प्रजासत्ताकाच्या निमित्ताने - सलाम

(पाडगावकरांची क्षमा मागून)
सलाम

सलाम,
सबको सलाम
आज अभिमानाने वगैरे फडकणाऱ्या
आपल्या तिरंगी झेंड्याला सलाम
सगळ्या धुवट पांढऱ्या कपड्यांना सलाम
वंदेमातरमी गाण्यांना सलाम
गोडगोड बोलणाऱ्यांना सलाम
त्यांच्या बोलांवर विश्वासणाऱ्यांना सलाम
आपल्या महान, उदात्त वगैरे संस्कृतीच्या
भारतभूच्या प्रत्येक गुटख्याला सलाम
प्रत्येक पिचकारीला सलाम

खणून बुजवलेल्या, बुजवून खणलेल्या
प्रत्येक खड्ड्याला सलाम
सिग्नलवर गाडी पुसणाऱ्या पोरांच्या
फाटक्या चड्ड्यांना सलाम
मस्तवाल पोलिसाला सलाम
सिग्नल तोडणाऱ्यांच्या मस्तीला सलाम
मस्ती उतरवण्याची गुर्मी करणाऱ्याला सलाम
गुर्मी जिरवणाऱ्या नोटेला सलाम
नोटा घेऊन केलेल्या सलामालाही सलाम

शिक्षणमहर्षींना सलाम
शब्दांगणिक पसाभर लाळ सांडणाऱ्या त्यांच्या चमच्यांना सलाम
कधी रांडेसारखी चक्क रोख
तर कधी चोरटी शय्यासोबत
घेऊन पास करणाऱ्या प्रत्येक
आदर्श शिक्षकाला सलाम
सर्टिफिकेटचे भेंडोळे
सरकवून बसलेल्या
प्रत्येक नोकऱ्यार्थी विद्यार्थ्याला सलाम

सगळ्या मराठी मालिकांना सलाम
साहित्यसंमेलनांना सलाम
अध्यक्षीय निवडणुकीच्या रणधुमाळीला सलाम
स्टेजवरच्या राजकारण्यांना सलाम
परिसंवादांना सलाम
गर्दीला सलाम
तेवढ्यात दाबता आली तर एखादी
म्हणून आलेल्या धूर्त तरुणाईच्या रसिकतेला सलाम
दाबणाऱ्यांना सलाम
दाबून घेणाऱ्यांनाही सलाम

एकतीस डिसेंबरला सलाम
नवीन ब्रँडच्या व्हिस्कीला सलाम
हपापलेल्या हातांना सलाम
बुभुक्षित नजरांना सलाम
ओरबाडणाऱ्यांना सलाम
ओरबाडण्याचे चित्रीकरण करणाऱ्यांनाही सलाम

शेतात लटकणाऱ्या प्रेतांना सलाम
प्रत्येक एसईझेडला सलाम
भकास डोळ्यांच्या फटफटीत कपाळांना सलाम
शासकीय मदतीतल्या घोटाळ्यांना सलाम
भेगाळलेल्या जमिनीला सलाम
तेलकट नदीला सलाम
टाटांच्या नॅनोला सलाम
भारत झालाच आर्थिक महासत्ता वगैरे
सगळ्या चिदंबरी आश्वासनांना सलाम

शेअर मार्केटला सलाम
त्यात कमवून 'कृपा आहे बाबांची'..... देवस्थानाला जाणाऱ्यांना सलाम
बेदरकार अपघातांना सलाम
आणि हे सगळे
उघड्या, स्थिर डोळ्यांनी
अविचलपणे बघणाऱ्या देवाला तर
पहले छूट सलाम
देवाला सलाम
देवाच्या प्रत्येक एजंटाला - महाराज, चुकलो, माफ करा
बाबा, माई, परमपूज्य... सगळ्यांना सलाम
देवाला सलाम
देवाला रिटायर करणाऱ्यांनाही सलाम

अनेक हात असते तर
अनेक हातांनी केला असता सलाम
लेकीन माफ करना भाईयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त
उजव्या हाताने सलाम
सलाम, सबको सलाम
भाईयों और भैनों, सबको सलाम

२६ जानेवारी २००८