जुलै १८ २००६

विडंबने-२ दासबोध आणि उदासबोध

ह्यासोबत

॥ समर्थ रामदासांचा दासबोध दशक १ ॥
॥ स्तवननाम दशक प्रथम ॥
॥ श्रीराम ॥
श्रोते पुसती कोण ग्रंथ। काय बोलिलें जी येथ ।
श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १ ॥
ग्रंथा नाम दासबोध। गुरुशिष्यांचा संवाद ।
येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २ ॥
नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण ।
बहुधा अध्यात्म निरोपण। निरोपिलें ॥ ३ ॥
भक्तिचेन योगें देव। निश्चयें पावती मानव ।
ऐसा आहे अभिप्राव। ईये ग्रंथीं ॥ ४ ॥
मुख्य भक्तीचा निश्चयो। शुद्धज्ञानाचा निश्चयो ।
आत्मस्थितीचा निश्चयो। बोलिला असे ॥ ५ ॥
शुद्ध उपदेशाचा निश्चयो। सायोज्यमुक्तीचा निश्चयो ।
मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६ ॥
शुद्धस्वरूपाचा निश्चयो । विदेहस्थितीचा निश्चयो ।
अलिप्तपणाचा निश्चयो। बोलिला असे ॥ ७ ॥
मुख्य देवाचा निश्चयो। मुख्य भक्ताचा निश्चयो ।
जीवशिवाचा निश्चयो। बोलिला असे ॥ ८ ॥
मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो ।
आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९ ॥
मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण ।
नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १० ।
मायोद्भवाचें लक्षण । पंचभूतांचे लक्षण ।
कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११ ॥
नाना किंत निवारिले । नाना संशयो छेदिले ।
नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ॥ १२ ॥
ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें ।
तें अवघेंचि अनुवादलें । न वचे किं कदा ॥ १३ ॥
तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद ।
जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४ ॥
नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती ।
आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५ ॥
नाना समतीअन्वये । म्हणौनी मिथ्या म्हणतां न ये ।
तथापि हें अनुभवासि ये । प्रत्यक्ष आतां ॥ १६ ॥
मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उछेदती ।
नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वाक्यें ॥ १७ ॥
शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता ।
उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणी वेदांत ॥ १८ ॥
भगवद्गीता ब्रह्मगीता । हंसगीता पाण्डवगीता ।
गणेशगीता येमगीता । उपनिषदें भागवत ॥ १९ ॥
इत्यादिक नाना ग्रंथ । समतीस बोलिले येथ ।
भगवद्वाक्ये येथार्थ । निश्चयेंसीं ॥ २० ॥
भगवद्वचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे
भगवद्वाक्याविरहित नसे । बोलणे येथीचें ॥ २१ ॥
पूर्णग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२ ॥
अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार ।
पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३ ॥
ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला ।
अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४ ॥
कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला ।
अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५ ॥
आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें ।
परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६ ॥
मागां श्रोतीं आक्षेपिलें । जी ये ग्रंथीं काय बोलिलें ।
तें सकळहि निरोपिलें । संकळीत मार्गे ॥ २७ ॥
आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ ।
तुटे संशयाचें मूळ। येकसरां ॥ २८ ॥
मार्ग सांपडे सुगम। न लगे साधन दुर्गम ।
सायोज्यमुक्तीचें वर्म । ठांइं पडे ॥ २९ ॥
नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती ।
ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥ ३० ॥
योगियांचे परम भाग्य । आंगीं बाणे तें वैराग्य ।
चातुर्य कळे यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१ ॥
भ्रांत अवगुणी अवलक्षण । तेंचि होती सुलक्षण ।
धूर्त तार्किक विचक्षण । समयो जाणती ॥ ३२ ॥
आळसी तेचि साक्षपी होती । पापी तेचि प्रस्तावती ।
निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३ ॥
बद्धची होती मुमुक्ष । मूर्ख होती अतिदक्ष ।
अभक्तची पावती मोक्ष । भक्तिमार्गें ॥ ३४ ॥
नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती ।
प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥ ३५ ॥
नाना धोकें देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे ।
नाना उद्वेग संसाराचे । नासती श्रवणें ॥ ३६ ॥
ऐसी याची फळश्रुती । श्रवणें चुके अधोगती ।
मनास होय विश्रांती । समाधान ॥ ३७ ॥
जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।
मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ ३८ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ग्रंथारंभलक्षणनाम
॥  समास पहिला ॥ १ ॥

दासबोधात वीस दशके असून प्रत्येक दशकात अनेक समास आहेत. वर पहिल्या दशकातील पहिला समास दिलेला आहे.

सतराव्या शतकात मुसलमान राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राला त्रासले होते. सामान्यजन भयग्रस्त झालेले होते. अशा वेळी छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्याचे सुराज्य होण्यासाठी व शूर राजाचे जाणत्या राजात रूपांतर होण्यासाठी ज्या संताचा लाभ महाराष्ट्राला झाला तो म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. जांब गावी १५३० चैत्र शुद्ध नवमीस माध्यान्ही त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव नारायण सयाजीपंत ठोसर. वयाच्या बाराव्या वर्षी, विवाहप्रसंगी 'सावधान' शब्द ऐकून ते लग्नमंडपातून पळून गेले. नंतर नाशिकजवळ, गोदावरीकाठी टाकळी येथे त्यांनी बारा वर्षे एकाग्रतेने रामोपासना केली. आत्मसाक्षात्कार होऊन ते स्वानुभवारूढ झाले. आत्मज्ञानाने संपन्न होऊन ते वयाच्या चोविसाव्या वर्षी तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले. बारा वर्षे सबंध हिंदुस्तानभर त्यांनी पायी प्रवास केला. वयाच्या छत्तीसाव्या वर्षी, शके १५६६ मध्ये ते कृष्णातीरी आले. त्यांनी अकरा मारुतींची स्थापना केली. शिवाजीमहाराजांना स्वराज्यहितोपदेश केला. महाराजांनी राज्य त्यांच्या झोळीत टाकल्यावर त्यांनी ते महाराजांनाच सांभाळण्यास सांगून स्वराज्यास भगवा ध्वज दिला. मनाचे श्लोक, दासबोध, विविध आरत्या इत्यादी विपुल साहित्य त्यांनी निर्माण केलेले आहे. त्यांच्या साहित्यावर अनेक पिढ्यांचे जीवन घडलेले आहे.

शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे ।
वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ॥
कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा ।
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ॥

उदासबोध (दासबोधाचे विडंबन)
-मंगेश पाडगावकर

आज हयात असते रामदास । तर भोवती बघुन हरामदास ।
अन्तरी जाले असते उदास । लागोन चिन्ता ॥ १ ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । ऐसा गल्लीगल्लीत गुन्ड आहे ।
त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे । पोलीस पुढाऱ्यांचे ॥ २ ॥
या सत्याचा लागता शोध । कुठुन सुचता असता दासबोध ?
लिहिला असता उदासबोध । श्रीसमर्थांनी ॥ ३ ॥
भ्रष्टाचारे पोखरला देश । दीन जनांसी अपार क्लेश ।
दुर्जना यश । सज्जना अपेश सर्वत्र दिसे ॥ ४ ॥
नीतीचा डोळा काणा । प्रत्येक माणूस दीनवाणा ।
सर्व फ़ोलपटे नाही दाणा । पीक ऐसे ॥ ५ ॥
देवतांसी उचलून धरती । वेडेविद्रे नाच करती ।
भसाड ओसाड आरती । झोकून दारू ॥ ६ ॥
कबीर सांगे अल्लाची महती । मुंगीच्या पायी घुंगुर वाजती ।
तरी ते अल्लाशी ऐकु येती । ऐसे म्हणे ॥ ७ ॥
येथे अल्लासी बहिरा मानती । ठणाणा ध्वनीक्षेपक आणती ।
त्यातुन कर्कश बांग हाणती। अल्लासाठी ॥ ८ ॥
कंडम बरगड्यांच्या जनतेवरी । बिल्डर, स्मगलर, गुन्ड राज्य करी ।
प्रत्येक नेता खिसे भरी । हाती धरून तयांसी ॥ ९ ॥
दुष्काळ खणी, भुई फाटे । शोष पडून विहीर आटे ।
काळा कडु गहिवर दाटे । गळ्यात भविष्याच्या ॥ १० ॥
सत्या सामोरे पहाण्यासाठी । त्राण असावे लागे गाठी ।
भेकड पळपुट्याचे पाठी । हिजडा लागे ॥ ११ ॥
ग्रंथ नाम उदासबोध । कवी जनतेचा संवाद ।
काळा कडु आतला विषाद । हलका केला। ॥ १२ ॥

इति श्री उदासबोधे कविजनतासंवादे ग्रंथारंभनाम समास

उदासबोधातील पहिला समास वर दिलेला आहे. संपूर्ण ग्रंथात असे पन्नास समास आहेत.

मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ला, सिंधुदूर्ग इथे झाला. त्यांनी मराठी व संस्कृत मधून, मुंबई युनिव्हर्सिटीतून एम.ए. केले. ते युनायटेड स्टेटस् इन्फोर्मेशन सर्व्हिस मध्ये संपादक होते. जरी ते कवी म्हणून जास्त प्रसिद्ध असले तरी सिद्धहस्त लेखकही आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे अनेक कवितासंग्रह आणि अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यातील 'बोलगाणी' खूपच प्रसिद्ध आहे.

Post to Feed

धन्यवाद!
छान.......
उत्तम!
सहमत

Typing help hide