किट्टू - २

डोळसनाथाच्या देवळाबाहेर हळूहळू गर्दी जमू लागली होती. राजकारणात पडू पाहणारा संदेश धोत्रे कावराबावरा होऊन आजूबाजूला पाहत होता. शेवटी त्याचे वडील अण्णासाहेब येताना दिसले तेव्हा तो जरा निवांतला. अण्णांनी आल्याआल्या सगळ्यांना जामायला घेतले. "गन्या, तू धोतर आन् दोन सफेत चादरी घिऊन ये नवीन त्या किसनलाल मारवाड्याकडनं. पैसे ईचारले तर सांग की लायसन्सीचं काम अजून व्हायाचं आहे ते ईसरू नको... बाज्या, तू लाकडं आनी रॉकेल आन त्या रेशनवाल्या नाईकाकडनं. पैसे ईचारले तर मला फोन कराया सांग. म्हमद्या, तेरे अब्बाके पास वो पिलास्टिकका कव्हर रहेंगा उस्कू लेके आ....".

एवढे दिग्दर्शन करून झाल्यावर मग त्यांनी गणपा आणि इतर माळकर्‍यांकडे मोर्चा वळवला, आणि अचानक आवाजात गहिंवर आणला, "माऊलीची विच्छा..... आमच्यासारकी मागे राहत्यात नि पुन्यवान मानसं माऊलीकडं जात्यात....." असे म्हणून त्यांनी गणपाला एकदा या बाजूची आणि एकदा त्या बाजूची छाती भिडवून कवेत घेतले आणि खांद्यावरच्या घामट वास येत असलेल्या फडक्यात तोंड लपवून चार हुंदके काढले.

गणपाला खरेच उमळून आले. अखेर मृदंग वाजवणार्‍या बोरकरबुवांनी त्याला सावरले.

=====

खोकखोकून हल्लक झालेल्या देवीचंद भाटालाही फार भरून आले होते. त्याचा दारू गाळण्याचा धंदा बंद करून त्याने 'नीट' मार्गाला लागावे यासाठी निवृत्तीने काही वर्षे त्याची पाठ धरली होती. अखेर भट्टीचा वास घेऊनघेऊन देवीचंदचा दमा उफाळला आणि यापुढे उंदीर मारण्याचे औषध विकण्याचे कबूल करून त्याने निवृत्तीचा ससेमिरा चुकवला. तसेही या नव्या फौजदाराला हप्ता चांगलाच मोठा लागत होता. तो दिल्यावर उरलेल्या पैशांतून नफा मिळवायचा म्हणजे फ्रेंच पॉलिश मिसळण्याचेच धंदे करावे लागले असते. ते "आमी कंजारभाट दारू पिलावते, ईख न्हाई" या देवीचंदाच्या ब्रीदाला काळे फासणारे ठरले असते.

आता उंदीर मारण्याचे औषध लोक आत्महत्या करायलाही विषासारखे वापरत, पण त्याला देवीचंदाचा नाईलाज होता. बोलून चालून विषच ते, उंदीर मेले काय नि माणसे मेली काय. पण खरेदी करताना तरी लोक 'दारू' म्हणून खरेदी करत नाहीत याचेच त्याला समाधान होते. 'दारू' ही चित्तवृत्ती उल्हासित करणारी एक जीवनावश्यक वस्तू आहे हे त्याचे ठाम मत होते. त्याने स्वतः दारू पिणे सोडले होते, पण त्याचे कारण दारूचा वाईटपणा नसून त्याच्या नव्या तरण्या बायकोच्या तोंडाचा पट्टा होता.

आज नेमकी ती माहेरी गेली होती. नवर्‍याचे ज्या व्यक्तीबद्दल बरे/चांगले मत असेल ती व्यक्ती आपली शत्रू या स्त्रियांसाठी नैसर्गिक असलेल्या न्यायाने तिचे नि निवृत्तीचे वाकडे असणे साहजिक होते. अर्थातच हे एकतर्फी होते. निवृत्तीकडून कुणाला वाकडेपणा मिळण्याची शक्यता या जन्मी तरी नव्हती. पण निवृत्तीमुळे तिचा संसार नीटसा रांगेला लागला होता हे तिला एकंदरीतच जड जात होते. आज ती नव्हती याबद्दल देवीचंदला कधी नव्हे ते बरे वाटत होते. नाहीतर एरवी ती माहेरी गेली की 'बुढ्ढी घोडी लाल लगाम' असलेल्या त्याला कायम अस्वस्थ वाटत राही.

आता आलेली उबळ निस्तरून तो उठला आणि खिडकीजवळच्या फळीवर त्याचा सगळा माल रचून बाहेर पडला. देवळापासच्या गर्दीचा गिजबिजाट हळूहळू उमटू लागला होता. त्या दिशेने एकापुढे एक पावले रचत देवीचंद चालू लागला.

=====

ससूनमधून मृतदेह म्हणून जे काही आले ते आयूब खाटकाकडे आलेल्या मालासारखे दिसत होते. अण्णासाहेबांनी झपाट्याने त्यावर म्हमद्याने बापाकडून आणलेले प्लास्टिक अंथरले आणि त्यावर पांढरी चादर. मग बोरकरबुवांना बाजूला घेऊन ते म्हणाले "बुवा, धे खाई उरिला न्हाई. आता आंगुळी घालत बसन्यात मतलब न्हाई. फकस्त ऐन टायमाला त्ये प्लास्टिक काडून घ्यायाचं ध्यानात ठिवा. तसा मी हायेच, पन आज हाये स्तायीची विलेक्शन. आपली मतं फुटाया लागली तर दादासाहेब बलावत्याल. मग बाळत व्हायाला आलेली बाईल सोडून पळाव लागंल, थितं मैतीला कोन मोजनार? दादासाहेब म्हंत्याल, "म्येलं ते म्येलं, आता जित्यांनाबी पोचवायाला बगतूस काय?" तर जर म्या नसलूच, तर त्येवडं द्यानात ठिवा". खर्चासाठी म्हणून त्यांनी शंभराच्या आणि पन्नासाच्या वीस-वीस नोटा बोरकरबुवांकडे सुपूर्द केल्या. माळ घालण्याआधी त्या नोटा जर बोरकरकडे गेल्या असत्या, तर त्या पाचव्या मिनिटाला देवीचंद भाटाकडे असत्या. पण माळ घातल्यावर आता त्या (जर खर्च झाल्याच तर) योग्य ठिकाणीच खर्च होतील याची खात्री खुद्द देवीचंदनेही डोळे मिटून दिली असती.

तरीही, बोरकरबुवांकडे लक्ष ठेवण्यासाठी संदेशला सांगावे म्हणून अण्णासाहेब मागे वळले. संदेशने त्यांना बघून घाईघाईने पिंक टाकल्याचा त्यांना संशय आला. पण ही वेळ स्वतःच्याच मुलाचे थोबाड उचकटवण्याची नव्हती एवढे त्यांना कळत होते. "च्या मायला, अजून यूथ विंगच्या कमिटीवरपन गेला न्हाई, आनि सुरू जालं का नकरं" असे स्वतःशीच पुटपुटत त्यांनी संदेशला गोष्टी समजावून द्यायला सुरुवात केली. गुटख्याचा भणभणता वास त्यांच्या नाकात शिरला.

=====

सराईत पावले टाकीत किट्टू सिद्धार्थनगरच्या बोळकांड्यांतून मानवी देहाच्या वेगवेगळ्या क्रियांचे दर्प हुंगूनही न हुंगल्यासारखे करीत चालला होता. देवीचंद भाट देवळासमोर गेला होता हे त्याने आडोशाला उभे राहून नीट निरखून घेतले होते. त्याच्या खिडकीचे दार ढकलून किट्टूने आत हात घातला.

आणि सपाट्याने तो निवृत्तीच्या झोपडीच्या मागच्या भिंतीला आला. या भिंतीला लागून एक जनघोषित कचराकुंडी होती. आणि ती महापालिकेच्या लेखी अस्तित्त्वात नसल्याने तिथला कचरा कधीच उचलला जात नसे. गुडघाभर कचर्‍यात डुरकणारी डुकरे निर्वेध हिंडत असत. वेळीप्रसंगी एखादे घाईला आलेले मूलही आया आणून तिथे उकिडवे बसवीत. म्हणून तर त्या भिंतीला पडलेला भोकसा दुरुस्त करायला निवृत्तीने गणपाला बोलावले होते.

तो तात्पुरता दुरुस्त केलेला भोकसा किट्टूने बेताबाताने परत आत ढासळवला. आणि मगरीसारखा सरपटत तो आत शिरला. गेल्यावर त्याने परत विटा जुजबी रचून ठेवल्या.

=====

किट्टू घरी गेला हे कळल्यावर संतोषने सायकल दामटत सिद्धार्थनगरची टेकडी गाठली. निवृत्तीच्या घरी तो कधीच्या काळी एकदा आला होता. त्यानंतर बरीच बांधकामे झालेली दिसत होती. पत्र्याच्या झोपड्या विटांच्या झाल्या होत्या. आणि विटांच्या झोपड्यांवर थेट स्लॅब पडला होता. अखेर त्याने इकडेतिकडे पाहिले आणि गटारावर टाकलेल्या बाजेवर बसून विडीचे दमछाट झुरके मारणार्‍या एका म्हातार्‍याला त्याने निवृत्तीच्या मकानाचा पत्ता विचारला.

त्याने पत्ता विचारायला आणि त्या म्हातार्‍याला खोकल्याची उबळ यायला एकच गाठ पडली. ती उबळ म्हातार्‍याने पंधराएक मिनिटे विलंबितपासून सुरू करून मध्यलयीपर्यंत निभावली. शेवटी धाप लागू लागली तशी त्याने सगळा जीव एकवटून एक पिवळसर गिळगिळीत बेडका एका झोपडीच्या दारात भिरकावला. अवघ्या विश्वाचे अंतिम सत्य माहीत झालेल्या सिद्धपुरुषासारखे त्याने डोळे मिटले आणि श्वासाची गती आधी नियमीत केली.

पण जेव्हा त्याने तोंड उघडले तेव्हा निवृत्तीचा पत्ता सांगण्याऐवजी त्याने "अक्करमाशे..... इडीत तमाकू न्हाई, गधड्याचा गू भरतेत" अशी तक्रार केली. संतोषने परत प्रश्न केलाच तेव्हा त्याने देवळाच्या दिशेने खणखणीत आवाजात हाकारा घातला "अन्नासाब, निवृत्तीचं पाव्हनं आलं जनू..." . निवृत्तीने आपले खाजगी जीवन फारच खाजगी ठेवल्याने तिथे कुणालाच त्याच्या कुटुंबियांबद्दल काही माहिती नव्हती. स्वतःच्या पायांनी पत्ता विचारत आलेला माणूस त्याचा सगेवाला असणार हे बिनचूक ताडून त्या म्हातार्‍याने माहिती सांगण्याऐवजी इतरांना साद घातली.

देवळाकडून खुद्द अण्णासाहेब धावत आले. बाकी काहीही म्यॅनेज करणे त्यांच्या हातचा मळ होता. पण शेवटी आगिनडाग कुणी द्यायचा इथे ते अडले होते. इतर कुणी असते तर त्यांनी विचार करण्यातही वेळ दवडला नसता, मसणातल्या मुकादमालाच एक संत्र्याची बाटली सारली असती नि मोकळे झाले असते. प्रश्न निवृत्तीसारख्या संताचा होता म्हणून तर वांधा आला होता.

निवृत्तीचा सगेवाला आला म्हटल्यावर त्यांना सर्व प्रश्नांचे उत्तरच सापडून गेले. तो आत्तापर्यंत का आला नाही, आत्ताच कसा आला, या प्रश्नांपेक्षा त्यांना काडेपेटी कुणाच्या हातात द्यायची याची सोय झाली हा आनंद झाला.

=====

थोरल्या भावासमान असलेल्या निवृत्तीला लपलपत्या लालपिवळ्या ज्वाळांच्या आधीन करून आणि नारळ फुटावा तसा कवटी तडकल्याचा आवाज ऐकून संतोष अखेर निवृत्तीच्या खोलीसमोर आला तेव्हा त्या दाराला अजूनही कुलूप होते.

आतमध्ये धाकट्या भावासमान असलेला किट्टू उंदीर मारायचे विष खाऊन लाकडासारखा ताठरून पडला होता.