असा गुरू होणें नाहीं

छबिलदास लल्लुभाई मुलांचें विद्यालय, दादर, मुंबई ४०००२८. जून वा जुलै १९६२. वर्ग सहावी ई. पहिला तास होऊन गेला. दुसरा तास इंग्रजीचा. मोघे सर येऊं घातलेले. मोघे सरांऐवजीं दुसरेच सर आले. उंची जेमतेम पांच फूट. केसांचा देव आनंद छाप कोंबडा. पूर्ण बाह्यांचा बाहेर टाकलेला फिक्या रंगाचा चकाचक शर्ट. सोनेरी खडेदार कफ लिंक्स. खिशाला सोनेरी टोपणांची दोन पेनें, अर्धगडद रंगाची विजार, पायांत बूट, उजव्या हाताच्या बोटांत एकदोन अंगठ्या. उजळशा, जवळजवळ गोर्‍या सोज्वळ गोल चेहर्‍यावर स्मित आणि एकूणच प्रसन्न व्यक्तिमत्त्व. आज नेहमींचे शिक्षक अनुपस्थित असल्यामुळें हे सर आले होते. "मुलांनो आज तुमचे सर आलेले नाहींत म्हणून ऑफ्फ पिरीअड आहे." सर म्हणाले. स्निग्ध व्यक्तिमत्त्वासरखाच स्निग्ध व गोड आवाज.

"कांद्याऽऽ पारनाईक सर हेऽऽ. मस्त मजामजा करतात. अजिबात बोअर होणार नाहीं बघ." माझ्या बाजूच्या सानेनें माहिती पुरवली. स्मार्ट सान्याकडे अवघ्या शाळेतली बित्तंबातमी असे. त्याच्यापेक्षां मोठा असलेला त्याच्या परिसरांतला एक मुलगा आमच्याच शाळेंत वरच्या वर्गांत होता ना.

"सर गणपती काढा." सान्यानें हट्ट केला.

"हां सर गणपती, गणपती." आम्हीं इतरांनीं एकच गिल्ला केला. उत्साही साने फळ्याकडे धांवला, तत्परतेनें डस्टर उचलला आणि फळा पुसून लख्ख केला. दोन पांढरे खडू सरांच्या हातां दिले. सरांनीं आढेवेढे न घेतां दोन्हीं हातांत एकेक खडू घेतला. फळ्याच्या वरील बाजूस मध्यभागीं दोन्हीं खडू टेकवले आणि एकहि खडू फळ्यावरून न उचलतां झरझर खालीं वर बाजूला गिरबटवल्यासारखे झरझर ओढायला सुरुवात केली.  अर्ध्या मिनिटांतच दोन्हीं हातांनीं फळ्यावरून खडू न उचलतां काढलेला  फळ्यावरचा गणपती बघून अख्खा वर्ग थक्क. स्वयंचलित छापखान्यांत छापायला पण यांपेक्षां जास्त वेळ लागेल. बांके वाजवून आम्हीं वर्ग डोक्यावर घेतला.

"अरे बाळांनो, हळूं बोला, आवाज करूं नका, बाजूला वर्ग सुरू आहे, त्यांना त्रास होईल." मृदुमधुर आवाजांत न चिडतां मुलांना सरांनीं समजावलें. एका मिनिटांच्या आंत सर मुलांना प्रिय झाले होते. मग शिवाजी काढला, मग कपाट काढलें नंतर गप्पा सुरूं झाल्या आणि ते सबंध वर्गाचे मित्रच बनले. पण अर्थात शिक्षक विद्यार्थी हें आदराचें नातें राखून आणि बाजूच्या वर्गाला उपद्रव न होईल इतपत माफक शांतता पाळून. तर असे हे पारनाईक सर. नंतर नववीत आम्हांला क्लास टीचर म्हणून आले. त्या वर्षीं गणिताला हेच सर होते. त्या काळीं प्रत्येक वर्गांत चाळीस पंचेचाळीस मुलें असत. प्रत्येक मुलाच्या प्रगति पुस्तकावर सरांचे नीट लक्ष असे. नववीच्या तिमाही परीक्षेंत ते प्रत्येक मुलाला प्रगति पुस्तक देतांना मागील वर्षीं त्या त्या विषयांत किती गुण मिळाले होते तें पाहात. गुण कमी वगैरे पडले असतील तर पालकांना बोलावून घसरणीचें कारण शोधून त्यावर योग्य तो इलाज करीत. एकदां तर मला आठवतें कीं एक मुलगा शेवटून दुसर्‍या बांकावर बसत असे. तिमाहींत त्याचा नंबर ठीक होता. मग त्याची मैत्री तिसर्‍या बांकावरच्या एका मुलाबरोबर झाली व तो त्याच्या बाजूला तिसर्‍या बांकावर बसूं लागला. पण सहामाहींत त्याचा नंबर घसरला. मग या तिसर्‍या बांकावरच्या अगोदरपासून बसलेल्या मुलालाच त्यांनीं फैलावर घेतला. त्याच्याकडून कळलें कीं या मुलाच्या घरीं कांहींतरी अडचण आहे. मग त्याच्या पालकांना बोलवून त्यांतून मार्ग काढला व त्याचा अभ्यास पूर्ववत झाला. आज आपण पाहातों कीं शाळांमधून ऐंशीं नव्वद विद्यार्थ्यांच्या गर्दींतल्या मुलांकडे शिक्षक फारसें लक्ष देत नाहींत आणि असहाय्य मुलें परीक्षेंतील अपयशामुळें आत्महत्या करतात. या पार्श्वभूमीवर पारनाईक सरांबद्दलचा आदर दुणावतो.

वाचकहो मला सांगायला आनंद होतो कीं मागील दोन लेखातलीं घेई छंद अबब आणि मालेगांवचा देवदूत मधील अवलिया या अन्य दोन व्यक्ती नसून ते आमचे वर उल्लेखलेले श्रीकृष्ण गोविंद पारनाईक सरच आहेत. असा गुरू होणें नाहीं.

मागील लेखांत सरांचा कलाविषयक छंदाबद्दल पुढील लेखांत लिहीन असें म्हटलें होतें. शालेय शिक्षण मालेगांवला झाल्यानंतर सरांनीं अंमळनेरहून बी. एस.सी. केलें. अंमळनेरच्या कॉलेजांत असतांना १९५४ सालीं सरांनीं रांगोळी प्रदर्शनांत भाग घेऊन दोन रांगोळ्या काढल्या होत्या. एकींत रविंद्रनाथ टागोर आणि आणि दुसरींत एक निसर्गचित्र. योगायोगानें इंदिरा गांधींनीं तेव्हां त्यांच्या महाविद्यालयाला भेट दिली. कलासक्त इंदिराजींनीं तेव्हां या रांगोळ्यांची मुक्त कंठानें स्तुती केली होती. महाविद्यालयांत कॅरम स्पर्धेंत सर सतत तीन वर्षें चॅंपियन होते. नंतर १९५८ सालीं सर दादरच्या छबिलदास लल्लुभाई शाळॅंत शिक्षक म्हणून ऋजूं झाले. तेव्हांपासून दरवर्षीं ते न चुकतां शालांत परीक्षेच्या केंद्राला भेट देऊन ओळखीच्या परीक्षार्थींना शुभेच्छा देतात, एकेक पेन भेट म्हणून देतात, हास्यविनोद करून ताण हलका करतात, मार्गदर्शन करतात आणि गरजूंना मदतहि करतात. हातांत ती पांच लेखनसंचांची ती पिशवी अजूनहि असते. १९५८ पासून २०१० पर्यंत ५२ वर्षें हा यज्ञ न चुकतां अविरत चालू आहे.

चित्रकलेच्या छंदातील आगळेंवेगळें वैशिष्ट्य आपण वर पाहिलेंच आहे. खेरीज भेटकार्डें बनवणें, स्वयंपाक करणें लग्नांत रुखवत क्तयार करणें, भरतकाम, विणकाम इ. कलाविषयक छंद आहेत. वाचन, नकला करणें, बुलबुल तरंग वाजवणें (देशपांडे सर बांसरी आणि पारनाईक सर बुलबुल तरंग अशी जोडी जमत असे), भाषणे करणें, सहली आयोजित करणें, स्वयंपाक करणें इ. छंद आहेत. एकदां मुलांनीं प्रत्येक छंद वेगळा लिहून कागदावर मांडले तर संग्रहाचे पन्नास भरले आणि इतर मिळून एकूण चौसष्ट छंद भरले.

मो. ह. विद्यालयांतील एक शिक्षक श्री. सुबोध देशपांडे सर. पारनाईक सर मो ह विद्यालयांत बदली होऊन आल्यावर एकदां देशपांडे सरांच्या घरीं आले. आपली ओळख करून दिली. गांव कोणतें अशी चौकशी झाली. देशपांडे सरहि मालेगांवचे. डॉक्टर पारनाईक यंना म्हणजे सरांच्या तीर्थरूपांना ते ओळखत होते. त्यांचेच चिरंजीव म्हटल्यावर ओळख घट्ट झाली आणि ऋणानुबंध जुळले. दोघेहि एकमेकांच्या वाढदिवशीं न चुकतां भेटत आणि वाढदिवस साजरा करून भेटवस्तु देत. देशपांडे सरांचे चिरंजीव परदेशीं जाण्यापूर्वीं पारनाईक सर त्यांना भेंटायला आले आणि स्वतः केलेली एक हृद्य कविता ऐकवली. वियोगाच्या क्षणीं ती कविता ऐकून सर्व उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आलें. आवर्जून योग्य क्षणीं एखाद्याला भेटून आपल्या संवेदनशीलतेनें एखाद्याचें मन जिंकण्याचा हा गुण वाखाणण्यासारखाच आहे. ज्योतीनें ज्योत चेतावी तसें पारनाईक सरांच्या सहवासांत देशपांडे सरांना पण पोस्टाची तिकिटें, काड्यापेट्या, पुस्तकें, की चेन्स आणि ध्वनिमुद्रिका जमवायचे छंद लागले. सरांच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या भावना ठाऊक आहेत पण त्यांच्या सहकार्‍यांना काय वाटतें हें समजून घेण्याचा देशपांडे सरांशीं दूरध्वनीवर बोलून केलेला हा एक प्रयत्न.

तेंडुलकर सर ऊर्फ कवि प्रफुल्ल दत्त यांच्यावरचा माझा लेख माझ्या शाळेंतल्या पण दुसर्‍या वर्गांतल्या एका मित्रानें वाचला आणि तो पारनाईक सरांबद्दल भरभरून बोलला. वास्तविक त्याला पारनाईक सर कधीं शिकवायला आले नव्हते. तरी भरभरून बोलला. त्याच्या कांहीं मित्रांना ते होते आणि लोकसत्ता इ. वर्तमानपत्रांत त्यांच्याबद्दल त्यानें वाचलें होतें. आणि पारनाईक सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे आगळेवेगळे पैलू इथें मांडावेसे वाटले. छबिलदास शाळेंत असतांनाचा त्यांचा तो केसांचा देवानंद छाप कोंबडा बहुधा आतां बहुधा त्यांनीं कापून खाल्ला आहे. उच्च सांस्कृतिक मूल्यें जतन करतां करतां आईबाबांचा समाजसेवेचा कठोर वसा सांभाळूनहि थक्क करणारे छंद जोपासणें ही तारेवरची कसरत कशी काय जमली असेल कोण जाणे. कांहीं व्यक्ती निसर्गतःच ऊर्जेचा आणि आनंदाचा असामान्य स्त्रोत घेऊन येतात. पारनाईक सर त्यांपैकींच एक. त्या काळांत मस्ती करणार्‍या मुलांना यथेच्छ फटकावणें हा शाळेंत शिकवण्याचा अविभाज्य भाग होता. पण नेहमीं हसतमुख असणारे पारनाईक सर गणितासारखा बहुसंख्य विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा विषय शिकवतांना सतत विनोदाची पखरण करीत आणि मुलांवर ताण तर येतच नसे, तर तासहि कधीं संपला तें कळत नसे.

विविध छंद आणि समाजकार्य यांमुळें सरांचे रोटरी क्लब, आकाशवाणी, दूरदर्शन, विविध सांस्कृतिक संस्थांद्वारा भरपूर आदरसत्कार झाले, मानमरातब मिळाले. नाणेंप्रदर्शन इ. कार्यक्रमांतून सरांचे सुरुवातीला गौरव झाले, नंतर सरांनीं मार्गदर्शनहि केलें. प्र्यटनानिमित्त देशाटनहि केलें. आतां सर कृतकृत्य आहेत. घरीं आणि आप्तपरिवारांत नाना म्हणून लोकप्रिय असलेले सर आतां मुलगा, सून आणि दोन नातू यांनीं भरलेल्या घरांत सुखी आहेत. नाना आज वयाच्या ७७व्या वर्षीं देखील हृदयविकाराच्या दोनदोन शस्त्रक्रियांनंतरहि या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या हरहुन्नरी अशा देवदूताचा हा उत्साह तस्साच कायम आहे. तो अस्साच कायम राहो. जीवेत शरदः शतम अशी प्रार्थना करून मीं त्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्तानें वंदन करतों आणि हा लेख, नव्हे ही लेखत्रिवेणी समाप्त करतों.
गुरुपौर्णिमा शके १९३२, इसवी सन २०१०, जुलै २५.