तिमिरात उषेचे स्वप्न घेउनी जगलो
मी हार गळ्यातील हार मानुनी जगलो
संदर्भ रोजचे कालबाह्य होताना
मी इतिहासाला उरी घेउनी जगलो
तुडवून फुलांना खुशाल ते जाताना
मी कर्ज कळीचे शिरी घेउनी जगलो
मी त्याच ठिकाणी रोज ठेच खाउनही
त्या क्षितिजावरती नजर ठेउनी जगलो
जगण्याच्या धुंदित तोल तुझा जाताना
मी मात्र नशेचे भान लेउनी जगलो
तू वार्यावरती शब्द उधळिले आणि
मी त्या शब्दांना नित्य जागुनी जगलो
आयुष्य आजचे समोरुनी येताना
मी हाय ! उद्यावर त्यास टाकुनी जगलो