माझ्या आईचं हासणं

माझ्या आईचं हासणं,बन जाईचं जाईचं

पाकळ्यांच्या निःश्वासांना जणु झालेल्या घाईचं!

माझ्या आईचं हासणं इंद्रधनुष्याचं स्वप्न

अन हिऱ्याहून्सुद्धा खूप मूल्यवान रत्न!

माझ्या आईचं हासणं चांदण्यांची लुकलुक

लपवीत रोज आणि छातीतली धाकधुक

माझ्या आईचं हासणं ज्ञानोबाची विरहिणी

आणि व्यकूळ गंभीर एकनाथाच्या गौळणी!

माझ्या आईचं हासणं जसं छोटं तसं भव्य

आणि भविष्याचं माझ्या एक रम्य महाकाव्य !

माझ्या आईचं हासणं जणु घुसमट व्यथेची

कारंज्याच्या खाली दाब,याच कठोर प्रथेची!

माझ्या आईचं हासणं थोडी चिंता थोडा धीर

चिंता वाचविते मला,धीर करतो खंबीर!