जुलै २३ २००६

विडंबने-३ 'विरामचिन्हे' आणि कवीची 'विरामचिन्हे'

ह्यासोबत

'विरामचिन्हे'
- राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज

जेव्हा जीवनलेखनास जगती प्रारंभ मी मांडिला,
जो जो दृष्टित ये पदार्थ सहजी वाटे हवासा मला!
बाल्याची पहिली अशी बदलती दृष्टी सदा बागडे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसती स्वच्छंद चोहीकडे!

आहे काय जगात? काय तिकडे? हे कोण? कोठे असे?
सांगा ईश्वर कोण? त्यापलिकडे ते काय? केंव्हा? कसे?
जे ते पाहुनि यापरी भकतसे, दृक् संशये टाकित,
सारा जीवनलेख मी करितसे तै 'प्रश्नचिन्हां'कित.

अर्धांगी पुढती करी वश मना श्रुंगारदेवी नटे,
अर्धे जीवन सार्थ होइल इथे साक्षी मनाची पटे;
प्रेमाने मग एकजीव बनता भूमीवरी स्वर्ग ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले येथून हालू नये !

झाली व्यापक दृष्टि; चित्त फिरले साश्चर्य विश्वांतरी,
दिक्कालादि अनंतरूप बघता मी होत वेड्यापरी !
सूक्ष्मस्थूलहि सारखी भ्रमविती; लागे मुळी अंत न,
त्याकाळी मग जाहले सहजची 'उद्गार'वाची मन !

आशा, प्रेम, नवीन वैभव, तशी कीर्तिप्रभा, सद्यश -
ही एकेक समर्थ आज नसती चित्ता कराया वश !
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे असे जाहला,
देवा! 'पूर्णविराम' त्या तव पदी दे शीघ्र आता मला !

राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज (२६ मे १८८५- २३ जानेवारी १९१९, सावनेर) हे मराठीतील संगीत नाटकांचे प्रख्यात नाटककार होते. मात्र ते तेवढेच सिद्धहस्त कवी आणि विनोदी लेखकही होते. विनोदी लेखन त्यांनी 'बाळकराम' ह्या टोपणनावाने केले. त्यांच्या कवितांचा संग्रह डॉ.भीमराव  कुलकर्णी यांनी 'संपूर्ण वाग्वैजयंती' ह्या नावाने प्रसिद्ध केलेला आहे. प्रस्तुत कविता ह्याच पुस्तकाच्या २६ मे १९८५ ह्या त्यांच्या जन्मशताब्दीदिनी प्रसिद्ध झालेल्या पंधराव्या आवृत्तीतून घेतलेली आहे.

कवीची 'विरामचिन्हे' ('विरामचिन्हे' चे विडंबन)
- आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार

मानवी जीवनलेखांतील गोविंदाग्रजांनी दर्शविलेल्या 'विराम-चिन्हां' पेक्षा कवीच्या आयुष्यातील 'विरामचिन्हे' निराळी असावीत ही गोष्ट हल्ली शुद्धलेखनासंबंधी चालू असलेल्या वादास धरूनच नाही काय!

जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला,
जे जे दृष्टित ये तयावर 'करू का काव्य?' वाटे मला,
तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी वस्तू लिहाया पुढे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे !

झाले काव्य लिहून - यास कुठल्या धाडू परी मासिका?
याते छापिल कोण? लावू वशिला कोठे? कसा नेमका?
रद्दीमाजि पडेल का? परत वा साभार हे येईल?
सारे लेखन तेधवा करितसे मी 'प्रश्नचिन्हा' कुल!

अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या धाडिली,
अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनी वाटली !
कैसा हा फसणार डाव? कविता छापून तेव्हाच ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले तेथून हालू नये !

झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी,
केले मी मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळी !
माझे 'गायन' ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन !
त्या काळी मग होतसे सहजची 'उद्गार' वाची मन !

पुढील श्लोक 'कोरसा' दाखल असून तो वाचकांनी कवीला ऐकू न जाईल अशा हलक्या स्वरांत गुणगुणावयाचा आहे. बाकी ऐकू गेले तरी काय व्हायचे आहे म्हणा?

डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएन्झा जरी
ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी -
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे परी साधला,
देवा, 'पूर्णविराम', त्या कविस या देशी न का आजला? १

१. आमच्या गायनप्रिय रसिक वाचकांसाठी वरील कवितेचे 'नोटेशन' आम्ही येथे देत आहोत. त्यामुळे कवितेच्या अर्थाबरोबर तिच्यातील 'संगीत' ही वाचकांना सहज समजून येईल. काव्यगायनेच्छू बालकवींचीही त्यामुळे चांगलीच सोय होणार आहे. मात्र 'स्वरलेखन' करतांना आम्ही 'प्रो.मौलाबक्षांची चिन्हे' न वापरता आमची स्वतःची 'चिन्हे' वापरली आहेत, हे एक सुचिन्हच नव्हे काय? स्थलाभावामुळे टंकालयातील (फौंड्री) टंचाईमुळे दर श्लोकातील एकाच चरणाचे नोटेशन देणे शक्य झाले आहे.

     ,     ?     ;     !     .     ॥ ध्रु ॥

,ऽऽ     ;ऽ     ,ऽऽऽ     ,ऽऽऽ     ,ऽऽऽऽऽ     १
?ऽऽ    ?ऽ    ?ऽऽऽ    ?ऽऽऽ    ?ऽऽऽऽऽ     २
;ऽऽ     ;ऽ     ;ऽऽऽ     ;ऽऽऽ     ;ऽऽऽऽऽ     ३
!ऽऽ     !ऽ     !ऽऽऽ     !ऽऽऽ     !ऽऽऽऽऽ     ४
.ऽऽ     .ऽ     .ऽऽऽ     .ऽऽऽ     .ऽऽऽऽऽ     ५

आचार्य अत्रे ह्यांचा परिचय विडंबने-१ मध्ये दिलेलाच आहे.

Post to Feed

वावा!
साऱ्या परिसराचेच सर्वलक्षी विडंबन !
धन्यवाद
धन्यवाद
वा
धन्यवाद
सुंदर

Typing help hide