फाउंटनहेड - कथा ५

तसं पाहिलं तर टूही हा काही स्थापत्यविशारद नव्हे. टूहीचा आणि कोणत्याही निर्मितीचा कधीच संबंध आला नाही. पण आपल्या तल्लख बुद्धीच्या आणि खुमासदार लेखणीच्या जोरावर टूहीने आपल्यासाठी स्थापत्यविश्वात एक अढळ स्थान प्राप्त केलेलं आहे. इतरांनी निर्माण केलेल्या गोष्टींवर "जाणकाराचं" भाष्य करणारा टूही बॅनर ह्या वृत्तपत्रात "अ स्मॉल व्हॉईस" नावाचं एक लहानसं सदर लिहीणारा पत्रकार असतो. बॅनरसारखा प्रभावी, लोकमानसाचा थांग गवसलेला पेपर, आणि त्यातला टूहीचा हा स्तंभ ह्यांची जोडी अगदी सही जमलेली आहे.


आजवरच्या सगळ्या शोधांचं श्रेय त्या शोधांच्या शोधकर्त्यांनी कसं इतरांपासून हुसकावून घेतलं आहे, कोणत्याही शोधात/ प्रगतीच्या टप्प्यावर कसा सर्वसामान्य जनतेचा सहभाग असतो हे पटवून देण्याचा विडाच जणू टूहीने उचलला आहे.


अर्थात ह्यामागे त्याचा एक वेगळाच डाव आहे, जो आपण जसजशी कथा पुढे सरकेल तसा पाहूच... पुढे.....


सर्मन्स इन स्टोन्स ह्या पुस्तकाने स्थापत्यशास्त्राल जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं. माणसं बेसबॉलबद्दल ज्या सहजपणाने बोलतात त्याच सहजतेने स्थापत्यशास्त्राबद्दल प्रत्येक माणसाला मतप्रदर्शन करता आलं पाहिजे, किंबहुना तो त्याचा हक्कच आहे असं टूहीचं मत असतं. स्थापत्यशास्त्र हे महान कलांपैकी एक आहे, कारण ते इतर महान कलांप्रमाणेच अनामिक आहे असं त्याला ह्या पुस्तकातून पटवून द्यायचं आहे. जगात एवढ्या साऱ्या प्रसिद्ध इमारती आहेत, पण त्यापैकी किती इमारतींचे कर्ते प्रसिद्ध आहेत? ह्यावरूनच निर्मिकापेक्षा निर्मिती ही मोठी आणि चिरंतन असते हे सिद्ध होतं. एखादी महान इमारत किंवा रचना कोण्या एखाद्या स्थापत्यशास्त्रज्ञाच्या खात्यात लिहून आपण ती इमारत घडवणाऱ्या, बांधणाऱ्या निनावी कलाकारांचा अपमान करत असतो असा त्याचा ह्या पुस्तकात दावा असतो. अशी रचना कोण्या एकाची खाजगी बुद्धीसंपदा मानून आपण अशा हजारो अनामिक मजुरांच्या कष्टांचा अपमान करत आहोत. खरं तर स्थापत्यशास्त्राच्या ऱ्हासाला खाजगी मालमत्ता कारणीभूत आहे. ह्याच मुळे ग्रीक/ रोमन स्थापत्यशास्त्राची बरोबरी करणाऱ्या इमारती आता होत नाहीत, कारण आपण सामाजिक, सामुहिक मालकी सोडून वैयक्तिक मालकीच्या रस्त्याने जाऊन आपण ह्याकलेचा प्राणच घेतला आहे. खाजगी मालमत्तेबरोबर येणारी मुक्त जीवनशैली प्रत्येकाला "मनमानी" करण्याची मुभा देते, त्यामुळे समाजातील शिस्त, एकजिनसी पणा नष्ट होत आहे. उलट प्रत्येक व्यक्तीचं समाजातलं वर्तन हे त्यात्या समाजाच्या विशिष्ट गुणावगुणांचं प्रतीक असतं. त्या त्या समाजाच्या आर्थिक बांधणीशीच स्थापत्यशास्त्राचा एवढंच काय प्रत्येक व्यक्तीचा जीवनप्रवास जोडलेला असतो हे त्याने दाखवून दिलं.


सध्या चालू असलेले मुक्ततेचे, वैयक्तिक स्वातंत्र्याचे वारे समाजाची घडी कशी विस्कळीत करतील आणि त्यांचे धोके टूहीने विषद केले त्या पुस्तकात. आणि शेवटी असं म्हटलं, की भविष्य आशावादी आहे, त्या भविष्यात असे दिवस येतील की कोणत्याही व्यक्तीचं महत्त्व न उरता, सगळा समाज, त्याचे घटक आणि त्या घटकांच्या आर्थिक, सामाजिक क्रिया एकाच साच्यातून आल्यासारख्या आखीव रेखीव होतील, अगदी लोकशाहीच्या प्रणेत्या प्राचीन ग्रीसप्रमाणे!


जगातल्या सर्वच स्थापत्यविशारदांना टूहीचं आवाहन आहे कि त्यांनी आपापल्या मनसुब्यांप्रमाणे, आपापल्या क्षमतेप्रमाणे, कलागुणांप्रमाणे काम न करता समाजातील सर्वात निम्नस्तरावरील माणसाच्या कुवतीप्रमाणे काम करावं. स्थापत्यविशारदांचं (आणि पर्यायानं सगळ्याच बुद्धीजीवी लोकांचं) कर्तव्य आहे सामाजिक बांधिलकी मानणं आणि त्याप्रमाणे राहणं. बुद्धीजीवींना मनमानी करण्याचा, सर्वसामान्यांना सोडून पुढे जाण्याचा काहीही अधिकार नाही हे त्याने ह्या पुस्तकात ठासून सांगितलं.


आणि एवढं करूनही पुस्तकात कुठेही टूही कोणालाही, किंवा समाजातील कोणत्याही घटकांना फूस लावतो आहे असं प्रतीत होत नव्हतं हे त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य!! अर्थातच "किमान बिंदू" जोडण्याच्या त्याच्या ह्या चालीचं स्वागत फारच जोरदार झालं. "अप्रतिम", "एकमेवाद्वितीय", "एका महान विचारवंताचे ज्ञानकण" वगैरे शब्दांनी पुस्तकाला आणि टूहीला गौरवलं गेलं. आणि ह्या एका पुस्तकाने, स्वतः आयुष्यात कधीच काहीच निर्माण न करणारा टूही स्थापत्यविश्वाचा अनभिषिक्त न्यायाधीश होऊन गेला.... स्थापत्यशास्त्र आणि टूहीचं नाव जोडलं गेलं, जनमानसात कायमचं कोरलं गेलं ते ह्या "सर्मन्स इन स्टोन्स" मुळेच....


क्रमश....