माग

उरी राहिला डाग आसवांचा
न आला परी राग आसवांचा

सुखाला न लागो नजर कुणाची
कधी वर जरा माग आसवांचा

सुखाला हवे गालबोट काही
असो त्यात सहभाग आसवांचा

जसा त्रास बेमोसमी सरींचा
असे तोच वैताग आसवांचा

जरी चंदनी सेज जीवनाची
फणा काढतो नाग आसवांचा

कधी तृप्त झाली न ती तुपाने
चितेला हविर्भाग आसवांचा

नको वाट चालूस दलदलीची
नको, माणसा, माग आसवांचा