ऑगस्ट १८ २०१७

वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ५

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४ 

लायब्ररी ऑफ काँग्रेस पाहून झाल्यावर संध्याकाळी मेट्रोने हॉटेलवर परतीचा प्रवास सुरू केला. त्या दिवशी भटकंती थोडी दमाने घ्यायची असे ठरवले होते. कारण अगोदरच्या दिवशी एकतर खूप काही पाहिले होते अन बरीच पायपीट झाली होती. मुख्य म्हणजे आम्ही घातलेल्या (नेमका पार्किंग लॉट विसरण्याच्या) घोळाने मेट्रो स्टेशनच्या पार्किंग मध्ये लावलेली गाडी सापडायला खूप वेळ आणि श्रम लागले. याविषयी सविस्तर शेवटच्या भागात लिहीन. आमच्या मेट्रोच्या मार्गावर एक भव्य इमारत आकर्षित करायची. लांबून ही वास्तू नेमकी कशाची आहे ते मात्र कळत नव्हते. दुरून पाहताना ही वास्तू चांगलीच भव्य अन रेखीव दिसत होती. त्यामुळे ही वास्तू नक्की काय हे जर हाती वेळ राहिला तर अवश्य पाहावी असे वाटत होते. त्याप्रमाणे त्या दिवशी वेळ होता म्हणून मग ही वास्तू पाहायची ठरवली. ही वास्तू पोटोमॅक नदिपल्याड व्हर्जिनिया राज्यातील अ‍ॅलेक्झांड्रिया गावात आहे. इथे मेट्रोने पोहचायला किंग्ज स्ट्रीट ओल्ड टाउन हे स्टेशन आहे. तसेच समोरच अलेक्झांड्रियाचे ऍमट्रॅक ट्रेन स्टेशनही आहे.  


हे आहे जॉर्ज वॉशिंग्टन मसॉनिक नॅशनल मेमोरियल. जॉर्ज वॉशिंग्टन हे मेसॉनिक संप्रदायाचे सदस्य होते. या टॉवरचे बांधकाम सन १९२२ साली चालू होवून १९३२ साली पूर्ण झाले. मात्र जरा खोलात शिरून माहिती करून घेतल्यावर समजले की या मेमोरियलच्या बांधकामाची कथाही तितकीच रंजक आहे. खरे तर हे मेमोरियल व्हावे म्हणून सन १८५२ पासून तयारी सुरू झाली होती. हे मेमोरियल एक खासगी मालमत्ता आहे जी सामान्य जनतेसाठी खुली आहे. याची सुरुवात झाली मेसन संप्रदायातील लोकांकडून या मेमोरियलच्या बांधकामासाठी पैसे गोळा करण्यापासून. हे काम केले गेले अमेरिकेतील राज्य स्तरावर. पुरेसा निधी गोळा केला गेला. मग रोम मध्ये पॉवर्स नावाच्या शिल्पकाराकडून वॉशिंग्टन यांचा भव्य असा ब्रॉन्झचा पुतळा तयार करून मागवण्यात आला. हा पुतळा १८६१ साली व्हर्जिनियातील अ‍ॅलेक्झांड्रिया येथे पोहोचला देखिल. मात्र याच सुमारास अमेरिकेतील सिव्हिल वॉरला सुरुवात झाली. १८६३ सालापर्यंत हा पुतळा लोकांना पाहायला ठेवण्यात आला. त्यानंतर मात्र हा पुतळा व्हर्जिनियातील रिचमंड येथे हालवण्यात आला. दुर्दैवाने १८६५ साली सिव्हिल वॉर दरम्यान लागलेल्या आगीत हा पुतळा बेचिराख झाला.

मेमोरियलचे काम काही काळापुरते थांबवले गेले. पुन्हा मग १९०९ साली या कामाला सुरुवात झाली. या मेमोरियलसाठी प्रस्तावित जागा होती शुटर्स हिल. अठराव्या शतकाच्या शेवटी युएस कॅपिटॉलच्या उभारणीसाठी थॉमस जेफरसन आणि जेम्स मॅडिसन या द्वयीने या जागेचाही विचार केला होता.  १९०० साली अ‍ॅलेक्झांड्रियाच्या रहिवाश्यांनी 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर चालणारी एक संस्था निर्माण केली. या संस्थेचे ध्येय एकच होते अ‍ॅल्केझांड्रिया शहरात जॉर्ज वॉशिंग्टन यांचे मेमोरियल बांधणे. मुख्य वास्तूचे बांधकाम १९२२ साली चालू होवून १९३२ साली पूर्ण झाले. आश्चर्याची बाब अशी की या दरम्याने आलेल्या आर्थिक मंदीतही या मेमोरियलसाठी निधी फक्त मेसन संप्रदायातील सदस्यांकडून गोळा करण्यात आले. यात अनेक अडचणीही आल्या मात्र मेसॉनिक लोक आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

१२ मे १९३२ साली ही या वास्तूची उद्घाटनाची तारीख ठरली होती. मात्र याची मूळ तारीख होती १३ मे. प्रचलित समजा अनुसार १३ तारीख अशुभ मानली जाते. त्यामुळे तारीख बदलून ती १२ करण्यात आली. निमंत्रण जगभरातील लाखो मेसन लोकांना तसेच राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूवर आणि व्हर्जिनिया राज्याचे गवर्नर याना पाठवण्यात आले. सुमारे ५० हजार लोक या कार्यक्रमास उपस्थित राहतील असा अंदाज होता. समारंभ अगदी थाटात पार पडला. मात्र दुर्दैवाने त्या दिवशी खूप पाऊस पडला त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी कमी लोक आले. मात्र असे म्हणतात की मूळ तारखेला म्हणजे १३ ला हा कार्यक्रम झाला असता तर लाखो लोक उपस्थित राहिले असते! मुसळधार पाऊस पडत असतानाही मेसॉनिक लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.  
हे आहे १९२२ सालचे मेमोरियलचे मॉडेल. हे मॉडेल आणि अखेर पूर्ण झालेली वास्तूत अनेक बदल आहेत. हा फोटो विकीवरून साभार.

 आम्ही गाडीने या मेमोरियलजवळ पोचलो आणि प्रवेशद्वारापाशीच जरा थबकलो. या टेकडीवर जावे की नाही हा प्रश्न निर्माण झाला कारण इथे लिहिले होते की ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे म्हणून. मग जरा आजूबाजूला पाहिले आणखी कोणी दिसत आहे का टेकडीवर जाणारे. तर काही गाड्या वर जाताना दिसल्या. मग आम्हीही गेलो. ही खरे तर संबंधीत संस्थेची खासगी मालमत्ता आहे. तसे असले तरीही सर्व लोकांना खुली आहे त्यामुळे बिनधास्त जावे.  प्रवेशद्वाराजवळ पोचल्यावर कळले की त्या दिवसाची पर्यटकांनी भेट देण्याची वेळ संपलेली आहे. त्यामुळे भोवताली फिरून या इमारतीच्या स्थापत्यसौंदर्याचा आस्वाद घ्यायचे ठरवले. नुकताच सुर्यास्त होऊन गेल्यामुळे उजेड कमी होऊ लागला होता. मेमोरियलसाठी पार्किंगही चांगलेच मोठे होते. त्या संध्याकाळी तिथे कुठलिशी म्युझिकल कंसर्ट होती. त्यासाठी श्रोते येण्यास सुरुवात झाली. वेगवेगळ्या बाजूंनी फोटो काढून आम्ही तेथून परतलो. भविष्यात हे मेमोरियल आतून पाहायचे ठरवले आहे.                
या इमारतीपुढील मेसॉनिक संप्रदायाचे हे चिन्ह
 


मेमोरियलच्या आतला  हा फोटो जालावरून साभार.
 चोथ्या मजल्यावर जॉर्ज वॉशिंग्टन म्युझियम आहे तेथील हा फोटो.नवव्या मजल्यावर ऑब्झर्वेशन डेक आहे तिथून दिसणारे विहंगम दृश्य. वरील  तीन फोटोज या मेमोरियलच्या संस्थळावरून साभार.
 संध्याकाळच्या वेळेचा हा फोटो जालावरून साभार.

डिसीमध्ये फिरताना वेळ हाताशी असल्यास अवश्य पाहावे असे हे एक ठिकाण आहे. इथे गायडेड टूर्सही उपलब्ध आहेत. टूर साठी १५ डॉलर्सचे तिकीट असते.  
माहितीचा स्रोत - विकी, मेमोरियल संस्थळ
क्रमशः

Post to Feed
Typing help hide