काही दिवसांपूर्वी अकोल्याला जाणे झाले. अकोले (जि. नगर) म्हणजे माझे मूळ गाव. माझं गावावर विशेष प्रेम आहे. तसे सगळ्यांचेच असते म्हणा; पण माझे जास्तच आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मित्राचा फोन आला. लवकर माझ्या स्टुडिओत ये. म्हटलं, "अरे मला जायचंय. ' तर "नको नको. जाऊ नको थांब, ' म्हणाला. का थांबवतोय म्हटलं, तर शेवटी मित्रच तो. "**** सोडून तरवडं उपटू नको' ही आमच्या गावाकडची म्हण सुनावत त्याने माझी बोलती बंद करून टाकली. फोन बंद झाला. त्याच्याकडे जाणे अटळच होते. माझ्या घरापासून त्याचं घरं किमान एक किलोमीटर अंतरावर. नाईलाजानं चालत गेलो त्याच्याकडे, तर तिथं आणखी दहा मित्र बसलेले. सगळेच जिवलग. या एकालाही मी अकोल्याला आलोय म्हणून कळवलं नव्हतं. म्हणून सगळ्यांच्या नको नको त्या शिवा खाव्या लागल्या. मित्रप्रेमापुढं आम्ही कोण? मी आपला गप्प. म्हटलं, होऊ द्या लेकांना तुमचं!
शिवीगाळ करण्याचा कार्यक्रम उरकल्यानंतर म्हणाले, चला निघू या. म्हटलं, अरे जायचंय कुठं. तर तो आमचा काळा राजा तापला. त्यानं पुन्हा शिव्यांची लोखोली वाहिली. सगळ्यांना चुकवून निघालो होतो. त्याचे परिणाम भोगावेच लागणार होते. दोन मित्रांच्या दोन फोर व्हीलर होत्या. गुपचूप एकीत जाऊन बसलो. गाडीनं गाव सोडला. कुणान कुणाच्या टवाळ्या. खिदळणं गाडीत सुरूच होतं.
थोडावेळाने एका मित्राच्या शेतात पोचलो. तिथं त्याचे एक घरही आहे. तिनेक खोल्या. मागच्या बाजूला पडवी. तिच्या एका टोकाला किचन. अर्थातच ग्रामीण भागातलं. आम्ही सगळेजण एका खोलीत शिरलो. खोलीतली दिसतील ती पांघरुणं पसरून प्रत्येकानं बसायला जागा करून घेतली. आमच्यातल्या चौघांनी गाडीतलं सामान स्वयंपाक खोलीत नेऊन ठेवलं. तेव्हा कळलं काही तरी बेत ठरवून आणलंय ह्यांनी आपल्याला इथं. मनात म्हटलं, जाऊ देत झाला एक दिवस उशीर तर. गाव सोडल्यापासून अशा मित्रांचा सहवास तरी फारसा कुठे मिळतो आपल्याला. आता त्याचा आस्वाद तर घेता येतोय ना!
खरंच सांगतो मित्रांच्या बाबतीत मी खूप भाग्यवान आणि नशीबवान आहे. मला गावाकडं लाभले तसे मित्र फारच क्वचित कुणाला लाभले असतील. मला काही टोचलं, तर त्याच्या वेदना त्यांना होत असतील, एवढे गुंतलोय आम्ही एकमेकांत. का कोण जाणे? असो.
थट्टामस्करी, हसणे खिदळणे सुरूच होते. तिकडे स्वयंपाक खोलीत चूल पेटल्याचं धुराच्या वासावरून कळत होतं. मित्राच्या शेतात एक गडी आहे. तो स्वयंपाक फारच छान करतो. त्याच्या हातालाच चव आहे. त्यानं आपलं काम सुरू केले होते. आमचे खिदळणे सुरू असतानाच राजा प्लॅस्टिकचा एक ड्रम घेऊन खोलीत आला. त्याच्या मागोमाग दहा-बारा ऑम्लेट घेऊन गडी आला. राजाला म्हटलं काय रे आणलं? म्हटला, वाईनये वाईन. जांभळाचीये. लई भारी तयार झालीय. म्हटलं, अरे द्राक्षाच्या वाईन ऐकली होती. ही जांभळाची कुठून काढली? त्यावर ज्या मित्राच्या शेतात आलो होतो त्यानंच खुलासा केला. म्हणाला, माझे एक डॉक्टर मित्र आहेत, त्यांनी घरगुती पद्धतीने तयार केलीय. मी विचारलं, कशी काय, फर्मंटेशन कसं केलंय. तर तो म्हणाला, सगळी काळजी घेतलेली आहे. काळजी करू नको. म्हटलं, ठीक आहे, बाबा.
आमचं बोलणं सुरू असतानाच राजाचं ग्लास भरण्याचे काम चालू होते. एक ग्लास माझ्या हातात देण्यात आला. मी बळंच तो घेतला आणि पहिल्यांदा तो नाकाला लावला. वास उग्र नव्हता. म्हणून थोडी चाखून बघितली. आंबट गोड होती. एक घोट घेतला, तर सरबतासारखी लागली. दुसरा घोट घेतला तेव्हा व्वा व्वा म्हणतच त्या मित्राला दाद दिली. म्हटलं, आता वायनरीच टाक तू...
दहाजणं होतो. तासाभरात ड्रम रिकामा झाला होता. स्वयंपाक चवदार व्हावा आणि प्रत्येकाला पोटभर खायला मिळू नये, तशी अवस्था झाली होती त्या दिवशी. खरंच काय चव होती त्या वाईनची? अजूनही जिभेवर रेंगाळते आहे....
आता मोहाच्या फुलांवर प्रयोग करण्याचा विचार आहे त्यांचा....