उशीर -२

दुवा क्र. १ इकडून पुढे..
~*~
       रंतर वाचनात आलेल्या तुझ्या पहिल्याच लेखात तू मला जिंकून टाकलं होतंस. तो लेख वाचून झाल्यावर तुझे सगळे लेख शोधून वाचून काढले.
तू नक्की कोण आहेस ? कसा दिसतोस ? तू प्रत्यक्षात कसा वागतोस, कसा बोलतोस ते जाणून घ्यायचंय मला ! इतकं छान छान कसं सुचतं रे तुला? कुठून येतात असल्या कल्पना तुझ्या डोक्यात ?  जे मला दिसत नाही ते तू कसं बघू शकतोस ते सांग ना मला ?
आपण त्या दिवशी भेटलो. त्यानंतर परत परत भेटलो. आपल्या आवडीनिवडी इतक्या मिळत्या जुळत्या असतील असं वाटलं नव्हतं मला. वेळ बघ ना कसा भराभर निघून गेला. आपण दोघं एकमेकांचे कधी झालो ते कळलंच नाही !
तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण लक्षात आहे माझ्या. तुझी मला प्रपोज करायची अनोखी पद्धत, तुझा तो खट्याळ स्वभाव, तुझी हजरजबाबी बडबड..
माझा पार्टनर कसा असावा ह्याची खूप स्वप्न पहिली होती मी. सगळ्याच स्वप्नांमध्ये तू दिसायला लागलास ! तुला जितकं समजत गेले, तितका तू माझ्या मनात खोलवर रुतून बसलास. मनाला कळत होतं, उद्या सगळं सुरळीत झालं नाही, तर तुला मनातून काढून टाकणं खूप मुश्कील आहे. आजसुद्धा बघ ना, नाहीच जाऊ शकलास माझ्या मनातून. स्वत:ला फसवायचे किती प्रयत्न करून झाले.... नाही जमत रे. आज इतक्या दिवसांनी तुझे लेख वाचले, किती छान लिहितोस.. अजूनही असंच वाटतं की मी तुला ओळखतच नाही. आज परत तुला जाणून घ्यायची इच्छा होतीये. तुला भेटायची इच्छा होतीये... माझ्या आयुष्यात तू मला परत हवाहवासा वाटायला लागलायस...

बेलच्या आवाजानं ती दचकून भानावर आली. सोफ्यावरून उठून तिनी गडबडीत अश्रू पुसले आणि दरवाजा उघडला. दारात महेश उभा होता.
"अरे आज एकटाच ? रश्मी कुठाय ? बैस. मी पाणी आणते.. " रडवेला चेहरा लपवण्याचा हा एक बहाणा होता.
"ती गेलीये पलीकडे तिच्या मैत्रिणीकडे. भिशी आहे म्हणे आज त्यांची. अर्ध्या एक तासांत येईलच इकडे. तसं माझं काय काम तिथे, म्हटलं चला जरा काका काकूंना भेटून येऊ. म्हणून इकडे आलो. ते दोघं दिसत नाहीत कुठे ?" - तांब्या भांडं टी-पॉय वर ठेवत महेश म्हणाला.
"अरे त्यांना कालच ताई घेऊन गेली बंगल्यावर. आता महिनाभर तिकडेच राहणार आहेत. तू सांगा कसा आहेस ? चहा घेणार की कॉफी ?"
"चहा चालेल. अगदी अर्धा कप हा .."
ती चहा करायला आत गेली. इकडे तिकडे वाचायला काही मिळतंय का ते बघत महेशनी संभाषण चालू ठेवलं. बोलता बोलता त्याची नजर शेजारीच पडलेल्या लॅपटॉप कडे गेली. लॅपटॉपचा स्क्रीन चालूच होता......

पाच मिनिटांनी ती चहा घेऊन आली. महेश एकाएकी शांत झालाय हे तिला जाणवलं होतं.
"हा घे चहा, खास आलं घालून केलाय बरं का .."
"तुझ्या लॅपटॉपचा स्क्रीन चालूच होता. सहज नजर केली तेव्हा समजलं की काय सुरू होतं आपलं ते ..का असं वागतीयेस तू? अजूनही त्याचाच विषय डोक्यात ठेवलायस ? " - महेश चांगलाच संतापला होता.
"मला कळतंय महेश, की हे चूक आहे.. त्याला मी माझ्या मनातून फार पूर्वीच काढणं अपेक्षित होतं... पण कधी जमलंच नाही रे.. फक्त खोलवर कुठेतरी त्याला गाडून टाकलं मनात.. स्वत:पासूनच लपवायचा प्रयत्न केला. आजही मी त्याला नाही विसरू शकले.. मी काय करू महेश.... " - इतका वेळ राखून ठेवलेल्या हुंदक्यांना आणि अश्रूंना वाट करून देत ती म्हणाली.
"हे बघ, माझ्यामते आपण ह्या विषयावर न बोललेलंच बरं. तुझं वागणं ह्या जगात कोणाला समजेल काय माहीत..  निघतो मी. रश्मीला बाहेरच पीक करतो."
ह्याआधी अनेक वेळेस महेश आणि तिच्यात ह्या विषयावर चर्चा झाली होती. महेशनी तिला खूप समजावलं होतं. पण आता महेशचा पेशन्स संपला होता. आजतर त्याला खूप मोठा धक्का दिला होता तिनं. महेश ताडकन उठून निघून गेला. त्याच्या कपात चहा तसाच शिल्लक होता.

इतकं होऊन सुद्धा तिला हवं तेच तिनं पुढे सुरू ठेवलं. तिचा स्वभावच असा होता. 'त्या'चे लेख, 'त्या'चे सगळे मेल्स वाचणे, 'त्या'नं दिलेले ग्रीटिंग्स बघणे.. असल्या गोष्टींनी तिचा दिनक्रम अगदी समृद्ध झाला. त्यांच्या प्रेमाचे सगळे पुरावे तिनी परत उघडे पाडले. आज ती पुन्हा त्याच्या प्रेमात पडली होती. आपला घटस्फोट झाला आहे ह्याचा तिला पूर्णपणे विसर पडला. तिला फक्त तोच दिसत होता. गेली अडीच तीन वर्ष मनात सुप्त असणाऱ्या ज्वालामुखीचा उद्रेक व्हायला सुरुवात झाली होती.

दोन आठवडे होऊन गेले. महेशचा फोन, मेसेज काहीच आला नाही. तिनी सुद्धा ह्या काळात महेशला संपर्क केला नाही. हा इगो सुद्धा तिच्या लाडावलेल्या स्वभावाचाच एक भाग. पण खूप जवळच्या व्यक्तीसमोर इगो वगैरे सगळं बाजूला पडतं. तेच झालं. आज तिला राहवत नव्हतं. महेश हा एकमेव व्यक्ती होता ज्याच्याशी ती मोकळेपणानं बोलायची. तिच्या आणि 'त्या'च्या प्रश्नांमध्ये महेशनी बऱ्याचदा मदत केली होती. इतर मित्र-मैत्रिणींनी "हे सगळे तिच्या स्वभावाचे परिणाम आहेत" असं म्हणून आपले हात कधीच झटकले होते. ती एकटी पडली, तेव्हा महेश अगदी भावासारखा तिच्या बाजूला उभा राहिला. तिला ह्यातून बाहेर काढायला त्यानं खूप कष्ट घेतले होते. त्यामुळे महेश हा इतर मित्रांपेक्षा खूप वेगळा होता. कित्येक दिवस महेश भेटला नव्हता. तिची घुसमट क्षणाक्षणाला वाढत होती. महेश सारख्या चांगल्या मित्राला तिला गमवायचं नव्हतं.
अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे ह्यात तिच्या मनाचा स्वार्थ सुद्धा दडला होता. तिला माहीत होतं, 'त्या'च्यापर्यंत पोहोचण्याचा महेश हा एकमेव मार्ग आहे. महेश ही एकच व्यक्ती आहे जी माझ्या आणि 'त्या'च्या दोघांच्या संपर्कात आहे.
तिनी महेशला फोन लावला.
"महेश असं नको वागूस रे माझ्याशी."
"मग कसं वागू मी ? तू जे वागत आहेस त्याच्याकडे लक्ष दे आधी, तुझ्यामुळे किती लोकांचं नुकसान झालंय त्याची कल्पना आहे का तुला ? सोड ना.. आपण कशाला बोलतोय.. मला कामं आहेत."
"महेश एकदा माझ्या भावना ऐकून घे रे .. असं नको करूस.. " तिनं आपलं नेहमीचं रडण्याचं शस्त्र काढलं.
तसं तिचं रडणं महेशला नवीन नव्हतं. पण 'त्या'चा विषय आज खूप दिवसांनी निघाला होता. आज ह्या विषयाची तीव्रता आणि महत्त्व वेगळं आहे असं महेशला वाटलं. अखेर त्यानं भेटायची इच्छा दाखवली.
"ठीक आहे.. शनिवारी बाहेरच कुठेतरी भेटू.. एकटाच येतो.. जे बोलायचं ते बोलून घे.. त्यानंतर आपल्यात हा विषय कधीच नकोय मला.. 'त्या'ला डोक्यातून काढून टाक लवकरात लवकर.. तेच तुझ्या हिताचं आहे."
थॅन्क्स म्हणून तिनी फोन ठेवला. 'तो' कसा आहे, सध्या काय करतोय हे सगळं तिला महेश कडून समजणार होतं. त्याचा एक वेगळाच आनंद तिला त्या क्षणाला होत होता.
क्रमश: