं शिळा छापखान्यांत छापलेलें अभिजातशाकुंतल आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं वि. जोशी, पु. ल. देशपांडे या लेखकांचीं सर्व विनोदी पुस्तकें आहेत. याखेरीज वर्तमानपत्रांतील महत्त्वाच्या लेखांचीं कात्रणें, आर के लक्ष्मण यांचीं व्यंगचित्रें, विविध गायक गायिकांचीं छायाचित्रें आणि सोबतचे लेख, नियतकालिकांतील संस्कृत सुभाषितें, उर्दू शेरशायरी आहे. जुने दिवाळी अंक विकत घेऊन त्यांतील कादंबर्‍याहि जपून ठेवल्या आहेत. त्या आहेत दोनेकशें. काय चोखंदळ निवडक्षमता आणि अभिरुची आहे!

जाहिरातींचे विविध नमुने, भरतकामाचे नमुने, वह्यांची लेबल्स आहेत. दाढी करावयाच्या पात्यांचे १०५ नमुने, निरनिराळ्या देशांतल्या ३०० नोटा, विविध आगपेट्यांचे २०० नमुने, गणपतीचीं ४०० चित्रें, ३५० की चेन्स, ३०० फाउंटन पेन्स, खेळण्यांचीं पाकिटें, फोटो रोल्सचे छोटेसे असे रिकामे खोके, टुथपेस्टचीं झांकणें, टूथपेस्टबरोबर आलेले छोटेछोटे प्राणी, आईसक्रीम कपांवरील छायाचित्रें, इ. चित्रविचित्र गोष्टी त्यांच्या संग्रहांत आहेत. पण प्रमुख संग्रह आहे तो मोटारगाड्यांच्या मॉडेल्सचा. काय गेली ना छाती दडपून? पण त्यांना सगळ्यांत जास्त अभिमान आहे तो त्यांच्याकडच्या मोटारगाड्यांच्या मॉडेलसचा. ऍंबॅसॅडर, फियाट इ. पासून रोल्स रॉईसपर्यंत मोटारगाड्यांची ७५० मॉडेल्स यांच्या संग्रहीं आहेत. मूळ गाडीबरहुकूम कांटेकोरपणें बनविलेल्या या मोटारगाड्या आकारानें मूळ गाडीच्या १/५० वा १/६६ असतात. यांतील एक रोल्स रॉईस कांहींशी मोठी आहे. लांबीला सुमारें दहा इंच असलेल्या गाडींत बॅटरी घातली कीं तिचे दिवेहि पेटूं शकतात. ६४ वर्षांनीं अक्रोडाच्या झाडाला लागणारें दुर्मिळ फूलहि आहे. आणखी आहे स्कॉटलंडमधल्या एका गांवाचें रेलवे तिकीट. आतां या रेलवे तिकिटांत काय आहे असा कोणालाहि प्रश्न पडेल. तर या गांवाच्या नांवांत ५४ अक्षरें आहेत. गोगोव्हिच हें या गांवाच्या नांवाचें लघुरूप आहे.

छंद म्हटला कीं छांदिष्टपणा आलाच. एकदां हे महाशय प्रेतयात्रेसह स्मशानांत जात असतां त्यांना एक बाई घरांतला केर कचरा पेटींत टाकतांना दिसली. त्या केरांत दुर्मिळ अशीं पोस्टाचीं तिकिटें होतीं. आतां प्रेतयात्रेतून बाहेर कसें पडणार? मग प्रेतयात्रेतील सर्व विधि आटोपल्यावर ताबडतोब रिक्षा पकडून या अवलियानें ती कचरापेटी गांठून तिकिटें मिळवलीच. तिथें मग प्रतिष्ठा छंदाआड आली नाहीं. असो. हा झाला वस्तुसंग्रहाचा छंद. प्रत्येक वस्तूचा छंद वेगळा मानला तर एकूण छंद आहेत पन्नास. संग्रहांच्या विस्तारानें आणि वस्तुसंख्येच्या प्रचंडतेनें छाती दडपली तरी जाणवते आणि डोळ्यांत भरते ती वस्तूंची निवड करतांनाची त्यांची चोखंदळवृत्ती आणि उच्च अभिरुची.

कलाविषयक आणि आस्वादविषयक छंदहि या भल्या गृहस्थाला आहेत. आहे कोण हा अवलिया? चित्रें काढणें, रांगोळी घालणें, इत्यादि. त्यांतहि आगळेंवेगळें वैशिष्ट्य आहे पण तें पुढील लेखांत.

क्रमश: