मराठी गझल कार्यशाळा-२ जाहीर झाल्याचे कळले व आम्हाला हर्षवायू का काय म्हणतात तो झाला. मात्र तिथे जाऊन बघतो तर
* ह्या कार्यशाळेत हझल (हास्य-गझल) स्वीकारली जाणार नाही 
ही "No Entry"ची पाटी!
साऱ्या उत्साहावर विरजण पडले. मग काय, आलो माघारी. कार्यशाळेत विद्यार्थी म्हणून देण्यासाठी रचलेल्या ओळी वाकुल्या दाखवीत होत्या.
(स्वगतः खोडसाळा, एकूण तुझ्या भाग्यात कार्यशाळेचे मार्गदर्शन नाहीच. गुरूजन तुझा एकलव्य करून सोडणार. आंगठा मागत नाहीत हे नशीब समज.)
कार्यशाळेचे मला बक्षीस नाही?
काय शब्दांचा बरा हा कीस नाही?
बांधलो 'नाही' रदीफ़ाला जरी मी
काफ़ियाला राहिलो ओलीस नाही!
वृत्त ते सांभाळता दमछाक होते
आणि यमकाची मला प्रॅक्टीस नाही... :(
चालवू म्हटले तरी चालीत नाही
कोण म्हणतो काफ़िया डॅंबीस नाही?
हट्ट का धरता अलामत पाळण्याचा?
शायराला फार ही तोशीस नाही?
घ्याल का, संयोजकांनो, गझल माझी?
स्पष्ट सांगा, यात घासाघीस नाही
मान्य, हौशाचे असे हे कवन नवखे
बनचुक्यांच्या पात्र हे माफीस नाही
खोडसाळा, कविवरांना राग आला
हात त्यांच्या घातला दाढीस, नाही?