फाउंटनहेड परिचय - चार

पहिल्या दोन भागात आपण हॉवर्ड रोर्क आणि डॉमिनिक फ्रँकन ह्यांची ओझरती ओळख करून घेतली. अदितीने म्हटल्याप्रमाणे ही दोन पात्रं ही ह्या कथानाकाचा पाया आहेत. रोर्क हा अविचल असा स्वतःवर आणि स्वतःच्या तत्त्वांवर विश्वास ठेवणारा, तर डॉमिनिकचा प्रवास संदेहापासून (रोर्कसारख्यांच्या ह्या जगातील यशाबद्दलचा संशय) खात्रीपर्यंत झालेला.


ह्या प्रवासात ह्यांना इतरही पात्रं भेटतात, जी समाजातील विविध घटकांचं प्रतिनिधित्व करतात. आपापल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ह्यातीक प्रत्येक पात्र आपापल्या तत्त्वांशी तडजोड करतात. अर्थात, लेखिकेला जी तत्त्वं जगापुढे मांडायची आहेत, त्या तत्त्वांशीच ह्या पात्रांचं वैर आहे, त्यामुळे व्यक्तीवाद, अभिव्यक्ती, आचार - विचार स्वातंत्य्र आणि वास्तववाद ह्यांना विरोध करणं हे ह्या पात्रांचं मुख्य काम. त्यातही, प्रत्येक पात्राच्या वागणुकीमागे विविध प्रेरणा आहेत, प्रत्येक पात्राचा सत्यासत्यतेचा, नीतीमत्तेचा संदर्भ वेगळा आहे. त्यामुळे जरी ही इतर पात्रं मूलतः रोर्क आणि डॉमिनिकच्या विरोधात असली तरी त्यांचे विरोधाचे मार्ग सारखे नाहीत. ह्यांची ओळख करून घेऊ या.


पीटर कीटिंग


पीटर कीटिंग हा रोर्कचा समकालीन (रोर्कपेक्षा २ वर्षं मोठा) स्थापत्यविशारद. पीटरला विशारद म्हणणं हा एक विनोदच म्हणावा लागेल. कोणत्याच प्रतिभेचा लवलेश ही नसलेला पीटर रोर्कच्या भाषेत अव्वल दर्जाचा दुय्यम माणूस आहे. त्यांना रोर्क "सेकंड हँडर्स" असं संबोधतो. स्वतःकडे नसलेल्या सृजनशीलतेची भरपाई पीटर रोर्कचं बांडगुळ बनून करतो. स्वतःला समाजाने उत्तम स्थापत्यविशारद म्हणून ओळखावं ह्यासाठी पीटर सतत आसुसलेला असतो, पण त्यासाठी स्वतः काही करण्याची कुवत नसते त्याच्यात. म्हणून मग इतरांचं लांगुलचालन करून, लाडीगोडी करून, प्रसंगी कारस्थानं करूनही पीटर समाजाच्या दृष्टीने महान बनतो. पण हे महानपण कणाहीन असल्याने आत कुठेतरी खोलवर त्याचं मन त्याला सतत खात असतं. रोर्कवर संपूर्णपणे अवलंबून असणारा पीटर त्याला सतत जमेल तसा जमेल तेवढा विरोध करत असतो. आणि ते करण्यासाठी एल्स्वर्थ टूही ह्या एका पाताळयंत्री पात्राच्या हातातलं बाहुलं बनतो. कथेच्या उत्तरार्धात पीटरला स्वतःच्या नपुंसकतेची  आणि दुबळेपणाची जाणीव होते, आणि एका खूप क्षीण स्तरावर त्याला बदलावंसंही वाटतं. पण तोवर त्याला त्याच्या जीवनाची सूत्रं हातातून निसटून समाजाच्या, टूहीसारख्या पडद्यामागच्या राज्यकर्त्यांकडे गेल्याचं जाणवतं आणि पीटर पूर्णपडे मोडून, उन्मळून पडतो. पीटर हा एक बांडगुळच आहे, पण त्याच्यात निदान इतरांचं शोषण करून स्वतः सत्ता - मग ती राजकीय असो वा वैचारिक - काबीज करण्याची इच्छा नसते. पीटरला आपण बाळ-बांडगुळ म्हणूया.


एल्स्वर्थ टूही


ह्याला केवळ बांडगूळ म्हणून चालणार नाही. पीटरचा हा "गॉडफादर" टूही अत्यंत धूर्त आणि चाणाक्ष आहे. न्यू यॉर्क मधल्या बॅनर नावाच्या एका (सवंग) लोकप्रिय वर्तमानपत्रात "वन स्मॉल व्हॉईस" हा स्तंभ लिहीणारा टूही रोर्कचा सर्वात मोठा शत्रू. रोर्कसारखा स्वतंत्र विचारसरणीचा, तत्त्वनिष्ठ माणूस हा टूहीच्या पाताळयंत्री कारस्थानांना नक्कीच सुरुंग लावणार हे त्याने ओळखलं आहे. (अंध) श्रद्धा, त्याग आणि परंपरावाद हे टूहीच्या विचारसरणीचे आधारस्तंभ आहेत. अर्थात हे तत्वं टूही स्वांतःसुखाय वापरण्याच्या मागे आहे. समाजाला विचारापासून, स्वतंत्र विचारांपासून, प्रगतीच्या इच्छेपासून परावृत्त करणे आणि मग समाजाला गुराढोरांसारखं वळवता येणे हे त्याचं ध्येय आहे. त्यासाठी तो बॅनरचा वापर करत असतो. इथे त्याची लढाई दोन आघाड्यांवर आहे. एक म्हणजे रोर्कसारख्याला कोणत्याही प्रकारे यशस्वी न होऊ देण्यासाठी, आणि दुसरी म्हणजे बॅनरच्या मालकाच्या ताब्यातून बॅनर काढून घेऊन स्वतःच्या हातातलं खेळणं बनवण्यासाठी.


टूहीने शाश्वत सत्य आणि नीतीमत्ता ह्यांचं सामर्थ्य जाणलेलं आहे, आणि म्हणूनच त्यांचा पराभव करता येणार नाही हे ही त्याला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे रोर्कचा सामना करण्याची वेळच येऊ नये ह्या साठी रोर्कला पुरेशी कामंच मिळू नयेत, त्याला वाळीत टाकलं जावं ह्यासाठी टूही अनेकांगी मोहीम चालवतो, त्यात काही काळासाठी (वेगळ्याच कारणांमुळे) डॉमिनिकही सहभागी असते. पण शेवटी रोर्कला समाजाच्या स्वीकृतीची गरजच नसल्याने टूहीचे सगळे व्यूह फोल ठरतात. इथं टूहीच्या व्यक्तीमत्त्वात आपल्याला दुःस्वास आणि सूडबुद्धी, नाकर्त्याची शक्ती, ज्याला इंग्रजीत nuisance value म्हणतात ती पदोपदी जाणवते. आपल्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी टूही साम-दाम-दंड-भेद अगदी सराईतपणे वापरतो, आणि बऱ्याच अंशी यशस्वी पण होतो.


अखेर रोर्कच्या व्यक्तीमत्त्वातील ताकद आणि त्याच्या तत्त्वांची शाश्वती टूहीला हरवते आणि जगावर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा टूही जवळपास विस्मृतीच्या पडद्याआड फेकला जातो.