आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी
आज वाटले मी ही जन्मलो राजहंस की होण्यासाठी
आज उमगले जे घडणे ते घडते त्याला दैव म्हणावे
आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी
चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते
नियती लावून कर्म मापटे घटका घटका मोजून देते
वालुकेपरी अलिप्त राहून या घटकांतून सरण्यासाठी
आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी
सुख असते का अजून काही आत्मत्रुप्तीहून भिन्न असेही
स्वरुपाची स्वरुपावाचून अन्य रुपाशी तुलना नाही
आज लाभले मला नयन ते माझी प्रतिमा बघण्यासाठी
आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी
या धरतीला कवेत घेण्या गगन उभे विस्तारून छाती
कमल उमलते त्या चंद्राच्या निर्मल शीतल मायेपोटी
आज भावल्या स्रुष्टीमधल्या जन्मांतरीच्या जीवनगाठी
आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी