उशीर - अंतिम भाग

दुवा क्र. १ पासून पुढे ..
~*~
    "का आजपर्यंत त्याचे मेल्स आणि लेख तू जपून ठेवले आहेस ? का वाचत होतीस ते ? काय चालू आहे तुझं कळतंय का तुला ? " महेश संतापानं म्हणाला.
"मला समजतंय महेश.. मला पूर्ण मान्य आहे की मी खूप विचित्र आणि मूर्खासारखं वागतीये. पण मी काय करू रे ..  दिवस रात्री, प्रत्येक क्षणाला मला तोच डोळ्यांसमोर दिसतो. इतके वर्ष फक्त स्वत:ला फसवत आलीये मी .. माझ्या चुका कळल्यात रे आता मला.. त्या चुकांपायी मी सगळं गमावून बसली आहे.."
"तू स्वत:ला तर फसवलंसच, पण त्याच्याबरोबर तू जगाला फसवायचा प्रयत्न केलास. काय चूक होती गं तुझ्या नवऱ्याची ? त्याच्या जीवनात असं का व्हावं ? त्याला पण फसवलंस ना ? कोण जबाबदार आहे त्याला ? ... एक मिनिट.. मला एक कळत नाहीये, इतक्या दिवसांनी ह्या विषयावर चर्चा का करतोय आपण ? असं अचानक तुला झालं काय... अजून कितीवेळा ह्याच विषयावर चर्चा करायची ? बंद कर हा विषय.. मनात आला तरी दुर्लक्ष कर.. "
"मी चुकले रे .. मला माफ कर.. मला नाही जगता येते त्याच्या शिवाय. मी काय करू म्हणजे मला तो परत मिळेल ? मला तो हवाय माझ्या आयुष्यात. त्याच्याशिवाय मी अपूर्ण आहे .."
"खरं सांगू का .. तुला लाज कशी वाटत नाही असं वागताना ? डोस्कं तर ठीक आहे नं ? ... अग ती काय खेळण्यातली गोष्ट आहे का ? म्हणे मला तो हवाय ..
एक वेळ होती तशी, की तो फक्त तुझाच होता. पण आता नाही ..ती वेळ निघून गेली आहे. गेल्या अडीच तीन वर्षात तो बराच पुढे गेला आहे. त्याला मिळवण्याची स्वप्नं बंद कर...
फक्त चूक मान्य करून काही होत नसतं. त्याप्रमाणे आपल्या वागण्या बोलण्यात आणि स्वभावात बदल करणं अपेक्षित असतं. जेव्हा आम्ही सगळे तुला सांगत होतो तेव्हा आमची तळमळ दिसली नाही का गं तुला ? सगळे मित्र गमावलेस .. केवळ तुझ्या स्वभावामुळे.. आमचं सोड.. तू आयुष्यात परत यावीस म्हणून 'त्या'नं काय काय नाही केलं ? बिचारा स्वत:ला दोष देत होता कित्येक दिवस... सगळं कळत असून त्याकडे दुर्लक्ष केलंस ? आणि म्हणे मी त्याच्यावर प्रेम केलं... काय चुकलं गं त्याचं ? त्यानं तुझी गहन चूक तुझ्या निदर्शनात आणून दिली, तर लगेच तुझा इगो दुखावला ?
तुझे ते लाळपुशे मित्र, ज्यांना तू हवीहवीशी वाटतेस.. ते स्तुतीसुमनंच उधळणार गं तुझ्यावर.. चुकलीस तरी वा काय छान चुकलीस.. असंच म्हणणार ते.. तुला हसील करायच्या आधीच तुला गमवायचा धोका का पत्करतील ते? भौतिक गोष्टींच्या सुखांखेरीज काय देऊ शकतात तुला ते ? तेव्हा तुला प्रेमापेक्षा ते मित्र महत्त्वाचे वाटायचे ना ? सगळं कळत होतं तुला. स्वत:च्या कामांसाठी त्यांचा कसा फायदा घ्यायचीस तू ते बघितलंय मी.. आज कोण आहे तुझ्यासोबत ? आहे उत्तर ह्याचं ?
का असं वागलीस ? आणि आज का असं वागत आहेस ? कळत नसेल तर स्वत:ला विचार.. कोण खपवून घेईल गं तुझा असला स्वभाव ?
'त्या'नं तुला नाही म्हटलं मान्य. पण त्यामागची कारणं ? त्यांच्याकडे कसं दुर्लक्ष केलंस ? त्यानं पाठ दाखवली आणि लगेच तू सुद्धा हात वर केलेस.. आई बाबांच्या मर्जीने लग्न करायचं ठरवलंस खरं, पण मग त्या संसाराचा गाडा पुढे ओढताना का कमी पडलीस तू ?
चुकले चुकले करायचं.. चुका समजल्या म्हणायचं .. आणि परत पहिले पाढे पंचावन्न.. मग आयुष्यात जे होईल त्याबद्दल नशिबाला दोष देत बसायचं ...हेच तू करत आली आहेस.. कारण हाच तुझा स्वभाव आहे.. सेल्फ सेन्ट्रीक .. सगळ्यांनी तुझ्या भोवती फिरावं असंच तुला वाटत आलंय.. तसं नाही झालं की मग चीड चीड.. भांडणं .. बरोबर ना.. ? "
महेशच्या डोळ्यात सगळा भूतकाळ अश्रूंना घेऊन उभा राहिला. त्याची तळमळ डोळ्यातून ओसंडून वाहत होती. महेशनं तिला आणि 'त्या'ला; दोघांनाही आयुष्याच्या ह्या खडतर भागातून जाताना पाहिलं होतं.
महेशच्या बोलण्यानंतर एकदम शांतता पसरली..हेच भाषण महेशनं ह्या आधी अनेक वेळेस देऊन झालं होतं. पण आज गोष्ट वेगळी होती. त्याला तिच्या डोळ्यातल्या भावना खूप वेगळ्या वाटत होत्या. तिला खरंच समजतंय ते त्याला कळत होतं.
"मला सगळं कबूल आहे महेश, मी काय वागले, कुठे चुकले.. सगळं सगळं मान्य.. पण आज, इतक्या दिवसांनी मला समजल्या आहेत रे गोष्टी.. आज खऱ्या प्रेमाची किंमत मला कळत आहे .. माझ्या आयुष्यात मी कोणत्या गोष्टीला मुकली आहे ते समजलंय मला. त्याला परत मिळवायला काय वाट्टेल ते करायला तयार आहे मी .. खूप असह्य झालंय आता.. "
महेशचं बोलणं इतकं स्पष्ट, खरं आणि मनाला झोंबणारं होतं की तिला रडण्याखेरीज पर्यायच उरला नव्हता.
"हे बघ, माझं ऐक.. आता सगळं संपलं आहे. खूप उशीर झाला आहे तुला.. तो त्याचं आयुष्य खूप आनंदानं घालवत आहे..तू कोणतीही चूक करणार नाहीयेस ह्यापुढे ... लेट हिम लिव्ह हिज लाईफ पिसफुली.." महेश सांत्वन करायला आणि त्याच वेळेस तिला सावध करायला म्हणाला..
"महेश मला एक अखेरचा प्रयत्न करायचा आहे.. आणि मला त्यात तुझी मदत अपेक्षित नाहीये.. माझ्यामुळे सगळं झालंय.. मी माझ्या परीनं हे निस्तरायचा प्रयत्न करणार आहे .. " ती हट्ट सोडायला तयार नव्हती.
"माझं ऐकायचंच नाही असंच ठरवलं आहेस तर ठीक आहे. मी पण तुला फारसं काही सांगणार नाही. तू प्रयत्न करूनच बघ. हा पण अनुभव घेच तू. तो तुला परत मिळणार नाही हेच तात्पर्य आहे.. विसरून जा त्याला.." हे महेशचं तिथून निघण्यापूर्वीचं शेवटचं वाक्य होतं.

घरी आल्यावर मनाचा निश्चय करून तिनी 'त्या'ला मेसेज केला. "भेटता येईल ? बोलायचं होतं."
"ठीक आहे, शनिवारी संध्याकाळी सात, वाडेश्वर.." त्याचा रिप्लाय पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिनी लगेच एका स्मायलीनं त्याला रिप्लाय केला.

पाठमोऱ्या आकृतीकडे बघून ती व्यक्ती कोण आहे ते ओळखायला तिला फारसं जड गेलं नाही. ती त्याच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली. तो खूप आनंदी आणि प्रसन्न वाटत होता.
काही क्षण शांतता होती. तिचा हेतू अगदी स्पष्ट होता. पण हिंमत होत नव्हती त्यामुळे तोंडातून शब्द येत नव्हते.
"बोल, कशी आहेस.. जॉब कसा सुरू आहे ? आई बाब बरेत ?" शेवटी त्यानंच सुरुवात केली.
"सगळे मजेत, थोडे आजारी असतात अधून मधून, सध्या ताईकडे आहेत काही दिवस.. तू सांग कसा आहेस.. "
"मी ? कसा वाटतोय ?" त्यानं अगदी प्रसन्न चेहरा करून उत्तर दिलं.
आपल्याला पाहून तो सुद्धा खूश झाला आहे असा तिचा समज झाला. ह्या भेटीतच मनातल्या भावना बोलून टाकायचा निश्चय तिनं आधीच केला होता.
काही क्षण परत शांतता होती, तो त्याच्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसला होता, तर ती बोलण्यासाठी हिंमत जमवत होती.
"तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं.." - एक मोठा श्वास घेऊन तिनी सुरुवात केली.
त्याचं लक्ष फोन मध्येच..
"अरे मी काहीतरी म्हणाले, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं."

तितक्यात एक व्यक्ती येऊन अगदी हक्कानं त्याच्या शेजारच्या खुर्चीत येऊन बसली.
"अरे ट्राफिक इतकं होतं.. म्हणून थोडासा उशीर झाला.. ह्यांचा परिचय ?" - ती व्यक्ती त्याला म्हणाली.
"अरे हो की.. तुम्ही पहिल्यांदाच भेटताय नाही का.. ..  मधुरा, ही माझी खूप जुनी मैत्रीण अनु .. आणि अनु... ही मधुरा, माझी होणारी बायको.." - त्यानं किंचित लाजत दोघींचा परिचय करून दिला.
तिच्या पायाखालची जमीनच सरकली.. कोणीतरी सणसणीत चपराक लावावी अशी तिची अवस्था झाली..

"बरं मी निघते आता..  मला एके ठिकाणी जायचं होतं, खूप अर्जंट होतं.. पण आता खूप उशीर झालाय .. तरी मला जायलाच लागेल .. तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन.. लग्नाला येणारे मी बरं का .. " - इतकं म्हणून ती निघून गेली.
तिच्या मनात काय सुरू होतं ह्याची शंका त्याला त्या क्षणाला आली. अखेर तो स्वत:च्या मनाशीच म्हणाला..
"मला अपेक्षित होतंच, पण आता खूप उशीर झालाय... "

-समाप्त