माथेरानचा वाघ

ते दिवसच मंतरलेले होते. सामान्य माणूस देखिल देशभावनेने प्रेरित झाला होता. एकीकडे इंग्रज महायुद्धात गुंतलेले असता या संधीचा लवचिक फ़ायदा घेऊन स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक क्रांतीकारकांनी आपापल्या पद्धतिने प्रयत्न सुरू केले.


माथेरानचे भूमिपुत्र विठ्ठल लक्ष्मण उर्फ भाई कोतवाल हे असेच एक क्रांतिकारक. एल.एल.बी झालेल्या भाईंनी देशप्रेमाने प्रभावित होउन स्वतःला देशकार्यास वाहून घेतले. त्यांनी आझाद दस्त्याचे नेतृत्व करीत एक अभिनव उद्योग सुरू केला. शेतकरी, आदिवासी यांच्यासाठी झटत असलेल्या भाईंनी सशस्त्र क्रांतिचा मार्ग अंगीकारला.


भाई व त्यांचे साथीदार हिराजी पाटील, भास्कर तांबट, भगत मास्तर, यशवंत क्षीरसागर, बंडोपंत क्षीरसागर, चांदोबा देहेरकर यांनी संदेशवहन व विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तोडून इंग्रजांची दळणवळण व्यवस्था कोलम्डून टाकण्यासाठी तारा वाहून नेणारे  डोंगरांवरचे मनोरे (पायलन)पाडायला आरंभ केला. उतरणीवर असलेल्या मनोऱ्याचे वरच्या अंगाचे तीन पाय कापले की उतरत्या भागाकडील पायावर सर्व भार पडून मनोरा कोसळून जमीनदोस्त होत असे. मनोऱ्यावरील तारा तुटताच वीजपुरवठा खंडीत होत असे, संदेशवहन बंद पदत असे.


भाई व त्यांचे सहकारी यांना नेरळ, माथेरान, सिद्धगड भागातली जनता देव मानत असे. ईग्रजांचा पाठलाग चुकवीत हे बहाद्दर रात्रीच्या अंधारात नेरळच्या अलीकडील माथेरान वरून उतरून पलीकडील सिद्धगडावर जा-ये करीत असत. त्यांना स्थानिक पोलीसांची सहानुभूती लाभली होती. नेरळ येथे माहेर असलेली माझी आजी अशी हकिकत सांगायची की नेरळचे फौजदार अनेकदा स्वतःच भाईंना सावध करून सांगायचे की त्यांच्यावर कडक नजर असून सध्या त्यांनी या भागात येउ नये, अन्यथा सरकरी नोकर म्हणून नाईलाजाने आम्हाला त्यांना अटक करावी लागेल. साहजीकच अनेक वर्षे त्यांनी इंग्रजांना हैराण करून सोडले होते.


अखेर फ़ितुरीने घात केला. १ जानेवारी १९४३ रोजी एका फितुराने दिलेल्या खबरीवरून पोलीस अधिक्षक हॉल स्वतः जातीने १०० सशस्त्र पोलीस घेऊन सिद्धगडला आला आणि त्याने गडाला वेढा घातला. गडावर लपलेल्या क्रांतिकारकांना दूध देण्यासाठी जाणाऱ्या गवळ्याचा पाठलाग करत हॉल व शिपाई गडावर पोचले व त्यांनी अंदधुंद गोळीबार सुरू केला. सगळे जण वाट फुटेल तसे पळू लागले. भाई आणि हीराजी पाटील एका मोठ्या शिळेआड लपून अखेरपर्यंत प्रतिकार करत होते. दीड-दोन तास झालेल्या चकमकीनंतर प्रथम हीराजी व लागोपाठ भाई यांना हौतात्म्य प्राप्त झाले. जखमी भगत मास्तर तिसऱ्या दिवशी हुतात्मा झाले.


२ जानेवारी सकाळी ६.१० ला अजूनही लोक तिथे जमतात व दिवंगत हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. २ जानेवारी १९८० रोजी मी सिद्धगड येथे गेलो होतो. भाई व हिराजी ज्या दगडाचा आडोसा घेऊन लढले तो दगड व चांदोबा देहेरकर व त्यांचा साथी ज्या गुहेत अंगाचे मुट्कुळे करून २४ तास लपून राहीले ती गुहा पहायला मिळाली. प्रत्यक्ष चांदोबा देहेरकर, यशवंत क्षीरसागर, बंडोपंत क्षीरसागर, तांबट इत्यादी भाईंचे सहकारी, भाईंच्या पत्नी श्रीमती इंदुताई व बंधु पिंटण्णा याची प्रत्यक्ष भेट घडली व काही हकीकतीही ऐकायला मिळाल्या.


देशाला स्वतंत्र करण्यासाठी मृत्युला धैर्याने सामोरे जाणारे असे अनेक हुतात्मे आपल्या महाराष्ट्रात होउन गेले आहेत.


आज भाईं व हीराजी यांच्या हौतात्म्य दिनी त्यांना विनम्र अभिवादन.