रडताही आले नाही...!

...............................................
रडताही आले नाही...!
...............................................

कशासाठी आलो इथे, माझे काम काय?
निघताना पुन्हा पुन्हा रेंगाळती पाय...!

कुणीतरी रंगमंचावर ढकलले....
भूमिकेचे कोडे मात्र नाही उकलले....
सुरू झाला खेळ, तरी मीच निरुपाय!

असंबद्ध शब्दांचाही किती केला गर्व...
बरळलो काहीबाही.. अर्थहीन सर्व...
- आणि पुढे दगडांचा होता समुदाय!

निरर्थक हातवाऱ्यांतून झालो व्यक्त...
तेवढेच हाती होते, तेवढेच फक्त...
इलाज न होता मूक राहण्याशिवाय!

जगणेच होते सारे विसंवादी सूर...
स्वतःपासून मी होतो खूप दूर दूर...
मनी होते एक गाणे; तेही असहाय!

आनंदाचे क्षणसुद्धा होते विपरीत....
ओठांवरी आले हसू, तेही भीत भीत...
रडताही आले नाही मोकलून धाय!

एक... दोन... तीन... चार... श्वास सारे खंक...
जगण्याच्या नाटकाचे किती किती अंक?
पडदाही पाडायाला कुणी नाही, हाय!

- प्रदीप कुलकर्णी

...............................................
रचनाकाल ः १ एप्रिल २०००
...............................................