आमची प्रेरणा अजब यांची सुंदर गझल तसा नेहमी... आणि तिचे आमच्या गुरुजींनि केलेलं झकास विडंबन तसा नेहमी...(२)
कसा नेहमी नको तिथे मी असायचो
आणि नेमका लफड्या मध्ये फसायचो...
उमेद होती जिंकायची तेव्हा मजला;
अपयश आले तरिही पत्ते पिसायचो...
ओळख माझी कधी विसरले नाही ते?
ज्यांची घेउन इथे उधारी बसायचो...
पाहत होतो पोरी मी पूर्वीदेखिल...
पण त्यांच्यावर मी अवलंबुन नसायचो...
नेता होतो, नव्हतो गांधीवादी मी!
क्वचित-प्रसंगी उपोषणा मी बसायचो...
मी मेल्यावर म्हणेल का हो हे कोणी?
तुझी विडंबन वाचुन "केश्या" हसायचो...