लक्ष्मीची पाउले

भारताचे स्वातंत्र्य 'लक्ष्मीच्या पावलांनी' आले असे सर्वार्थाने म्हणता येइल. स्वातंत्र्यसंग्रामातील पहिल्या स्वातंत्र्यसमरात राणी लक्ष्मीबाइच्या पाउलखुणा उमटल्या तर अखेरच्या पर्वात आझाद हिंद सेनेच्या झाशी राणी रेजिमेंट मधिल कॅप्टन लक्ष्मीने आपल्या पाउलखुणा उमटविल्या. कोणत्याही लढ्यात स्त्रीच्या सहभगाला अनन्य साधारण महत्त्व आहे. १९२१ साली लेनिन ने महिला दिनाच्या निमित्ताने असे उद्गार काढले होते कि "जोपर्यंत स्त्रीया राजकिय जीवनात सहभागी होत नाहीत तोपर्यंत राजकिय जीवनात जनतेला ओढले असे म्हणता येणार नाही". सात वर्षांनंतर म्हणजे १९२८ साली नेताजी सुभाष यांनी काँग्रेस सम्मेलनात असे प्रतिपादन केले कि " स्त्रीयांच्या सक्रिय सहानुभुतीशीवाय आणि पाठिंब्याशिवाय राष्ट्रातील पुरुषांना स्वातंत्र्य मिळणार नाही". खरोखरच इतिहासाला ज्ञात आणि अज्ञात असलेल्या असंख्य स्त्रीयांनी भारतिय स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व समर्पित केले आहे. काही इतिहासकारांनी अशी खंत प्रांजलपणे व्यक्त केली आहे कि स्त्रियांचा सहभाग तितकासा प्रकाशात आला नाही वा गौरवला गेला नाही.


१८५७ मध्ये रामगढची राणी अवंतिका, झिनतमहल, आलिया बेगम तसेच अझिझन यांनी शस्त्र धारण केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली महिला सैनिकांच्या दोन तुकड्या लढल्या. त्यांचा पाडाव झाल्यावर इंग्रजांनी त्या दोघींना गोळ्या घालून ठार केले. विसाव्या शतकात क्रांतिचा वणवा पेटल्यावर अनेक ज्वाला प्रदिप्त झाल्या. हार्डिंग्जच्या वधासाठी बाँबस्फ़ोट करून १९११ साली राश बिहारी बोस यशस्वीरित्या निसटले. ते लाहोरला जाणारच असा कयास असलेल्या पोलिसांनी त्यांना तिथे लपता येउ नये म्हणून सर्व खबरदारी घेतली. अनोळखी व एकट्या तरुणाला आसरा देउ नये असा फ़तवा पोलिसांनी काढला तेव्हा राश बिहारी यांचे विश्वासू साथिदार राम मोहन यांची पत्नि वासंतीदेवी हिने राश बिहारिंची पत्नि असल्याचे नाटक करून त्यांना महिनाभर आश्रय दिला. राश बिहारी तिथुन पूर्वेकडे जाण्यासाठी भारताबाहेर निसटले. फ़ितुरीने ही बातमी पोलिसांना समजली. त्यांनी वासंतिदेवींचा अमानुष छळ केला, अखेर त्यांनी कसलीही माहिती न दिल्याने पिसाळलेल्या इंग्रजांच्या हुकुमाने बलुची रेजिमेंटने सामुहीक बलात्कार केला व त्यात वासंतीदेवी मरण पावल्या. १९१५ मध्ये इंडो-जर्मन कट फ़सल्यावर परागंदा झालेल्या अमरेंद्र चटर्जि, जदुगोपाल मुखर्जी, अतुल घोष इत्यादिंना नानीबाला घोष नामक विधवा स्त्रीने आपल्या घरात आश्रय दिला इतकेच नव्हे तर तिने सौभाग्यालंकार अंगावर चढवून ती अलिगढ तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या रामचंद्र मुजुमदार याची पत्नि बनुन त्याला तुरुंगात भेटायला गेली व सांकेतिक भाषेत त्याच्याशी बोलुन तीने त्याने लपविलेल्या दोन मॉवजर रिवॉल्वर्सचा ठावठिकाणा बाहेर येउन त्याच्या साथिदारांना सांगितला. याच सुमारास पोलिस उप-अधिक्षक वसंत चॅटर्जी याच्या खुनाच्या कटाबाबत फ़रारी असलेले क्षितिज चौधरी व सुरेन्द्र मोहन घोष यांना क्षिरोसुंदर चौधरी या विधवा स्त्रीने त्यांची आइ बनून आसरा दिला. मास्टर सूर्यसेन व त्यांच्या साथिदारांना सावित्री चक्रवर्ति व क्षिरोद प्रभा विश्वास यांनी आश्रय दिला. या दोघी तसेच नानीबाला यांना त्यबद्दल काही वर्षे तुरुंगवास पतकरावा लागला. १९३० ते १९४० हे दशक गाजविले ते बंगालच्या वाघिणींनी. १९३१ साली ज्यांना आपल्या हडकुळ्या बोटांनी अंगठ्याचा आधार घेतल्याशिवाय पिस्तुलाचा घोडा ओढता येत नव्हता अश्या अवघ्या १३ वर्षाच्या मुली सुनिती चौधरी आणि शांति दास यांनी कोमिल्लाचा जुलुमि कलेक्टर स्टिवन्स याला अगदी समोरून गोळ्या घातल्या व त्यांना ८ वर्षे कैदेची सजा त्या लहान वयातही दिली गेली. सतत क्रांतिकारकांच्या सहवासात असलेल्या पारुल मुखर्जीला १९३२ साली एक वर्ष नजरकैदेत ठेवुनही ती पुन्हा क्रांतिकारकांना सामिल झाली. २० जानेवारी १९३५ साली तिच्या घरावर पोलिसांनी धाड घातली तेव्हा त्यांना तिथे भरपूर स्फ़ोटके सापडली. तुरुंगात त्यांचा छळ केला गेला, एका पोलिस अधिकाऱ्याने बलात्काराचा प्रयत्नही केला, मात्र पारुल मुखर्जी यांनी धैर्याने प्रतिकार केला व त्याच्या तोंडावर पायातली वहाण मारुन सुटका करुन घेतली. त्याच तुरुंगात (टॉलीगंज पोलिस ठाणे) असलेल्या सांतीसुधा यांनी एका पोलिसाला आपल्या सोन्याच्या बांगड्या दिल्या व त्याच्या करवी ही बातमी बाहेर वर्तमान्पत्रांपर्यंत पोचवली. फ़ार गाजावाजा झाल्यामुळे पारुल मुखर्जी यांना दुसरीकडे हलवीले गेले. मुळची अयर्लंडची कॅथरिन इथे येऊन सरला देवी झाली व तिने एच एस आर ए च्या कार्यात वाहुन घेतले. त्यांना यशपाल यांच्यासह १९३२ साली अटक झाली व यशापाल कपूर यांना आश्रय दिल्याबद्द्ल ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. प्रितिलता वड्डेदार ने मास्टर सूर्यसेन यांच्या खांद्याला खांदा लावुन सशत्र चकमकित भाग घेतला व पहाडतळी क्लब वरील हल्ल्याचे नेतृत्त्व केले. २४ सप्टेंबर १९३२ रोजी युरोपिअन क्लब वर हला करून तीने आपल्या साथिदारांसह ११ गोरे ठार केले तर अनेक जखमी केले. पोलिसांच्या हाती पडण्याऐवजी तिने सायनाइड घेउन मरण पत्करले. अखेच्या प्रसंगी तिच्या मृतदेहाबरोबर पोलिसांना एक चीट्ठी सापडली, तिच्यात ५ प्रश्न होते, सर्वांचा रोख एकच - ' स्त्रियांना पुरुषंच्या इतकाच हक्क असताना त्यांना सशस्त्र क्रांतीपासून दुर का ठेवले जात आहे?'. कैलासपती या एच एस आर ए सदस्याने आपल्या प्रेयसीला आपल्या बरोबर आणले होते, पुढे त्याचे संघटने कडे दुर्लक्ष्य झाले व नंतर तो फ़ितुरही झाला. यामुळे आजादांनी स्त्रियांना मनाइ केली होती, त्या अनुशांगाने हे प्रश्न होते. १९३४ साली नेताजिंचे शिक्षक वेणीमाधवदास याची कन्या बिना दास हिने स्टॅन्ले जॅक्सन याला गोळ्या घालाचा प्रयत्न केला व तुरुंगवास पत्करला तर ८ मे १९३४ ला उज्ज्वला मुजुमदार हिने बंगाल गव्हर्नर जॉन अँडरसन याला गोळ्या घातल्या. लीला नाग, सुशीला दासगुप्ता, हेलेना गन, लावण्या दासगुप्ता व रेणु सेन यांना बॉम्ब व काडतुसे जमविण्याच्या आरोपावरुन अटक व तुरुंगवास झाला. बड्या बापाची बेटी असलेल्या कल्पना दत्त ने चित्त्गांव शस्त्रागार लुटायच्या मोहिमेत भाग तर घेतलाच पण पुढे जेव्हा अनेक जण पकडले गेले तेव्हा त्यांनी टिटाघर तुरुंगात सुरुंगस्फ़ोट घडवुन पलायन करायचा कट केला तेव्हा कल्पना दत्तने आपल्या घरावर कुणाचे लक्ष नसेल याचा फ़ायदा घेत 'युगान्तर समिति' च्या रेणू राय व कमल मुखर्जी यांच्या मदतिने सुरुंगाची दारु जमवली होती. हा कट उघडकिस आला तेव्हा पोलिसखाते हादरले होते इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरुंगाची दारु या मुलिंनी जमवली होती. इशान्येत ३१ च्या अखेरिस जदो नांग फ़ाशी गेल्यावर राणी गायडिनलु हिने १९३२ साला पासून ब्रिटिशांशी झुंज दिली व अनेक वर्षे तुरुंगवासही पत्करला. पुढे स्वातंत्र्या प्राप्तिनंतरही तिचा न्याय व समता यासाठी लढा व तुरुंगवास सुरुच राहीला. ती कुठल्याही संस्थानची राणी नव्हती तर तिच्या कार्याखातर नागभूमिचे लोक तिला आदराने राणी म्हणत. अर्थात सर्वात कळस म्हणून जिचा उल्लेख करावा अशी स्त्री क्रांतिकारक म्हणजे भगवतिचरण वोरा यांची पत्नि दुर्गावती. तीने आयुष्यभर क्रांतिकारकांची साथ दिली, अनेकांना आसरा दिला, अनेकांची सुश्रुषा केली अनेकांना अन्न दिले व वेळ आली तेव्हा भगतसिंहाला लहोरच्या बाहेर काढण्यासाठी तिने आपल्या लहान मुलासह त्याची पत्नि बनुन लाहोर ते कलकत्ता असा प्रवास केला. २८ मे १९३० रोजी स्फ़ोटकांची चाचणी घेताना भगवतिचरण मरण पावले, मात्र दुर्गावतिंनी शोक न करता आजादांकडे असा हट्ट धरला कि १ जून ला भगतसिंहाला बोर्स्टल तुरुंगतून ठरल्याप्रमाणे सोडवाचा प्रयत्न करायचाच; मात्र भगवतिचरण यांची उत्तराधिकारी म्हणून पोलिस व्हॅन वर बाँब त्या स्वतः टाकणार! त्यांना नकार मिळताच भगवतिचरण यांची बहिण सुशिलादिदी हिने ते काम स्वतःला मिळावे अशी गळ घातली. मात्र तुमची मदत क्रांतिकारकांना पुढे लागेल तेव्हा आता तुम्ही कृतिमद्ध्ये उतरू नका अशी आजादांनी त्यांची समजुत घातली. अर्थातच सुटकेचा प्रयत्न फ़सला व सर्वांनी तातडिने लाहोर सोडून निरनिराळ्या ठिकाणी जायचे ठरले. तेव्हा मात्र पति-निधनानंतर आवरलेले अश्रू दुर्गावती आवरू शकल्या नाहीत. जाताना त्यांनी आपले सर्व दागिने आजादांच्या हाती ठेवले आणि त्यांना सांगितले कि त्यांच्यापेक्षा संघटनेला या पैशाची अधिक गरज आहे. त्या प्रसंगी आजादांसारखा पहाडी मनुष्य त्यांच्या पायावर डोके ठेवुन रडला होता. ७ ऑक्टोबर १९३० साली भगतसिंह, राजगुरु व सुखदेव यांना फ़ाशीची शिक्षा सुनावली गेली. मात्र कितिही क्रांतिकारक फ़ासावर गेले वा गोळ्यांना बळी पडले तरी उरलेले भिणार नाहीत व कार्य चालूच ठेवतील हे दाखविण्यासाठि ८ ऑक्टोबर १९३० रोजी क्रांतिकारकांनी मुंबई पोलिस आयुक्तावर हला करायचा ठरवला. माहोर यांनी दुर्गावतिंचा लहान मुलगा शचिंद्र याला दादर येथे आपल्या ओळखिच्या कुटुंबाकडे नेउन ठेवले. बापट यांनी एक गाडी मिळवली व ते ड्रायवर झाले. बरोबर होते पृथ्विसिंह, सुखदेवराज व पुरुषवेष धारण केलेल्या दुर्गावती. त्यांनी आयुक्त हिली यांना ठार करण्यासाठी आयुक्तालयाकडे कुच केले पण कडक पहार्यामुळे ते शक्य नसल्याचे त्यांना समजले. मग त्यांनी दुसऱ्या पोलिस ठाण्यावर हल्ला कराचे ठरवले. त्यांनी थेट लॅमिंग्ट्न रोड पोलिस ठाणे गाठले. तिथे त्यांना पोलिस निरिक्षक टेलर पत्निसह येताना दिसला. पृथ्विराज व दुर्गावतिंनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तर बापट यांनी पाठलाग होउ नये म्हणून टेलर च्या मोटारीच्या चाकावर गोळ्या झाडल्या व य्शस्वी पलायन केले. मग त्या मुलासह झाशी येथे निघुन गेल्या. मुंबैची बातमी व स्त्रीच्या सहभागाविषयी ऐकताच आजाद समजले कि हे काम दुर्गावतिंचेच. पुढे त्यांनी लखनौ येथे माँटेसरी शाळा चालवली.


क्रांतिकारकांइतकेच महत्त्व आहे ते त्यांच्या कुटुंबातिल स्त्रीयांचे. चाफ़ेकर, सावरकर, भगतसिंह, आजाद, वगरे सर्व क्रांतिकरकांच्या माता वा पत्निंनी अनन्वीत हाल सहन् करुनही त्यांच्या कार्यावर अखेरपर्यंत निष्ठा ठेवली. लाहोर तुरुंगात भगतसिंह व सर्व सहकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले. काही दिवसातच राजगुरु यांचे वजन ३० पौण्डांनी घटले. त्यांच्या मातोश्रींना बोलावले गेले. त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई या अत्यंत गरिब होत्या. कुठे पुणे आणि कुठे लाहोर. लोकांनी पैसे जमवून त्यांना लाहोरचे तिकिट काढुन दिले. भयंकर थंडी, परका मुलुख, परकी भाषा करणार तरी काय? मात्र त्यांना बाबुराव व यमुताई भाटवडेकर यांनी सरकारी नोकर असुनही आपल्या घरात ठेवून घेतले. यमुताइ राजगुरुंना भाउ मानत असत. त्यांनी पार्वतीबाइंना तुरुंगात नेउन राजगुरुंची भेट करवून दिली. ह्या हकिकती कुणालाच माहित नाहीत याउलट 'लाडका पुत्र तुरुंगात गेल्यावर वडिलही आपल्या राजवाड्यात गादी ऐवजी चटईवर झोपु लागले' अशा ष्टोऱ्या आपल्याला पाठ्यपुस्तकात शिकवल्या गेल्या. भगतसिंह, राजगुरु व सुखदेव फ़ाशी गेल्यावर लाहोर येथे विराट सभा झाली. त्या सभेत लोकांनी हुतात्म्यांच्या नातेवाइकांना पहायचा आग्रह धरला. प्रथम भगतसिंहांच्या मातोश्री विद्यावतींनी दर्शन दीले. मग लोकांनी यमुताइंना आग्रह झाला. त्या संकोचामुळे पुढे जात नव्हत्या. मग लोकांनी त्यांना आग्रहाने विनवून सांगितले की त्या एकट्या राजगुरुंच्याच नव्हेत तर १५ क्रांतिकारकांची बहिण होत्या. सर्वात खडतर आयुष्य भगतसिंहाची माता विद्यावती हिचे. पहिले मूल जन्मताच गेले. लाडका भगतसिंह २४ व्या वर्षी फ़ाशी गेला. पाठोपाठ सासरे अर्जुनसिंह गेले. १५ ऑगस्ट १९४७ च्या पहाटे तिचे अर्धे आयुष्य स्वातंत्रासाठी देशाबाहेर परगंदा असलेले दिर अजितसिंह गेले. मग पती किशनसिंह गेले. दुर्दैव इथे संपले नव्हते. ४७ नंतर काळ्यापाण्याचे कैदि मुक्त झाले तेव्हा बटुकेश्वर दत्त सुटुन आले. ऐन उमेदित राष्ट्राला वाहून घेतलेले त्यामुळे शिक्षण नाही, सरकारला त्यांचे देशभक्त असणेच मान्य नाहि. मग ते कसेबसे उपजिवीका करीत जगले. १९६५ ला ते अखेरच्या क्षणी विद्यावतिंच्या चरणाशी आले आणि तिथे त्यांनी प्राण सोडले. त्यांनी विद्यावतींना आइ मानले होते. त्यांनी आइला आपली शेवटची इच्छा अशी सांगितली कि त्यांचे अंत्यसंस्कार भगतसिंह, राजगुरु व सुखदेव यांच्या स्मारकाशेजारी (गुजरान्वाला) येथे व्हावेत. त्या मातेने तीही इच्छा पूर्ण केली.


अशा असंख्य स्त्रियांच्या त्यागाने हे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनी त्यांना नम्र अभिवादन.