उशीर

    जकाल स्वत:साठी वेळ काढणं तिच्यासाठी जरा मुश्कीलच झालं होतं. काही दिवसांपूर्वीच प्रमोशन झालेलं त्यामुळे ऑफिसमध्ये कामाचा भार सुद्धा खूप वाढला होता. घरी आल्यावर घरातली कामं, आई बाबांचं आजारपण, ह्या गोष्टी सांभाळण्यातच सगळा वेळ जायचा. शनिवार रविवार सुट्टी असली तरी ते दोन दिवस आठवड्याभरातून राहिलेल्या कामांमध्ये कधी निघून जायचे तेच समजायचं नाही. स्वत:चे छंद, आवडी निवडी यांचा तर तिला जवळपास विसरच पडला होता. क्वचित एखादे पुस्तक असायचं सोबतीला. तितकाच काय तो विरंगुळा.
लग्नाआधी आई-बाबांवर तिची जबाबदारी होती. धाकटी असल्यानं लाडावलेली. तिचं शिक्षण, तिचं सुंदर दिसणं, लोकांच्या तिच्यावरच्या नजरा आणि खास करून तिचा स्वभाव... ह्या सगळ्या गोष्टी झेलत त्यांनी तिला मोठी केली. चांगल्या घरात लग्न लावून दिलं. पण लग्नानंतर साधारण दीड वर्षातच तिचा घटस्फोट झाला. कुटुंब नियोजनाच्या नावाखाली अपत्य प्राप्तीचा प्रश्नच आला नाही. आज आई बाबांजवळ राहून त्यांना सांभाळण्याची जबाबदारी ती पार पाडत होती. थोरली बहीण होती. कधी कधी चेंज म्हणून आई बाबांना आपल्या बंगल्यावर घेऊन जायची. पण तेव्हड्या पुरतंच. आई बाबांचे थोडे जुनाट विचार आणि थोरल्या जावयाचा स्वभाव, त्यामुळे सर्वांनाच मर्यादा होत्या.
बोटावर मोजण्याइतके नातेवाईक सोडले, तर आपुलकीने विचारणारे कोणीच नाही. एखाद्या सुट्टीच्या दिवशी महेश त्याच्या बायकोला घेऊन यायचा भेटायला. तो तिला अगदी भावासारखा होता. खूप पूर्वीपासून तिला ओळखायचा. सगळ्या मित्र-मैत्रिणीपैकी त्यानेच तेव्हडा संपर्क ठेवला होता तिच्याशी. त्याच्याशी थोडंफार मनमोकळेपणाने बोलायची ती.

आज तिला थोडी उसंत मिळाली होती. कालच ताईनं आई बाबांना महिन्याभरासाठी स्वत:कडे नेलं होतं. सकाळी ती थोडी निवांत उठली.
शनिवार असला तरी सवयीप्रमाणे तिनी लगेच लॅपटॉप चालू केला. तो सुरू होईपर्यंत गॅसवर चहा ठेवला. चहा उकळेपर्यंत ती फ्रेश होऊन आली. गरम चहाचा घोट घेत तिनी मेल्स चेक करायला सुरवात केली. तसे आज खास काही अपडेट्स नव्हते आणि सुट्टीचा वार असल्यानं तिला कामाचा जास्ती उत्साह सुद्धा नव्हता. कंटाळून तिनी ऑफिसचा मेलबॉक्स बंद केला.
मग तिनी जीमेल चालू केलं. तेच तेच रटाळ जाहिरातींचे मेल्स, इबे आणि टाईम्स जॉब कडून आलेल्या नव्या ऑफर्स, एखादा फेसबुक अपडेटचा मेल. बस, इतकंच. ती लॉग ऑउट करणार इतक्यात जी मेलचा एक पॉप अप आला. "युअर मेलबॉक्स इज ऑलमोस्ट फुल. प्लीज डिलीट सम अनवॉन्टेड आयटम्स !".
हे पाहिल्यावर तिनी एक एक फोल्डर डिलीट करायला सुरुवात केली. जंक. ट्रॅश मधले सगळे मेल्स उडवून टाकले. वेगवेगळ्या विषयांच्या मेल्स साठी तिनी कप्पे केले होते. फोल्डरच्या नावाची संपूर्ण यादी तिनी टिचकी मारून उघडली. काय काय डिलीट करता येईल त्यासाठी सगळी नावे डोळ्यांखालून घालू लागली....हे करत असतानाच.. एका नावावर तिची नजर खिळली. त्या फोल्डरचं नाव होतं "डोंट ओपन, डोंट डिलीट !"
अश्या विचित्र नावाच्या फोल्डर मागे एक इतिहास होता. अडीच तीन वर्षांपूर्वी तिनेच ते तयार केलं होतं. 'त्या'च्या आठवणी, त्यांनी एकमेकांना केलेले प्रेमाचे मेल्स, काही फोटो, आणि .. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 'त्या'नं लिहिलेले असंख्य लेख !
साधारण सहा वर्षांपूर्वी त्याचा पहिला लेख वाचला. त्यानंतर त्यानं लिहिण्याचा आणि तिनं वाचण्याचा सपाटा सुरूच ठेवला. त्याच्या लेखनामुळेच तर ती त्याच्यावर इतकी फिदा झाली होती. लेखनाच्या रूपात येऊन त्यानं कधी तिच्या मनावर भुरळ घातली, ते तिलाही समजलं नव्हतं. तो सुद्धा, आपला लेख वाचणारी 'ती'च पहिली व्यक्ती असावी, ह्याच उद्देशानं लेखन करायचा. तसं ते दोघं एकमेकांना रोज भेटायचे, पण लेखनामधून समोर येणारा त्याचा चेहरा प्रत्यक्षाहून खूप वेगळा होता.
त्याचा मेल आला रे आला, की ती खूप उतावळेपणाने तो लेख वाचायची. त्याचं प्रत्येक लेखन तिनी अनेकदा डोळ्यांखालून घातलं होतं. तिचं मन मात्र असमाधानीच राहायचं !
जर ते फोल्डर उघडून सगळे लेख परत वाचायला सुरू केले, तर तो परत येऊन मनाचा ताबा घेईल अशी भीती होती तिला. त्याच्याबरोबर आयुष्यात पुढे जायचं नाही असं तिनी मनाशी पक्कं केलं होतं. त्याला तशी करणं ही होती काही.
पण मनात खोलवर, खूप आतपर्यंत रुतून बसलेल्या त्याला, कसं बाहेर काढायचं ? त्याच्या ह्या आठवणी "डिलीट" करून टाकायची हिंमत मात्र होत नव्हती.
म्हणूनच त्या फोल्डरला तिनी नाव दिलेलं - "डोंट ओपन, डोंट डिलीट !". त्यातलं काही बघायचं नाही पण ते डिलीटसुद्धा करायचं नाही. तिनी मेलबॉक्स ला एक नियम लावला. त्याच्याकडून आलेला मेल इनबॉक्स मध्ये न दिसता थेट त्याच फोल्डर मध्ये जाऊन पडायचा.
तिनी त्याचा शेवटचा लेख साधारण अडीच वर्षांपूर्वी म्हणजेच तिच्या लग्नाच्या आधी वाचला होता. त्यानंतर तिनं त्या ईमेल्सकडे खूप कटाक्षानं दुर्लक्ष केलं होतं. तिच्या संसारात 'त्या'ची आठवण टाळणंच फायद्याचं होतं. जगाला दाखवण्यापुरते का होईना, यशस्वी झाली होती ती.

आज तिला परत एकदा सगळे लेख डोळ्यांखालून घालण्याचा मोह होत होता. तिचं मन तिला तसं करायला भाग पाडत होतं.
तिनी मेल्सच्या यादीवर परत एक नजर फिरवली. "न वाचलेल्या" मेल्स ची यादी खूप मोठी होती. प्रत्येक लेख लिहिल्यावर तो तिला त्याचं लेखन ईमेल करायचा. त्यानं ही प्रथा आजपर्यंत चालू ठेवलीये ह्याचं तिला खूप कौतुक वाटलं. आजच्या घडीला कसली चिंता नव्हती, संसाराचा बोजा नव्हता.
अखेर परिणामांचा फार विचार न करता तिनी लेख वाचायला सुरुवात केली.
त्याच्या बरोबर घालवलेली एक एक आठवण डोक्यात येऊ लागली, तो आपल्या सोबत असल्यावर जो उत्साह आणि आनंद वाटायचा, त्याच भावना तिच्या मनावर स्वार व्हायला लागल्या.
आयुष्याच्या पुस्तकातली पाने भराभर उलटी धावू लागली....आज ती खूप दिवसांनी, परत एकदा भूतकाळात रमली.

(क्रमश:)