......आणि मावळणार नाही चांदणी !

..........................................................
......आणि मावळणार नाही चांदणी !
..........................................................

जागच्या जागीच सारा
शेवटी माझा पसारा
राहिला !
व्यर्थ स्वप्नांचा, भ्रमांचा
भार भलभलत्या श्रमांचा...
वाहिला !

वेढला गेलो धुक्याने...
सोसले सारे मुक्याने...
नेहमी !
बंधनांचा जाच झाला
प्रेम केले; काच झाला...
रेशमी !

चांदण्याचा कवडसा मी
या इथे आलो कसा मी...?
ना कळे !
फक्त योगायोग होता ?
छे ! अटळ हा भोग होता...
ना टळे !

बेगडी सारीच नाती
राहिले काही न हाती...
न्यायला
चाललो मी; हा गुन्हा का ?
मी खुळा आहे पुन्हा का 
यायला...?

आठवे कुठली कहाणी...?
का असे डोळ्यांत पाणी ?
शेवटी...!
वेदनाही शेवटी ही
एकटी ही, एकटी ही,
एकटी !

गाव माझा दूर आहे
मजसवे हा सूर आहे
मारवा !
सोबती काळोख आता
मार्ग माझा चोख आता
हा नवा !

एक लखलखती तरीही
या नभी अन् अंतरीही
हिरकणी !
जी कधी ढळणार नाही
आणि मावळणार नाही
चांदणी !!

- प्रदीप कुलकर्णी

..........................................................

रचनाकाल ः ७ व ८ फेब्रुवारी २००३

..........................................................