ज्वालामुखी

ध्येय कितीही असाध्य असले तरी ज्यांचे सर्वस्व त्या ध्येयासाठी अर्पिलेले असते आणि ज्यांचे आदर्श उत्तुंग असतात ते आपले ध्येय अखेर साध्य करतातच. असाच एक महान ध्येयवादी म्हणजे  'पंजाबशार्दूल' हुतात्मा उधमसिंग.


 udhamsing 1


उधमसिंगांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी पतियाळातील 'सुनाम'खेड्यात झाला. त्यांचे मूळ नाव उदयसिंह असे होते, पुढे ते उधमसिंग असे झाले. अवघे तीन वर्षाचे असताना त्यांचे मातृछत्र हरपले व काही वर्षातच पितृछत्रही हरपले. ते व त्यांचे बंधू साधुसिंग हे दोघे अनाथ झाले.त्यांना चंचलसिंह यांनी आपल्या अमृतसरच्या रामबाग येथील अनाथाश्रमात आणले. लवकरच भावाचे देहावसान झाले व उधमसिंग जगात एकाकी उरले. त्यांनी कोळशाने चित्रे काढणे, सुतारकाम, लोहारकाम वगरे करून उदरनिर्वाहास सुरुवात केली व ते काहीसे स्थिरावू लागले होते, तोच तो काळा दिवस उजाडला. जनरल डायर व मायकल ओडवायर यांनी जालियनवाला बागेत जमलेल्या नि:शस्त्र व निरपराध लोकांवर बेछूट गोळीबार करून ३३१ मोठी माणसे, ४१ बालके व एक सात महिन्यांची तान्ही मुलगी असे ३७३ अमानुष खून पाडले तर १५०० जणांना जखमी केले. (दि. १३ एप्रिल १९१९). याच जखमींमध्ये एक उधमसिंग होते. त्यांच्या हाताला गोळी लागली, मात्र ते कोसळले व त्यांच्या अंगावर एक मृतदेह कोसळल्याने ते वाचले वा त्यांना आणखी गोळ्या लागल्या नाहीत. मुळात क्रांतिकार्याकडे आकर्षित झालेले व वाचनाने जागृत झालेले उधमसिंग या घटनेने प्रक्षुब्ध झाले व त्यांनी मारेकऱ्यांना देहांत शासन देण्याची घोर प्रतिज्ञा केली.


हिंदू - मुस्लिम ऐक्याच्या भावनेने भारलेल्या उधमसिंगांनी 'राम महंमदसिंग आझाद' असे हिंदू-मुसलमान-शीख या सर्व धर्मांचे प्रतिनिधित्व करणारे नाव धारण केले. ग्रंथवाचन, जहाल वक्तव्य यामुळे ते लवकरच काही क्रांतिकारक तरुणांच्या वर्तुळात सामावले गेले ज्यांत प्रत्यक्ष भगतसिंगही होते. जणू उधमसिंगांना आपला मार्ग सापडला.जालियनवाला बागेच्या घटनेनंतर त्यांनी अनेक पुस्तके, वर्तमानपत्रे वाचली व त्यांना समजून चुकले की डायर व ओडवायर यांनी आधीही अनेक नीच कृत्ये केलेली आहेत, जसे सरदार अजितसिंग (भगतसिंगाचे सख्खे काका) यांची देशाबाहेर तडीपारी, १९१४ च्या गदर उत्थानातील विष्णू गणेश पिंगळे, सरदार सोहनसिंग भकना, पृथ्विसिंह आझाद इ. प्रभृतींवर निर्बंधित न्यायालयात एकतर्फी खटले चालवून त्यांना फाशी देण्याची सूचना व आग्रह. त्यांचा या नीचांना निजधामास पाठवण्याचा निर्धार पक्का झाला. इकडे क्रांतिकारकांच्या वर्तुळात वावर असल्याने पोलिसांचा ससेमिरा मागे लागला व तो चुकविण्यासाठी ते एका लाकडाच्या व्यापाऱ्याबरोबर खोट्या पारपत्राच्या आधारे पूर्व आफ्रिकेत पळून निसटले. तिथून ते अमेरिका, जर्मनी वगरे बरेच भटकले. त्यांना भगतसिंगांचा दारुगोळा व शस्त्र घेऊन येण्याचा निरोप मिळाला व एका जर्मन युवतीसह ते हिंदुस्थानात दाखल झाले (१९२७. मात्र एका खबऱ्याच्या चहाडीमुळे ते अमृतसर येथे पोलिसांच्या छाप्यात पकडले गेले. उधमसिंग सशस्त्र असल्याची खबर असल्यामुळे पोलीस सावध होते. उधमसिंगांना अटक झाली तेंव्हा त्यांच्या अंगावर एक कोल्ट रिवॉल्वर व १३९ काडतुसे सापडली. उधमसिंगांना पाच वर्षे कारावास झाला. मात्र सुटका होताच ते गपचुप देशाबाहेर निसटले व रशिया, इजिप्त, ऍबिसिनीया, फ्रान्स, जर्मनी असे भटकत अखेर इंग्लंड मध्ये येऊन ठेपले (१९३३). इथे त्यांनी 'राम महंमदसिंग आझाद' याच नावाने बनावट पारपत्राच्या आधारे प्रवेश मिळवला होता. त्यांनी लंडनमधील सुरुवातीचे दिवस अतिशय हलाखीत काढले. ते अनेकदा  हिंदी तरुणांच्या समूहात जहाल भाषा वापरत असत. आपण इथे प्रतिशोध घेण्यास असल्याचा उल्लेख त्यांनी कधी बोलताना केलाही होता. डायर तोपर्यंत मरण पावला होता. ओडवायर हयात होता. उधमसिंग मोटर चालविण्यास शिकले होते. आपण एकदा ओडवायरचे सारथ्य करून त्याला नीट पाहून ठेवले आहे असे ते सांगत असत. एक दिवस त्याला मारून मी भगतसिंगासारखा फासावर जाईन असे ते मोठ्या अभिमानाने सांगत. पण त्याकडॆ कुणी फारसे लक्ष दिले नाही. पुढे योगायोगाने त्यांना शिवसिंग जोहल यांचा आसरा मिळाला. शिवसिंग हे लंडनमध्ये स्थायिक असले तरी मूळचे हिंदुस्थानी होते, काकोरी धमाक्याचे जनक रामप्रसाद बिस्मिल यांच्या वडिलांना ते ओळखत होते व त्यांचा साहजिकच क्रांतिकारक तरुणांना पाठिंबा होता.


इथे उधमसिंग स्वातंत्र्य चळवळ चालवणाऱ्या अनेकांच्या सान्निध्यात आले व त्यांचा परिचय व्हि. के. कृष्णमेनन व केसरी चे लंडन चे वार्ताहर दत्तोपंत ताम्हनकर यांच्याशी झाला व ते त्यांना भाषणे, सभा यात साहाय्य करू लागले.एक दिवस दत्तोपंत हाइड पार्क मध्ये भाषण देत होते. त्याचवेळी पलीकडेच 'प्रिन्स ऑफ वेल्स टेरेस', केन्सिंग्टन येथे राहणारा ओडवायर तेथून जात होता. त्याला हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा उच्चार सहन झाला नाही. भाषण मध्येच थांबवत तो दत्तोपंतांवर ओरडला, "तुम्ही स्वातंत्र्याला पात्र नाही. आधी अस्पृश्यतेचे काय ते बोला.". दत्तोपन्त उत्तरादाखल तेजस्वी मुद्रेने त्याला उत्तरले, " तू स्वत:च एक अस्पृश्य आहेस! " मग ते भाषण ऐकणाऱ्यांना उद्देशून म्हणाले , "हा पाहा जालियनवाला बागेचा कसाई". हे सर्व पाहत व ऐकत असताना वरकरणी शांत दिसणारे उधमसिंग आतून खवळले होते. आता वेळ न घालवता याला संपवला पाहिजे.


दुसऱ्या महायुद्धाची धुमश्चक्री सुरू होताच ते ३६ ते ३९ च्या दरम्यान दोनवेळा युरोप ला जाऊन आले. जिनिव्हा येथे त्यांची भेट परागंदा देशभक्त सरदार अजितसिंग यांच्याशी झाली. मग ते ताश्कंदलाही जाऊन आले. स्वातंत्र्यासाठी त्यांचे प्रयत्न असे सुरू होते. परत इंग्लंड येथे आल्यावर सक्तीच्या सैन्य भरतीवरून त्यांचा सरकारशी खटका उडाला. इंग्लंडला परत येताच त्यांना आपल्या प्रतिज्ञेची आठवण झाली. त्यांनी आपण ओडवायरला कंठस्नान घालणार असल्याचे शिवसिंग यांना सांगितले. मात्र शिवसिंग त्यांना म्हणाले की तू तर बोलघेवडा वाटतोस, तुझ्या हातून काही होईल असे मला वाटत नाही. तेंव्हा उधमसिंग त्यांना म्हणाले की ते सातत्याने त्याचाच विचार करत असून ते आपल्या प्रतिज्ञेशी बद्ध आहेत. मात्र त्यांना शक्यतो ओडवायर व भारतमंत्री याना एकाच वेळी मारायचे आहे. एक वध केला तर एकदा फाशी आणि दोन केले तरी एकदाच फाशी असा सरळ हिशेब होता. माझ्या देशाचे भवितव्य ठरवायला इंग्रज मंत्री लंडनमध्ये कशाला असा त्यांचा सवाल होता. त्यांनी याच सुमारास आपण हिंदुस्थानात परत जाणार असल्याची बातमी पसरवली. आपण मोटारीने भूमार्गे प्रवास करणार असे सांगून त्यांनी लंडनच्या 'ऑटोमोबाइल असोसिएशन' कडून प्रवासाचे मार्गदर्शन व नकाशे वगरे घेतले. तिथे त्यांना संरक्षणार्थ हत्यार ठेवायचा सल्ला मिळाला. पडत्या फळाची आज्ञा घेत त्यांनी शस्त्र पैदा केले. युद्धकाळात शस्त्राला काय तोटा? एका ब्रिटिश टॉमीला दारू पाजून त्यांनी अगदी स्वस्तात एक अमेरिकन बनावटीचे 'स्मिथ ऍण्ड वेसन' चे .४५५ चे रिवॉल्वर व २५ काडतुसे मिळविली. मात्र त्याने दिलेली काडतुसे बहुधा .४ ची व जुनी असावीत. त्यामुळे ती अगदी चपखल बसत नसत, त्यामुळे हत्याराचा पल्ला कमी झाला होता. मग त्यांनी ओडवायर राहतं असलेल्या केन्सिंग्टन भागात वर्दळ वाढवली व काहीतरी कारणाने प्रत्यक्ष ओडवायरशी ओळख करून घेत ती वाढवली व त्याला एकदा तर चहाचे निमंत्रणही दिले. या मागचा उद्देश त्याला नीट पाहून ठेवणे ज्यायोगे भलताच कुणी मारला जाणार नाही हाच होता. आता अशी शंका येणे स्वाभाविक आहे की त्यांनी इतक्या संधी असताना वध का केला नाही? त्याचे उत्तरही उधमसिंगनी दिले होते. त्यांच्या मते ओडवायर हा हिंदुस्थानचा गुन्हेगार होता व त्याला मारणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे; हे सर्वजणांच्या समक्ष भरसभेत पार पाडले पाहिजे, ज्या योगे साऱ्या जगाला समजेल की एका हिदुस्थानी माणसाने याला का मारला. हा सगळा प्रभाव भगतसिंग ह्या आदर्शाचा होता. इतक्या महान व्यक्तींच्या एका असामान्य कृत्याचे अनुकरण करावे असे वाटणारा शिष्यही असामान्य असावा लागतो.


आता सर्व तयारी सिद्ध होती. प्रतीक्षा होती ती योग्य संधीची. आणि लवकरच ती संधी चालून आली. 'इंडिया ऑफिस' च्या भितीवर त्यांना एक भित्तिपत्रक दिसले, त्यात १३ मार्च १९४० रोजी कॅक्स्टन सभागृहात 'ईस्ट इंडिया असोसिएशन' व 'रॉयल एशियाटीक सोसायटी' यांच्यातर्फे एका सभेचे आयोजन केल्याचे लिहिले होते. या सभेचे अध्यक्ष भारतमंत्री झेटलँड असून या सभेला उपस्थित राहणाऱ्या आसामींमध्ये ओडवायर असल्याचे नमूद केले होते. ते वाचताच उधमसिंगांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या खुशीतच त्यांनी योजना आखली. १२ मार्च १९४० रोजी त्यांनी आपल्या सर्व मित्रांना मेजवानीला बोलावले आणि लाडवांचे जेवण घातले. ते अखेरचे सहभोजन!


१३ तारखेचा दिवस उजाडला. आपले स्मिथ अँड वेसन भरून, काही सुटी काडतुसे एका थैलीत घेऊन व  व समजा परदेशी हत्याराने दगा दिला तर कोटाच्या आतल्या खिशात एक सुरा टाकून ते झोकदार पोशाख करून निघाले व सभास्थळी पोहोचले. लॉर्ड झेटलँड व्यासपीठावर होते तर खाली समोरच्या पहिल्याच रांगेत अगदी डावीकडे ओडवायर बसलेला दिसला. सभेला बरीच गर्दी होती. लोक जागा नसल्याने भिंतीलगत उभे होते. त्यांना सरकावीत उधमसिंग शक्य तसे पुढे सरकत होते. झेटलँडचे भाषण संपले. आभार प्रदर्शन सुरू होताच कार्यक्रम संपणार म्हणून लोकांची चुळबुळ सुरू झाली. पुढे थोडी जागा होताच पटकन उधमसिंग पुढे सरकले व त्यांनी आपले रिवॉल्वर काढून गोळ्या झाडायला सुरुवात केली. पहिल्या दोन गोळ्यातच ओडवायर मेला. मात्र ते त्वेषाने गोळ्या झाडत राहिले. नंतरच्या दोन गोळ्या झेटलँडना लागल्या पण ते वाचले. मग प्रत्येकी एक गोळी लॉर्ड लॅमिंग्टन व सर लुई डेन याना लागल्या. रस्ता सोडा असे सांगत उधमसिंग जाऊ लागताच एका वयस्कर बाईने त्यांना मागून कोट खेचून बेसावध अवस्थेत हटकले.अडखळलेले उधमसिंग स्वत:ला सावरत असतानाच क्लॉड रिचेस याने एका वायुदलाच्या शिपायाच्या साहाय्याने त्यांना गिरफ़्तार केले.


 udhamsingh 2


घटनास्थळी अटक झालेले उधमसिंग - चेहेऱ्यावर भितीचा लवलेश नसून कर्तव्य पूर्तीचे समाधान आणि ओडवायरला मारल्याचा आनंद दिसत आहे.


ही बातमी प्रसृत होताच सर्वांना १९०९ साली हुतात्मा मदनलाल धिंग्रा याने याच स्थळी केलेल्या कर्झन वायलीच्या वधाची आठवण झाली. हिंदुस्थानातील स्वार्थी व सत्तालोलुप पुढारी याचा निषेध करू लागले, चमचे लोकांनी निषेधाच्या सभा घेतल्या. गांधीजी नेहमी प्रमाणेच 'माथेफिरू कृत्य' असे विशेषण उपहासाने लावून मोकळे झाले. फक्त स्वा. सावरकरांनी प्रशंसा केली. जनता उधमसिंगांच्या या प्रतिशोधाने थक्क झाली व त्याच्या पुढे नतमस्तक झाली. तिकडे जर्मनीत मात्र या प्रतिशोधाची मुक्तकंठाने प्रशंसा झाली. मर्दाचा पोवाडा मर्दानी गावा. 'बर्लिनेस बोरसेन सायटुंग' या जर्मन वर्तमानपत्राने उधमसिंगांचे वर्णन 'हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्याचा तळपता दीप' असे करीत अशी बातमी दिली की 'पददलित हिंदुस्थानीयांच्या दबलेल्या संतापाचा हा आविष्कार आहे. आपल्या राज्यात हिंदुस्थानी प्रजा सुखात आहे असे सांगणाऱ्या इंग्रजांना ही एक सणसणीत चपराक आहे.' प्रसिद्ध अमेरिकन लेखक व पत्रकार विल्यम शिरर या प्रसंगी बर्लिन येथे होता. आपल्या 'बर्लिन डायरी' त त्याने १४ मार्च १९४० च्या पानावर लिहिले होते की " एक गांधी सोडले तर इतर बहुतेक हिंदुस्थानी लोक ओडवायरचा वध हा एक ईश्वरी प्रतिशोध आहे असेच मानतील.ओडवायर हेच अमृतसर हत्याकांडाचे उत्तरदायी आहेत. आज तमाम जर्मन वृत्तपत्रे असे म्हणत आहेत की 'हिंदी स्वातंत्र्यवीराचे कृत्य! अत्याचाऱ्याना गोळ्या घाला' "


अभियोग चालून उधमसिंगांना अपेक्षेप्रमाणे फाशीची शिक्षा झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना अंतिम भाषणात उधमसिंग म्हणाले "मी हे कृत्य केले कारण कारण त्याची मरायचीच लायकी होती. तो माझ्या देशाचा गुन्हेगार होता. त्याने माझ्या देशबांधवांची अस्मिता चिरडण्याचा प्रयत्न केला, मी त्यालाच चिरडून टाकला. मी गेली २१ वर्षे प्रतिशोधाच्या प्रतीक्षेत होतो, तो आता पूर्ण झाला आहे. मी मृत्यूच्या कल्पनेने जराही विचलित झालेलो नाही; मी माझ्या देशासाठी बलिदान करीत आहे. ब्रिटिशांच्या अत्याचारी राजवटीत मी अनेक देशबांधव मरताना पाहिले व त्याचा निषेध मी माझ्या कृत्याने व्यक्त केला. माझ्या मातृभूमीप्रीत्यर्थ मला मरण येत आहे याहून मोठा सन्मान कोणता?"


दि. ३१ जुलै १९४० रोजी उधमसिंग यांना लंडनच्या पेंटनवीले तुरुंगात, जिथे हुतात्मा मदनलाल धिंग्राला फाशी दिले होते तिथेच फाशी दिले गेले. त्यांचा आदर्श असलेल्या भगतसिंगांप्रमाणेच त्यांचा मृतदेह ताब्यांत नेता परस्पर त्याची विल्हेवाट लावली गेली. मात्र अनेक स्थानिक देशभक्त हिंदुस्थानी, भारत सरकार व पंजाब सरकार यांनी सातत्याने त्यांचे अवशेष हिंदुस्थानात परत पाठवण्याच्या मागणीचा पाठपुरावा केला व प्रयत्नांना यश येऊन अखेर २० जुलै १९७४ रोजी ते अवशेष इथे आले. ते पवित्र अवशेष जालियनवाला बाग येथे एका व्यासपीठावर ठेवण्यात आले, व हजारोनी त्याचे दर्शन घेतले व त्यावर पुष्पहार वाहिले. नंतर त्या पेटिकेची मिरवणूक चंदिगड, लुधियाना, जालदार व त्यांचे जन्मगाव सुनाम येथे नेण्यात आली. अखेर लाखो लोकांच्या जयजयकारात त्यांच्या अस्थी आनंदपूर येथे गंगा व सतलज यांच्या संगमावर विसर्जित करण्यात आल्या.


तब्बल २१ वर्षे प्रतिशोधाचा ध्यास घेऊन अखेर तो पूर्णत्वास नेणाऱ्या व त्यासाठी हसत बलिदान करणाऱ्या पंजाबशार्दुल हुतात्मा उधमसिंग याना विनम्र अभिवादन.