मालेगांवचा देवदूत

स्थळ होली क्रॉस हायस्कूल ठाणें. शालांत परीक्षेचा पहिला दिवस. शाळेबाहेर एक सोज्वळ, मृदुभाषी सद् गृहस्थ मुलांच्या गराड्यांत. कुणाला शुभेच्छा देत, तर कुणाला सुचना देत, कुणाला एखाद्या सूत्राची आठवण करून देत. कांहीं वेळानें सगळे परीक्षार्थी परीक्षेला निघून गेले. हे सद् गृहस्थ तिथेंच उभे. हाताला एक पिशवी. कांहीं पावलांवर एक साठपासष्टीची गरीब, निरक्षर महिला उभी. परीक्षा सुरुं झाल्याचा टोला पडला आणि या महिलेचा बांध फुटला. तिला रडूं आवरेना. तिच्याजवळ जाऊन तिला त्यांनीं विचारलें कीं काय झालें. तिचा मूकबधिर नातू परीक्षा द्यायला गेला होता. त्याला पर्यवेक्षकांच्या सूचना, वेळ देणार्‍या घंटेचा आवाज ऐकूं येणार नाहीं. म्हणून ती चिंताग्रस्त. तिला घेऊन ते शाळेंत गेले. केंद्रप्रमुखांना भेटले. ते आपल्य सद् गृहस्थांना ओळखत होते. त्यांना परिस्थिति कथन केली आणि त्या मूकबधिर मुलाला पर्यवेक्षकांनी तसेंच आजूबाजूच्या परीक्षार्थींनीं योग्य ती मदत दिली. नातू उत्तीर्ण झाल्यावर ती आवर्जून या देवदूताच्या पाया पडायला घेऊन आली.

या देवदूताकडच्या पिशवींत पांच पेनें आणि पांच कंपासपेट्या असतात. कोण परीक्षार्थी विसरून आलाच तर त्याला द्यायला. ठाण्याच्या नाखवा हायस्कूलची इमारत रस्त्याला खेटून आहे. रस्त्यालगतच्या वर्गांत काय चाललें आहे तें रस्त्यावर ऐकूं येतें. एकदां रस्त्यानें जातांना घरीं जातांना या देवदूताला वर्गांतून मोठ्यानें दरडावण्याचा आवाज आला. देवदूतानें सहज डोकावून पाहिलें. एक परीक्षार्थी प्रवेशिका अर्थात हॉल तिकीट घरीं विसरून आला होता. पर्यवेक्षक त्याला दमांत घेत होते. केंद्रप्रमुखांना भेटून, आपलें सामाजिक वजन वापरून लगेच देवदूतानें शाळेचा शिपाई घेऊन त्या परीक्षार्थीच्या घरीं जाऊन प्रवेशिका आणून दिली.

मालेगांव. जातीय दृष्ट्या ज्वलंत समजलें जाणारें शहर. हा देवदूत १९६० सालीं आपल्या गांवीं, याच मालेगांवला कामावरून सुटी घेऊन गेला होता. त्या वर्षीं मालेगांवला प्रथमच शालांत परीक्षा होत होत्या. आजूबाजूच्या गांवांतील अनेक मुलें परीक्षेला मालेगांवीं आलीं होतीं. भगिनी मंडळांचें कार्य हा आजवर एक विनोदाचा विषय झाला आहे. पण मालेगांवातील भगिनी मंडळांतील उत्साही महिलांनीं मुलांना दोन पेपरच्या मधल्या वेळीं खायला म्हणून पोळ्यांचा चिवडा आणि भाकरीचा चिवडा डब्यांत भरून आणला होता आणि स्वच्छ पिण्याचें पाणी भरून ठेवलें होतें. या महिलांत आपल्या देवदूच्या मातोश्री देखील होत्या. आपला देवदूत लगेच मुलांना कागदांतून पुड्या भरून द्यायच्या आणि पिण्याचें पाणि द्यायच्या कामाला लागला. वर हास्यविनोद करीत मानसिक तणाव - क्रिकेट समालोचक रवी चतुर्वेदीच्या हिंदी भाषेंत मनोवैग्यानिक दबाव - कमी करून मुलांच्या अभ्यासातील अडचणी सोडवणें, महत्त्वाच्या सूत्रांची उजळणी करणें सुरूं होतेंच.

१९६७ सालीं देवदूताला पुन्हां एकदां मालेगांवीं जावें लागलें. देवदूताचे तीर्थरूप पेशानें डॉक्टर. रुग्णाला पाहायला जातांना बरोबर मोसंबीं घेऊन जात.
घराची अख्खी माडीच साफसूफ करून त्यांनीं परिक्षार्थींची सोय केली होती. मग काय, देवदूतानें आठवडाभर मुक्काम ठोकून हास्यविनोद करून परीक्षार्थींवरील अभ्यासाचा ताण कमी केला आणि त्यांना अमूल्य असें शैक्षणिक मार्गदर्शन दिलेंच. देवदूताचे तीर्थरूप हे लो. टिळकांनीं प्रत्यक्ष शिकवलेल्या तुकडीतले एक विद्यार्थी. टिळकांचा वसा त्यांनीं पुढें नेला. धन्य तें मालेगांव आणि ते मालेगांवकर.

देवदूताच्या घरीं एक महिला घरकाम करीत असे. आजारपणामुळें तिच्यानें जसें काम होईना तसें तिनें त्यांच्याकडे आपल्या मुलीला घरकामाला आणलें. तिनें देवदूताला सांकडे घातलें कीं माझ्या मुलीला चांगलासा मुलगा पाहून द्या आणि तिला मुलीसारखें वागवा. देवदूतानें सुयोग्य वर पाहून उभयतांनीं तिचें कन्यादान तर केलेंच वर तिचें पहिलें बाळंतपणहि केलें. पतीच्या समाजसेवेंत एवढें योगदान देणारी स्त्री विरळाच.

परिसरांत कोणीहि आजारी असलें वा इस्पितळांत असलें कीं ठाण्याला राहाणारा हा आपला देवदूत औषधें आणून देणें, घरून इस्पितळांत डबा पोहोंचवणें इत्यादि सेवा आपुलकीनें देतो. अर्थातच अगत्यानें आणि विनामूल्य. गेल्या वर्षीं देवदूताला दोन धक्के बसले. देवदूताच्या सौभाग्यवतींचें देहावसान झालें. देवदूताचें स्वतःची एक बायपास आणि एक ओपन हार्ट अशा दोन शस्त्रक्रिया झाल्या. देवदूत जेव्हां स्वतः इस्पितळांत ओपन हार्ट शस्त्रक्रियेसाठीं दाखल होता तेव्हां त्यांची एक सहकारी महिला त्यांना भेटावयास आली. पण स्फुंदून स्फुंदून रडूं लागली. तिच्या यजमानांना हृदयविकाराचा झटका येऊन ते त्याच इस्पितळांत दाखल झाले होते. स्वतःचें दुःख, स्वतःच्या अडचणी दूर सारून देवदूतानें तिला धीर दिला. देवदूताबरोबर आणखी एकदोन रुग्ण होते. तुमच्या यजमानांची अजिबात काळजी करूं नका, आम्हीं समर्थ आहोंत त्यांची काळजी घ्यायला. आणि त्या उभयतांना त्यांनीं सक्रीय मानसिक आधार दिला.

धन्य तो देवदूत आणि धन्य त्या देवदूताचें सगळें कुटुंब. पण कोण, आहे कोण हा देवदूत? थोडी कळ सोसूं या. पुढील लेखांत कळेलच.

क्रमश: