दुसरे लोकमान्य

(गेली अनेक वर्षे माझं वास्तव्य महाराष्ट्राबाहेरच आहे. या काळातल्या निरिक्षणांवरून आणि अनुभवांवरून मला हे लिहावंसं वाटलं. त्यामागे केवळ एका विज्ञाननिष्ठ, पर्यावरणावर आणि या देशावर प्रेम करणाऱ्या नागरिकाचा दृष्टीकोन आहे. कुणाच्याही धार्मिक भावनांना धक्का पोहोचविण्याचा उद्देश यात नाही, याची नोंद घ्यावी, ही नम्र विनंती.)

काल संध्याकाळी इमारतीच्या गच्चीतून अचानक जोरजोरात (... आणि थोडासा घाबरवणारा) आरडाओरडा ऐकू आला, म्हणून त्वरेने पहायला गेले. तर गच्चीत काही मुले आणि तरूण पतंग उडवत होते; कुणीतरी कुणाचातरी पतंग काटला होता आणि त्याचा आनंद साजरा करण्याचा कार्यक्रम म्हणून तो आरडाओरडा चालू होता. दर दहा-पाच मिनिटांनी एखादा पतंग काटला जात होता आणि तश्याच प्रकारे घाबरवून सोडणाऱ्या आवाजात तो क्षण साजरा होत होता. माझ्या मनात आलं - आनंद साजरा करण्याची ही कुठली नवी पद्धत ... की ऐकणाऱ्याला भिती वाटेल? खरं तर त्यात निखळ आनंद आणि सहकाऱ्यांचा हुरूप वाढवणे यापेक्षाही हुल्लडबाजीचा उद्देश जास्त होता का?

’हुल्लडबाजी’ ह्या एका नकारात्मक गोष्टीचं आज-काल लोकांना इतकं आकर्षण का वाटतं? लग्न-समारंभ, सण-सोहोळे अथवा कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम या हुल्लडबाजीशिवाय पूर्ण हो‍ऊच शकत नाही की काय? जोरजोरात गाणी, जोरजोरात बोलणे, आरडाओरडा, फटाक्यांचे कानाचे पडदे फाडणारे आवाज - यांपैकी काहीही किंवा सर्व ऐकू आलं की समजावं की कुठलातरी समारंभ साजरा होत आहे. त्यात सामिल होणाऱ्यांच्या हे गावीही नसतं की आसपासच्या लोकांना आपल्यामुळे काय आणि किती त्रास होतोय. पतंगबाजीचंच उदाहरण घ्यायचं झालं तर ती पाहायला सोपी पण करायला कठीण अशी गोष्ट आहे. त्यामागे एक कला आहे. उंचावर उडणारा एखादा पतंग काटल्यावर आनंद नक्कीच होत असणार. पण त्या आनंदाचं प्रकटीकरण अत्यंत डोकं उठवणारं असतं.
तीच कथा नवरात्रोत्सवाची!
आनंद आणि संगीत यांचं अतूट नातं आहे. पण कानठळ्या बसवणाऱ्या वाद्यांच्या कलकलाटाला संगीत म्हणायचं?  आणि त्या कलकलाटाच्या तालावर केलेले अंगविक्षेप - त्याला आनंद साजरा करणं म्हणायचं?
शंभरएक माणसं सणासुदीच्या निमित्ताने एकत्र आली की नैवेद्य, प्रसाद, खाणं-पिणंही आलं आणि त्याचबरोबर अत्यंत गलिच्छ, गलथान अस्वच्छता आणि पर्यावरणाची अपरिमित हानी आलीच.

थोड्याफार फरकानं कुठल्याही सार्वजनिक उत्सवात हेच दृष्य दिसतं. अगदी आपला गणेशोत्सव किंवा दिपोत्सवही त्याला अपवाद नाही.

शंभर वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हा त्यामागे राष्ट्रकार्याचा महान उद्देश होता. ब्रिटिशांविरुद्ध आपली ताकद दाखवण्याचा तो एक अत्यंत प्रभावी मार्ग होता आणि त्या काळाची ती गरज होती. द्रष्ट्या लोकमान्यांनी ती गरज ओळखली नसती तरच नवल होतं. तशीच आजच्या काळाची अचूक गरज ओळखणारे ’दुसरे लोकमान्य’ आता भूतलावर अवतरायला हवेत. सर्व प्रकारचे, सर्वधर्मांचे सार्वजनिक उत्सव बंद करण्याची आज या धरतीमातेला नितांत आवश्यकता आहे.

असे सण हे रोजच्या धकाधकीच्या जीवनात चार विरंगुळ्याचे क्षण म्हणून हवेसे वाटतात, समाजासाठी ते ’शॉक-अब्सॉर्बर’चं काम करतात, इ. इ. म्हटलं जातं. पण आपल्या असल्या ’शॉक-अब्सॉर्बर’मुळे निसर्गाचा श्वास हळू-हळू पण कायमचा कोंडला जातोय त्याचं काय? सणांच्या माध्यमातून आपापला धर्म पाळण्याच्या नादात आपण राष्ट्रधर्म आणि पर्यायाने निसर्गधर्म विसरतोय, त्याचं काय?

तुम्हाला काय वाटतं?