लिहीत जातो कशास आपण?
लढवत बसतो शब्दांचे रण
शब्द पाहावा शब्दच गावा
शब्दातच जिवलगही दिसावा
कधी भासते लिहिणे मृगजळ
कधी ठसठसे जखमच केवळ
लिहून टाकू, होउ मोकळे
कळून येते जडावलेपण
कधी लांबते कधी थांबते
शब्दांचे हे अवघडलेपण
शब्दच तारा शब्दच वारा
काजळरात्री शब्दसहारा
शब्दच कुंपण शब्दच शिंपण
शब्दच हरिमुरलीचे गुंजन