फाउंटनहेड - कथा १

हॉवर्ड रोर्कला आज सर्व बंधनांतून मुक्त झाल्यासारखं वाटत होतं.


आज त्याला स्टँटन स्कूल ऑफ आर्किटेक्चर मधून हाकलवून लावण्यात आलं. त्याच्यातील कलागुणांची त्याच्या शाळेत कदर केली गेली, त्याच्या एका प्रोफेसरने त्याच्या साठी, त्याला हाकलवून दिलं जाऊ नये म्हणून प्रयत्नही केले, पण त्याच्या "मनमानीला" आणि "विसंवादी" वृत्तीला शाळेचं संचालक मंडळ वैतागलं होतं. स्थापत्यशास्त्रात जे काही करता येण्यासारखं आहे ते ह्यापूर्वीच्या दिग्गजांनी आधीच करून ठेवलं आहे, आणि त्यांच्या अजरामर कलाकृती नवीन बांधकामांत, त्यांच्या आरेखनांतून जपायला हव्या अशा परंपरावादी विचारांच्या त्या संचालक मंडळाला रोर्कचा नाविन्याचा ध्यास परवडेनासा झाला होता. रोर्क हा एक अव्वल दर्जाचा स्थापत्यशास्त्रज्ञ असूनही त्याच्या परंपरेला अंधपणाने न मानण्याच्या आणि कोणत्याही प्रकारच्या रूढीला न अनुसरण्याच्या वृत्तीमुळे तो सगळ्यांपासून वेगळा पडत होता.


स्थापत्यशास्त्रातील परंपरागत मान्यता असलेल्या तत्त्वांना न जुमानणे, स्थापत्यविशारदांच्या संघटनेशी काहीही संबंध न ठेवणे आणि मुख्य म्हणजे गतकालीन दिग्गजांचा अनादर स्वतःची नाविन्यपूर्ण रेखाटने करून करणे ह्या आरोपांमुळे त्याला हाकलवण्याचा निर्णय घेतला गेला. अशा कडक शिक्षेमुळे तरी त्यातला बंडखोरपणा नाहीसा होईल आणि तो "ताळ्यावर" येईल अशी संचालकांची कल्पना होती.


अर्थात रोर्कला ह्या शिक्षेतून वरदानच मिळाल्यासारखं वाटत होते. मनाला, बुद्धीला आणि विचारांना न पटणाऱ्या गोष्टी केवळ परंपरा आहे म्हणून, किंवा प्राचार्यांनी सांगितल्या आहेत म्हणून किंवा समाजाची तशी अपेक्षा आहे म्हणून करणे ह्यापुढे त्याला भाग पडणार नव्हते. त्याला आज स्वतःच्या नशीबाची दोरी परत स्वतःच्या हाती आल्याचा, जाचातून मुक्त झाल्याचा आनंद वाटत होता. कागदांवर काहीतरी गिरमिटून त्याला ग्रीक किंवा रोमन किंवा गॉथिक पद्धतीच्या टोप्या आणि झिरमिळ्या लावून त्याला महान स्थापत्यकला म्हणणाऱ्या जगापासून त्याला मुक्तता मिळाली होती. निसर्गाने माणसाला दिलेल्या असामान्य क्षमतेचा वापर अंधानुकरण आणि कोणाचं तरी अनुयायित्व करण्यासाठी करणं, आणि त्यातच धन्यता मानणं ह्यात त्याला अजिबात रस नव्हता, उलट अशा समाजाबद्दल त्याला कीव होती. स्वतःच्या सर्जनशीलतेचा वापर नवीन काहीतरी घडवण्यासाठी करणे हे त्याचं ध्येय प्राप्त करण्यासाठी आता त्याला कोणाची आडकाठी येणार नव्हती.


कॉलेजातून काढून टाकल्यावर निराश व्हायच्या ऐवजी रोर्क हा "निराशेचा" क्षण भोगायला एका विस्तीर्ण तळ्याच्या परिसरात गेला. तिथे त्याला पुन्हा एकदा निसर्गाने माणसापुढे ठेवलेल्या आव्हानाची प्रचिती मिळाली, आणि त्याच बरोबर निसर्गाने माणसाला दिलेल्या सामर्थ्याची जाणीवही.


स्वतःच्याच विचारांत मग्न होऊन तो परत आपल्या घराकडे चालत होता. रस्त्यांत दुतर्फा दिसणाऱ्या साचेबंद घरांकडे पाहून त्याला त्यात राहणाऱ्या माणसांची किळस आली. अशा जीवनातून कायमचं दूर राहण्याचा निश्चय अधिकच पक्का झाला. त्याला आता फक्त दिसत होतं त्याचं स्वत्व, स्वतःचं सामर्थ्य आणि साथीला होता उदंड आत्मविश्वास आणि आपल्या मूल्यांवरची अतूट श्रद्धा. समाजाची फिकीर न करता रोर्क आपल्या अज्ञाताच्या प्रवासाकडे वाटचाल करत होता.


त्याच सुमारास, कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडत होता. कारखान्यातून निघणाऱ्या साचेबद्ध वस्तूंप्रमाणे कॉलेजातून परंपरेचं, स्थापत्यशास्त्रातील तत्त्वांचं, तंत्राचं आणि विचारांचं बाळकडू घेऊन कित्येक स्थापत्यशास्त्री त्याच कल्पना, तीच तंत्रं आणि तीच रेखाटनं सरमिसळ करून जगाला विकण्याच्या हक्काचा करारनामा, म्हणजे त्यांची पदवी घेऊन निघत होते. त्यातच होता पीटर कीटिंग - रोर्कचा घरमालक आणि त्याच्यावर जवळपास पूर्णपणे अवलंबून असणारा एक बांडगुळी व्यक्तीत्वाचा तरूण. त्याच्या कडे जे क्षमतेत कमी होतं ते त्याने संपर्ककलेने आणि लांगूलचालनाने हस्तगत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. आणि त्याचं फळ म्हणूनच की काय, रूढीबद्ध अशा त्या परीक्षासत्रांत हा "परंपरेचा पाईक" पीटर पहिला आला होता. त्याच्या ह्या "यशाची" चढलेली धुंदी त्याला "फ्रँकन आणि हेयर" ह्या नावाजलेल्या स्थापत्यविशारदांच्या कंपनीने नोकरीचा प्रस्ताव देऊन अधिकच वाढवली होती. इतरांच्या कुबड्यांचा आधार घेत, प्रसंगी पुढे गेल्यावर त्याच कुबड्या मोडून काढत पीटरचा प्रवास ज्ञात, धोपटमार्गाने सुरू झाला...


क्रमशः