.............................................
... पण दुःख अमर आहे!
.............................................जिद्दीस पेटला; हट्ट नको तो केला
पाहिली सुखाची वाट; शेवटी मेला
तो जाता जाता हेच सांगुनी गेला -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे!`सारखा सुखाच्या धावधावला मागे
चडफडला, चिडला, रडला, भरला रागे
शेवटी म्हणाला सर्व विसरुनी त्रागे -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे!`जगण्याच्या नावाखाली क्रूर कुचेष्टा
ही विटंबना; या अविरत हाल-अपेष्टा
कोकले कुणी तो दूर सुखाचा द्वेष्टा -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`ही व्यर्थ, निरर्थक इथली नातीगोती
जी परस्परांच्या दुःखां कारण होती
अन् गलका होतो अंती हाच सभोती -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`हा उरला आता शेवटचाच शिपाई
संपेल तरी का मग असमान लढाई ?
मेलाच पहा तो, बोले घाई घाई -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`विश्वात आज या कुणीच उरले नाही
दाटून राहिले दुःख दिशांना दाही
ललकारी आता घुमेल हीच उद्याही -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`माणूस क्षुद्र; त्याची ही क्षुद्र कहाणी
संघर्षानंतर उरली काय निशाणी ?
बोलेल कुणाच्या डोळ्यांमधले पाणी ? -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`***
मी कधीच त्याच्या नाही पडलो हाती
मी कधी न झालो का त्याचा सांगाती ?
सुख रडते; म्हणते, पिटून आता छाती -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`- प्रदीप कुलकर्णी
.............................................
रचनाकाल ः ४ ते ८ एप्रिल २००८
.............................................