एकदा अश्याच माझ्या मित्राबरोबर गप्पा चालल्या होत्या. नकळतच चर्चा आजच्या तरुण पिढी वर सुरू झाली. बोलता बोलता माझा मित्र म्हणाला, "आजची तरुण पिढी ही पडदा पागल पिढी आहे". उदाहरणादाखल त्याने सांगितले की सर्वसाधारण कोणतीही मुले बघ, एकतर ती भ्रमणसंचाच्या पडद्यावर खेळ, लघुसंदेश पाठवत असतात, गाणी ऐकत असतात. हे नसेल तर आणि घरी असतील तर संगणकाच्या पडद्यावर गप्पा, सफर, संदेशलेखन करत असतात आणि हे नसेल तर निरर्थकपणे दूरदर्शनांच्या पडद्यावर वेगवेगळ्या वाहिन्या पाहत असतात अथवा सारखे वाहिन्या बदलत असतात.
सर्वसाधारणपणे पुस्तके वाचणे, चर्चा / संमेलनात भाग घेणे इत्यादी मध्ये तरुणाचा सहभाग अगदी नगण्य स्वरूपाचाच असतो / दिसतो.
प्रवासात अनेकदा आपल्या बाजूला असलेला मुलगा / मुलगी तासंतास बोलत / बडबडत असतात पण एखादे वाक्यही शेजारच्या व्यक्तीशी बोलत नसतात. सर्वाबरोबर असूनही ही तरुण मुले कोठेतरी एकटी आहेत असे वाटत असते.
मला माझ्या मित्राचे निरीक्षण मार्मिक वाटले.