चूक, माणसा, सुधारण्याची संधी आहे
जन्म घेतला, मरण्याची का बंदी आहे ?
एक भिंतही नाही ज्यांना आडोशाला
व्योम आपले म्हणण्याची श्रीमंती आहे
रोज मंडई सजे नव्या देहा-तत्त्वांनी
रोज बोलतो दलाल, "सध्या मंदी आहे"
वेगळ्या चुली देशांतर्गत श्रीमंतांच्या
फाळणी नवी, नवीन ही गच्छंती आहे
देत भाषणे डावे-उजवे बुद्धिजीवी
व्यासपीठही त्यांचे हस्तिदंती आहे
भात काल्पनिक, शिळी कढी बोलाची त्यावर
राजकारणी वचनांची दुर्गंधी आहे
राम जीवनी नाही, आता कसले जगणे ?
"कोण बोलले ? इथे कुणी पाखंडी आहे !"